Wednesday, March 30, 2011

भारत वि. पाकिस्तान..मैदानावरील गरमागरम किस्से !!!


 भारत पाकिस्तानचा सामना म्हंटला की मैदानावरील गरमागरम वातावरण हे ठरलेलं असायचं. विशेषत: विश्वचषकातील लढतींमध्ये असे प्रसंग वारंवार घडलेले आहेत. यापूर्वी विश्वचषक स्पर्धेत हे दोन संघ एकूण चार वेळा एकमेकांविरोधात उभे ठाकले असून प्रत्येकवेळी भारताने पाकिस्तावर मात केली आहे. या सामन्यांमध्येही असेच काही अविस्मरमीय प्रसंग घडून गेले आहेत. या आठवणींना व्हिडियोंसहित दिलेला हा उजाळा..


      1992 (सिडनी) - इम्रान खानच्या लढवय्या पाकिस्तानी संघाने 1992 च्या विश्वचषकात न्यूझीलॅंड, इंग्लंड अशा भल्याभल्यांना पाणी पाजत विश्वचषकावर कब्जा केला होता. परंतु या प्रवासातही भारताकडून मात्र त्यांना मात खावी लागली होती. राऊंड रॉबिन पद्धतीने खेळल्या गेलेल्या या बेन्सन अॅन्ड हेजेस विश्वचषकात साखळीत भारताची पाकिस्तानबरोबर गाठ पडली होती. यापूर्वी भारताला इंग्लंड तसेच ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. तर श्रीलंकेविरूद्धचा सामान पावसामुळे धुतला गेला होता. यावेळी अझरूद्दीन कप्तान असलेल्या भारतीय संघात कपिल देव, आताचे निवड समितीचे अध्यक्ष के. श्रीकांत, संजय मांजरेकर यांच्याबरोबरच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचाही समावेश होता. जडेजा, मनोज प्रभाकर, श्रीनाथ, किरण मोरे हे संघातील इतर सदस्य होते. पहिली फलंदाजी करताना भारताला सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या संथ खेळपट्टीवर 49 षटकांत 7 गडी गमावून फक्त 216 च धावा करण्यात यश आले. या धावा जमवण्यात सर्वात मोलाचा वाटा होता तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या छोट्या चणीच्या सचिन रमेश तेंडुलकरचा... सचिनने तब्बल 91 चेंडूंचा सामना करताना नाबाद 54 धावा केल्या होत्या. मात्र शेवटी याच 54 धावा निर्णायक ठरल्या. भारतातर्फे अजय जडेजा, अझरूद्दीन आणि कपिल देवनेही काही छोटेखानी पण उपयुक्त खेळी केल्या. तरी पाकिस्तानसमोर 216 चं आव्हान म्हणजे फारसं काही कठीण वाटत नव्हतं. परंतु भारताच्या श्रीनाथ आणि प्रभाकरने सुरूवातीलाच पाकिस्तानला धक्के देत इंझमाम आणि जाहिद फजलला बाद केलं. दुसरीकडे आमीर सोहेल मात्र खेळपट्टीवर टिकाव धरून होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जावेद मियॉंदादबरोबर त्याची चांगील भागीदारी जमली आणि पाकिस्तानचा डाव आकार घेऊ लागला होता. मात्र अखेर फलंदाजीत चमक दाखवणाऱ्या सचिनने इथे आपल्या गोलंदाजीचीही कमाल दाखवली आणि सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या आमीर सोहेलला 63 धावांवर बाद केले. यानंतर पाकिस्तानी डावाची पडझड झाली आणि त्यांचा डाव 173 धावांतच संपुष्टात आला. फलंदाजीत 54 धावा आणि गोलंदाजीत 10 षटकं टाकून अवघ्या 37 धावा देत आमीर सोहेलचा बळी घेणाऱ्या सचिनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. सचिनच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी हा सामना नेहमीच लक्षात रहिल. मात्र त्यापेक्षाही या सामन्याची एका खास कारणासाठी नेहमीच आठवण काढली जाते. जावेद मियॉंदाद हा नेहमीच भारताविरूद्धच्या सामन्यात काही गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असायचा. चेतन शर्माला शेवटच्या चेंडूवर षटकार खेजून पाकला विजय मिळवून देणाऱ्या जावेदची आणखी एक आठवण याच सामन्यातील आहे. जावेद मियॉंदाद आणि भारताचा यष्टिरक्षक किरण मोरे यांच्यातील प्रसिद्ध शाब्दिक चकमक आणि मियॉंदादच्या त्या माकडउड्या याच सामन्यातल्या. मियॉंदाद फलंदाजी करत असताना पाक फंलदाजांवर दडपण वाढवण्यासाठी भारतीय गोलंदाज, क्षेत्ररक्षक (खासकरून यष्टिरक्षक किरण मोरे) हे वारंवार फलंदाजाच्या पायाला चेंडू लागला रे लागला की पायचीतचे जोरदार अपील करायचे. तसेच पाकिस्तानचीच चिडखोर वृत्ती त्यांच्यावर उलटवण्यासाठी किरण मोरेचे मियॉंदादचे लक्ष विचलित करण्यासाठी प्रयत्न चालले होते. यावर मियॉंदाद चांगलाच चिडला. सचिन गोलंदाजी करताना तो मध्येच थांबला आणि किरण मोरेला त्याने खडसावले. नंतर तर किरण मोरेला चिडवण्यासाठी त्याने माकडउड्या मारून किरण मोरेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मैदानावर प्रचंड गरमागरमी असताना या दोन खेळाडूंमधील ही चकमक चांगलीच रंगली आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील एक अविस्मरणीय प्रसंग बनून गेली.



       1996 (बंगळुरू) - किरण मोरे आणि जावेद मियॉंदादमधील किश्शाने 1992 विश्वचषकाचा भारत पाकिस्तान सामना चांगलाच गाजला. यांनतर चार वर्षांनी पुन्हा एकदा विश्वचषकात भारत पाकिस्तान आमनेसामने आले. आणि यावेळीही काहीशा अशाच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली. किंबहुना 92 पेक्षा यावेळी मैदानावरील वातावरण चांगलेच तापले होते असं म्हणावं लागेल. कारण 92 ला सामना दूरदेशी ऑस्ट्रेलियात खेळला जात होता, तर यावेळी हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी बंगळूरच्या स्टेडियम दणाणून सोडणाऱ्या आपल्याच पाठिराख्यांसमोर खेळत होते. तसेच हा सामना साखळीतील साधासुधा सामना नव्हता. तर उपउपांत्य लढत असल्याने येथे पराभव म्हणजे घरचा रस्ता पकडणं भाग होतं. प्रचंड गाजावाजा झालेल्या या सामन्यातील हिरो (वातावरण तापवण्यासाठी) ठरले आमीर सोहेल आणि वेंकटेश प्रसाद... सिद्धूच्या 91 धावांच्या जोरावर 287 धावांचा डोंगर भारताने उभारलेला होता. याचा पाठलाग करताना या सामन्यासाठी बदली कर्णधार असलेला आमीर सोहेल आणि भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेल्या सईद अन्वर या दोघा पाक सलामीवीरांनीही धडाकेबाज सुरूवात केली होती. श्रीनाथ आणि वेंकटेश प्रसाद या दोघांची धुलाई चाललेली. अखेर संघाच्या 84 धावा झाल्या असताना अन्वरची श्रीनाथने शिकार केली. परंतु आमीर सोहेल त्याच जोशात फटकेबाजी करत होता. वेंकटेश प्रसादच्या एका षटकात तर त्याने सलग दोन चेंडूंवर कव्हर्समधून दोन सणसणीत चौकार लगावले. आणि यामुळे त्याला चांगलाच चेव चढला. चौकार मारल्यानंतर मोठ्या माजात त्याने प्रसादला कव्हर्सच्या दिशेने बोट दाखवत याच ठिकाणी मी चौकार मारेन असं सुनावलं. प्रसादने मात्र आपलं डोकं शांत ठेवत पुढचा चेंडू अचूक टप्प्यावर टाकला आणि सोहेलचा त्रिफळा उडवला. अशारितीने सोहेलचा माज उतरला आणि नंतर पाकिस्तानने सामनाही गमावला. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यांतील ही एक ठळक आठवण बनून गेली.



      1999 (मॅंचेस्टर)- 92 आणि 96 नंतर 99 साली मॅंचेस्टरमध्ये भारत आणि पाकिस्तान हे विश्वचषकात तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले. मॅंचेस्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय तसेच पाकिस्तानी लोकांचे वास्तव्य असल्याने याठिकाणी सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सामन्याच्या दिवशी मॅंचेस्टर हे भारत किंवा पाकिस्तानच असल्यासारखे भासत होते. अशात अझरूद्दीनचा भारतीय संघ आणि अक्रमचा पाकिस्तानी संघ आपल्या देशाची इभ्रत वाचवण्यासाठी समोरासमोर आले. आणि पुन्हा एकदा 1996 प्रमाणेच वेंकटेश प्रसादने भेदक गोलंदाजी करत भारताला पाकिस्तानविरूद्ध विश्वचषक स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवून दिला. भारताच्या 227 या धावसंख्येला उत्तर देताना प्रसादच्या पाच विकेट्समुळे पाकिस्तानी टीम 180 मध्येच गारद झाली. यावेळी श्रीनाथनेही तीन बळी घेत प्रसादला मोलाची साथ दिली. भारतातर्फे सचिनने सलामीला येत 45, अझरूद्दीनने 59 तर राहुल द्रविडने 61 धावा केल्या होत्या.


2003 (सेंचुरीयन)- पुन्हा एकदा 2003 मध्ये सेंचुरीयनवर भारताची पाककिस्ताविरूद्ध गाठ पडली. या सामन्याचे वर्णन करायचे झाल्यास सबकुछ सचिन असंच म्हणावं लागेल. यावेळी 92 च्या विश्वचषकानंतर पुन्हा एकदा 11 वर्षांनी सचिनने पाकिस्तानला चांगलाच दणका दिला. सईद अन्वरने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत 101 धावांची शतकी खेळी केल्याने पाकिस्तानने भारतापुढे 274 धावांचे आव्हान ठेवले होते. येथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे विश्वचषक स्पर्धेत प्रथमच भारत पाकिस्तानविरूद्ध धावांचा पाठलाग करणार होता. यापूर्वी तिन्ही खेपेस भारताने प्रथम फलंदाजी केली होती. आणि पाकिस्तानचा संघ दडपणाखाली येऊन कोसळला होता. मात्र आता परिस्थिती नेमकी उलट होती आणि पाकिस्तानी फलंदाजांनी आव्हानात्मक धावसंख्याही उभारली होती. त्यामुळे भारतावर दडपण आले होते. परंतु भारताची फलंदाजी चालू होताच अगदी पहिल्या षटकापासून सचिन-सेहवाग यांनी अशी काही फटकेबाजी चालू केली की पाकिस्तानी गोलंदाजच दबावाखाली आले. आग ओकणारा शोएब अख्तर, वकार युनूस अशा कोणालाच या दोघांनी जुमानले नाही आणि सहाव्या षटकातच संघाचे अर्धशतक फलकावर लावले. मग सेहवाग बाद झाल्यानंतरही सचिनने आपला धडाका कायम ठेवला. सचिनचं शतक मात्र अवघ्या दोन धावांनी हुकलं. पण त्याच्या 75 चेंडूंमधील 98 धावांच्या या तुफान खेळीने भारताला कधीच विजयाच्या दाराशी नेऊन उभे केलं होतं. त्यानंतर द्रविड आणि युवराजने नाबाद खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि पुन्हा एकदा पाकिस्तानला भारतासमोर लोटांगण घ्यावं लागलं. यावेळी सुरूवातीच्या षटकांत सचिन-सेहवाग फलंदाजी करत असतानाचा त्यांचा तुफानी अंदाज निव्वळ दृष्ट लागण्यासारखा होता. अलीकडेच सेहवागने केलेल्या खुलाशानुसार शोएब अख्तर वारंवार त्याला बाउंसर टाकून हुसकावत होता. तेव्हा त्याने समोर तुझा बाप उभा आहे, त्याला बाउंसर टाक, तो सिक्स मारेल असं सुनावलेलं. यावेळी शोएबने सचिनला तेजतर्रार बाउंसर टाकताच सचिनने एक शानदार हुकचा फटका लगावर चेंडू सीमारेषेपार भिरकावून दिला होता. हा सामना पाहिलेला कोणीही भारतीय हा षटकार आपल्या उभ्या आयुष्यात विसरू शकणार नाही.


Monday, March 21, 2011

प्लॅटफॉर्मवर राहून ट्रेनशीच वैर !!! टाटाची अनोखी शक्कल...

       'पाण्यात राहून माशांशी वैर बाळगू नये' असं मराठीत म्हंटलं जातं. मात्र सध्या दादर, वाशी तसेच इतर प्रमुख रेल्वेस्थानकांवर नजर फिरवली असता यात थोडासा बदल करून 'प्लॅटफॉर्मवर राहून ट्रेनशीच वैर बाळगू नये' असं म्हणावसं वाटतंय. आपणापैकी कोणी गेल्या काही दिवसांत मुंबईच्या लोकल रेल्वे स्थानकांवर नजर फिरवली असल्यास जिकडे-तकडे टाटाच्या इंडिका इ व्ही 2 या गाडीच्या जाहिराती पाहायला मिळाल्या असतील. मोठ्या प्रमाणावर टाटाने रेल्वे स्थानकांवर याची जाहिरात केल्याने त्या पटकन डोळ्यांत भरण्यासारख्या आहेत. मात्र या जाहिराती प्रवाशांचं लक्ष खेचून घेण्यात यशस्वी ठरतायत त्याचं आणखी एक कारण म्हणजे या जाहिरातीतील आशय..


        
           पेट्रोल प्राइसेस मोकिंग यू टेक द ट्रेन? असा प्रश्न विचारून टाटाने आपल्या या इंडिका इ व्ही 2 गाडीची फ्युएल एफिशियन्सी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच आता पेट्रोलच्या महागाईमुळे तुम्हाला नाईलाजाने ट्रेनचा मार्ग पत्करावा लागतोय, तर मग आमच्या प्रतिलिटर 25 किमी पळणाऱ्या आणि भारतात सर्वात जास्त अॅव्हरेज देणाऱ्या गाडीची निवड करा आणि थोडक्यात ट्रेनचा प्रवास टाळा असाच संदेश या जाहिरातीतून देण्याचा प्रयत्न टाटाने केला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. एरव्ही या आशयाची जाहिरात फारशी आकर्षक ठरली नसती. मात्र टाटाने मोठी शक्कल लढवून रेल्वे स्थानकांतच मोठमोठाले बॅनर लावून ही जाहिरात केल्याने हा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.  हे सगळं पाहिल्यानंतर रेल्वेने आपल्या स्थानकांवर जाहिराती स्वीकारताना त्या जाहिरातीचा आशय एकदाही पाहू नये का ? का ते पाहूनही रेल्वेला त्यात आक्षेपार्ह काहीच वाटत नाहीये ? असे अनेक प्रश्न पडलेयत. हे म्हणजे मुंबईत मटाने लोकसत्तामध्येच आपली जाहिरात छापण्यासारखा प्रकार आहे.

       पुन्हा आत्ताच या पोस्टसाठी फोटो शोधता शोधता एका ब्लॉगवर या जाहिरातीतील आणखी एक विचित्र गोष्ट लक्षात आली. या ब्लॉगवर टाटाच्या या जाहिरातीतील एक फोलपणाही उघड केलाय. या जाहिरातीच्या खालच्या बाजूला छोट्याशा अक्षरात  एआरएआयने ही गाडी सीआरफोर इंजिनमध्ये 25 किमी प्रतिलिटर पळत असल्याचा दाखला दिला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पण मग डिझेल इंजिनवर गाडी हा परफॉर्मन्स देत असताना जाहिरातीत पेट्रोलचा उल्लेख अशारितीने करणे म्हणजे ग्राहकांची फसवणूक करण्यासारखेच झाले नाही का ? 

Sunday, March 20, 2011

उपउपांत्य लढती

विश्वचषकातील उपउपांत्य लढतींचे वेळापत्रक...

१.  २३ मार्च २०११, बुधवार - पाकिस्तान वि. वेस्ट इंडिज - शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडियम, मीरपूर (दुपारी २)

२. २४ मार्च २०११, गुरूवार - भारत वि. ऑस्ट्रेलिया - सरदार पडेल स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद (दुपारी २.३०)

३. २५ मार्च २०११, शुक्रवार - न्यूझीलॅंड वि. द. आफ्रिका -  शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडियम, मीरपूर (दुपारी २)

४. २६ मार्च २०११, शनिवार - श्रीलंका वि. इंग्लंड - आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो (दुपारी २.३०)



Saturday, March 19, 2011

प्रेक्षकच, पण जरासा हटके!!!

यंदाच्या वर्ल्डकपची तिकिटं मिळवताना सामान्य प्रेक्षकाला किती हालअपेष्टा सहन कराव्या लागतायत हे आपण पाहतोय, अनुभवतोय. अशा स्थितीत खुद्द सचिन तेंडुलकरच तुमच्यासाठी मॅचचं तिकिट पाठवत असेल तर.. किंवा मग मैदानावर जाऊन मॅच पाहण्यासाठी क्रिकेट बोर्डच तुम्हाला स्पॉन्सर करू लागलं तर.. अशक्य वाटतंय ना ? पण खरंच काही नशीबवान लोक हे प्रत्यक्षात अनुभवतायत...

बार्मी आर्मी, चाचा क्रिकेट आणि खुद्द सचिनकडूनच मॅचची तिकिटं मिळवणारा त्याचा खास चाहता...

              
      उत्तरोत्तर रंगत चाललेल्या या विश्वचषकात आपल्याला प्रत्येक संघ जीव तोडून खेळताना दिसतोय. मात्र मैदानावर हे विविध संघांचे खेळाडू घाम गाळत असताना स्टेडियममध्येही काही कमी हलचल नाहीये. आपण पाहिलंच असेल, टी. व्ही.वर विश्वचषकाचे सामने पाहत असताना अनेकदा कॅमेरा प्रेक्षकांमध्ये फिरवला जातो आणि असंख्य फॅन्स मोठ्या उत्साहाने आपापल्या टीम्सना चीयर करताना, प्रोत्साहन देताना दिसतात. या स्टेडियममधील प्रत्येकजण हा क्रिकेटवेडा असला, तरी त्यातही काही प्रेक्षक मात्र आपला खास असा ठसा उमटवून जातात. खरंतर आता त्यांना फक्त प्रेक्षक म्हणणंही चुकीचंच ठरेल. कारण ही मंडळी आता त्यापलीकडे गेली असून आपापल्या संघाचे ते ब्रॅण्ड अॅम्बेसिडरच बनले आहेत. भारत, पाकिस्तान, इंग्लंड अशा विविध देशांच्या बाबतीत आपल्याला असे हे खास प्रेक्षक पाहायला मिळतात.


गेल्या काही वर्षांत भारताचे सामने पाहताना एक चेहरा आपल्याला वारंवार नजरेस पडतो. संपूर्ण अंग तिरंगी रंगात रंगवलेला, पाठीवर तेंडुलकरचे नाव आणि १० नंबर लिहिलेला हा चाहता माहीत नसलेला भारतीय क्रिकेट फॅन सापडणं कठीणच! अंगावरील तिरंग्याबरोबरच डोक्यावर भारताचा नकाशा असलेला हेयरकट आणि हातात सतत फडकत असलेला तिरंगा या त्याची ओळख पटवून देणाऱ्या आणखी काही खास गोष्टी. यंदाच्या विश्वचषकात तर त्याने याच्याही पुढे जाऊन आपल्या डोक्यावर विश्वचषकाची प्रतिकृतीच धारण केलीये. या भारतीय क्रिकेट टीमच्या आणि सचिन तेंडुलकरच्या निस्सीम भक्ताचं नाव आहे सुधीर कुमार गौतम (सुधीर कुमार चौरसिया). बिहारच्या या पठ्ठ्याने २००२ सालापासून भारतात खेळल्या गेलेल्या जवळपास सर्व सामन्यांना हजेरी लावली आहे. मुख्य म्हणजे त्याला या सर्व सामन्यांची तिकिटं ही खुद्द सचिन तेंडुलकरकडून मिळतात असं म्हंटलं जातं. बिहारमधील हा क्रिकेटवेडा हे सामने पाहण्यासाठी चक्क सायकलीवरून मैलोन् मैल रपेट करतो. आणि बहुतेकवेळा एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी ट्रेनमधला प्रवास तर चकटफूच असतो. भरताचा सामना सुरू असताना किमान 4-5 वेळा तरी सुधीर कुमारवर कॅमेरा रोखला जातोच.

भारताच्या या सुधीर कुमार प्रमाणेच पाकिस्तानच्या सामन्यांना नेहमीच हजेरी लावणारी वक्ती म्हणजे पाकिस्तानचे लाडके चाचा. चौधरी अब्दुल जलील ऊर्फ चाचा क्रिकेट. मैदानावर संपूर्णपणे हिरव्या झग्यात असलेल्या आणि पाकिस्तानचा झेंडा फडकावणाऱ्या चाचांची क्रिकेट विश्वात नेहमीच चर्चा असते. हिरव्या झग्याबरोबरच त्यांची पांढरीशुभ्र दाढी हे त्यांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. पंजाबमधील सियालकोट येथे जन्मलेले चाचा दुबईमध्ये नोकरी करत असताना तेथे नियमितपणे पाकिस्तानचे क्रिकेट सामन्यांना हजेरी लावत असत. त्यांच्या विशिष्ट स्टाइलमुळे अल्पावधीतच त्यांना पाकिस्तान क्रिकेटमध्ये लोकप्रियता लाभली. मग नंतर तर त्यांनी क्रिकेटसाठी आपल्या नोकरीचाच राजीनामा देऊन टाकला आणि जगभर ते पाकिस्तानच्या सामन्यांना हजेरी लावू लागले. उत्तरोत्तर तर त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेच त्यांना पुरस्कृत केले आणि सध्या चाचांच्या प्रवासाचा, तिकिटाचा सगळा खर्च पाकिस्तान क्रिकेट बोर्डातर्फे केला जातो. आज चाचा क्रिकेट संपूर्ण क्रिकेटविश्वत पाकिस्तानची एक ओळख बनून राहिले आहेत.

      खंरतर सुधीर कुमार गौतम म्हणा किंवा चाचा हे दोघही वैयक्तिकरित्या आपापल्या देशासाठीचीयर करताना दिसतात. मात्र क्रिकेट जगतात सर्वप्रथम प्रसिद्ध झालेली प्रेक्षकांची चीयर टीम म्हणजे इंग्लंडची बार्मी आर्मी. या बार्मी आर्मीचा इतिहास मोठा रंजक आहे. ९४-९५ साली ऑस्ट्रेलियात झालेल्या अॅशेस मालिकेत बार्मी आर्मीचा उदय झाला. तेव्हापासून ही चाहत्यांची आर्मी इंग्लिश आर्मीच्या पाठीशी उभी राहिली आहे. गौतम किंवा चाचांपेक्षा यांचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रुपग्रुपने मिळून याचे सदस्य जगभरातील इंग्लंडच्या सामन्यांना हजेरी लावत असतात. गेल्या काही वर्षांत जसजशी बार्मी आर्मीची लोकप्रियता वाढत गेलीये तसा त्यांनी आपला आवाकाही वाढवला आहे. आता फक्त मैदानावर जाऊन आपल्या संघाला प्रोत्साहन देणे इतकंच या ग्रुपचं स्वरूप मर्यादित राहिलं नाहीये. तर त्याबरोबरच त्यांनी प्रेक्षकांना सहजरीत्या इंग्लंडच्या सामन्यांची तिकिटं मिळवून देणे, टूर पॅकेजेस देणे अशा नवनवीन गोष्टींनी आपला पसारा वाढवलाय. बार्मी आर्मीचं स्वत:चं मॅगझीनही निघतं. या ग्रुपचे खास डिझाइन केलेले कपडेही इंग्लिश फॅन्समध्ये हिट आहेत. आज बार्मी आर्मीचे फक्त इंग्लंडमध्येच नाही तर जगभरात हजारो सदस्य आहेत. इंग्लिश संघाचे कट्टर समर्थक म्हणून जरी त्यांची ओळख असली तरी विरोधी संघाशीही त्यांचं तितकंच जिव्हाळ्यांच नातं आहे. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राच्या फाऊंडेशनसाठी यंदा बार्मी आर्मीने तब्बल ३७,५०० डॉलर्स इतका निधी उभा केलाय. आज बार्मी आर्मीला असंख्य पुरस्कर्ते लाभले असून ती एक वेगळ्या अर्थाने फॅन्सची चळवळच उभी राहिली आहे. बार्मी आर्मी म्हणा, चाचा क्रिकेट म्हणा किंवा आपला सुधीर कुमार, आपलं क्रिकेटवेड ही मंडळी एका हटके अंजादात व्यक्त करतायत.. आणि या हटके अंदाजाबरोबरच त्यांनी या खेळालाही एक नवं परिमाण मिळवून दिलंय
                                                              

Thursday, March 17, 2011

...तर भारत विश्वचषकाबाहेर !!!



हो, ... तर भारत बाद फेरीतच या हाय वोल्टेज विश्वचषकाबाहेर होऊ शकतो. ९ मार्चला नेदरलॅंडविरूद्धचा सामना जिंकल्यानंतर अनेकांची अशी समजूत झाली होती की, आता भारत उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला सुद्धा.. काही वर्तमानपत्रांनीही या आशयाची बातमी छापली होती. मात्र त्यानंतर आणखी एक-दोन धक्कादायक निकाल लागल्यानंतर आणि आज इंग्लंडने वेस्ट इंडिजला नमवल्यानंतर सगळ्यांनाच खाडकन् जाग आली असेल.
आजच्या निकालामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान अधांतरीच असून त्यांना बाद फेरीतच विश्वचषकातून एक्झिट घेण्याची नामुष्की पत्करावी लागू शकते. अर्थात असं होण्याची शक्यता सध्या खूप खूप कमी आहे. मात्र या विश्वचषकातील आतापर्यंतचे धक्कादायक निकाल पाहता ही शक्यता पूर्णपणे नाकारताही येत नाही. 

भारताचा समावेश असलेल्या ब गटात भारतासह द. आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांग्लादेश, आयर्लंड आणि नेदरलॅंड अशा सात संघाचां समावेश करण्यात आलेला आहे. आणि यातील अव्वल चार संघ हे उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. 

सुरूवातीपासूनच ग्रुप ऑफ डेथ मानल्या गेलेल्या या गटात आजच्या इंग्लंडच्या विंडिजवरील रोमहर्षक विजयाने पुन्हा एकदा  सगळी समीकरण बदलून ठेवली आहेत. आज इंग्लंडला विंडिजने मात दिली असती, तर इंग्लंड या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला असता आणि भारत, आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांग्लादेश हे चार संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवण्यात यशस्वी ठरले असते. मात्र आजच्या या विजयाने इंग्लंडने स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले असून भारत, बांग्लादेशच्या आणि वेस्ट इंडिजच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण पसरले  आहे. आयर्लंड आणि नेदरलॅंडचे संघ हे यापूर्वीच स्पर्धेबाहेर फेकले गेले आहेत. 

सध्याची स्थिती- सध्या या गटात द. आफ्रिका ८ गुण पटकावून अव्वल स्थानावर आहे आणि त्यांनी याआधीच उपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा पक्की केली आहे. त्यानंतर मात्र उरलेलेल्या तीन जागांसाठी वेस्ट इंडिज, भारत, इंग्लंड आणि बांग्लादेश या चार संघांत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. 
आजच्या सामन्यानंतर इंग्लडचे  साखळी फेरीतील सर्वच्या सर्व सहा सामने संपले असून त्यातून त्यांचे ७ गुण झाले आहेत. तर या रेसमध्ये असलेल्या चौघापैंकी  भारत आणि विंडीजचे संघ त्यांच्या अखेरच्या साखळी सामन्यात एकमेकांसमोरच उभे ठाकणार आहेत. यापैकी भारताचे ७ तर विंडीजचे ६ गुण झाले आहेत. उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीत असलेल्या बांग्लादेशच्याही खात्यात ६ गुण जमा असून त्यांचा अखेरचा साखळी सामना द. आफ्रिकेशी होणार आहे. त्यामुळे थोडक्यात सांगायचे तर या ग्रुपचे संपूर्ण भवितव्य आता शनिवारी होणारा बांग्लादेश वि. द. आफ्रिका आणि रविवारी होणारा भारत वि. वेस्ट इंडिज या अखेरच्या दोन साखळी सामन्यांवर अवलंबून आहे. 

प्रत्येक संघासाठी संधी-

बांग्लादेश-

बांग्लादेशचा अखेरचा साखळी सामना शनिवारी बलाढ्य द. आफ्रिकेविरूद्ध आहे. बांग्लादेशचे सध्या ६ गुण झाले असून या सामन्यात त्यांनी विजयाची नोंद केल्यास त्यांचे एकूण आठ गुण होतील आणि ते त्याक्षणी उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. मात्र या सामन्यात पराभव पदरी पडल्यास ते सहाच गुणावंर अडकतील व त्यांच्यासाठी शेवटच्या सामन्यात भारताने विंडिजला हरवणे आवश्यक होऊन जाईल. तसे झाल्यास विंडिज आणि बांग्लादेश या दोघांचे ६-६ गुण होतील. मात्र याक्षणी वेस्ट इंडिजचा नेट रनरेट(+1.650) हा बांग्लादेशच्या नेट रन रेट पेक्षा(-०.७६५) खूपच जास्त असल्याने सरस धवगतीच्या जोरावर विंडीजच पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल असं म्हणता येईल. ( सगळं नेट रनरेटवर अवलंबून) थोडक्यात बांग्लादेशला बाद फेरीत प्रवेश मिळवायचा असल्यास द. आफ्रिकेला हरवणे (अर्थात ती काही खायची गोष्ट नाही) हा एकच राजमार्ग  उपलब्ध आहे.

वेस्ट इंडिज-

वेस्ट इंडिजचेही आता ६ गुण झाले असून त्यांचा अखेरचा साखळी सामना भारताविरूद्ध आहे. या सामन्यात त्यांनी विजय मिळवल्यास ते ही बिनदिक्कत बाद फेरीसाठी पात्र ठरतील. मात्र हार सहन करावी लागल्यास मामला पुन्हा रनरेटवर येईल आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे बांग्लादेशचा आफ्रिकेविरूद्ध पराभव झाल्यास नेट रनरेटवर ते सरस ठरून आगेकूच करू शकतात. त्यामुळे इन शॉर्ट वेस्ट इंडिजसाठी भारताविरूद्ध विजय= थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश आणि पराभव पदरी पडल्यास बांग्लादेशही आफ्रिकेविरूद्ध हरलेला असणं गरजेचं. (बांग्लादेशपेक्षा जास्त नेट रन रेट कायम असावा)
  

भारत-

इंग्लंडबरोबरच्या टाय सामन्याच्या कृपेने सात गुण बाळगून असलेला भारत अखेरच्या साखळी सामन्यात विंडिजला टक्कर देईल. सामना जिंकल्यास बाद फेरीची दारं आपसूक उघडतील. मात्र हा सामना गमावूनही भारताला सरस धावगतीच्या जोगावर पुढे वाटचाल करण्याची सर्वात जास्त संधी आहे. मात्र अगदीच शक्यता कमी असलेला पर्याय म्हणजे भारताला विंडिजकडून खूप दारूण पराभवाला सामोरं जावं लागणं. असं झाल्यास आणि भारताची धावगती इंग्लंडपेक्षा कमी झाल्यास करोडो भारतीयांची विश्वचषक जिंकण्याची स्वप्न (आणि आयसीसीची पैसा कमावण्याची ;) ) स्वप्नं धुळीला मिळतील. (पण पुन्हा एकदा.. याची शक्यता खूप म्हणजे खूपच कमी आहे)


भारतासाठी आणि एकंदर ग्रुपसाठी शक्यता-

१) भारत विंडीजविरूद्ध विजयी, बांग्लादेश आफ्रिकेविरूद्ध विजयी- 

भराताचे नऊ गुण होतील आणि ते गटात अव्वल क्रमांकावर पोहोचतील, तर आफ्रिका आणि बांग्लादेश ८-८ गुणांसहित धावगतीनुसार दुसऱ्या व तिसर्या क्रमांकावर पोहोचतील. आणि वेस्ट इंडिजच्या ६ गुणांच्या तुलनेत आपल्या ७ गुणांच्या जोरावर इंग्लड सरस ठरेल आणि चौथा क्रमांक पटकावून बाद फेरीत प्रवेश करेल. वेस्ट इंडिज बाहेर!!!

२) भारत विंडिजविरूद्ध विजयी, बांग्लादेश आफ्रिकेविरूद्ध पराभूत-

पुन्हा एकदा भारताचे नऊ गुण होतील. मात्र आफ्रिकेने बांग्लादेशला नमवल्याने त्यांचे १० गुण होऊन ते अव्वल क्रमांक काय राखतील आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर स्थानापन्न होईल. इंग्लंडचे ७ गुण असल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर येतील. आता बांग्लादेश आणि वेस्ट इंडिजचे समसमान म्हणजेच ६ गुण होतील. मात्र आत्ताची धावगतीतीत मोठी तफावत पाहता विंडिज बांग्लादेशच्या पुढे निघून जाईल आणि बाद फेरीसाठी पात्र ठरेल.  बांग्लादेश आऊट!!!

३) भारत विंडिजविरूद्ध पराभूत, बांग्लादेश आफ्रिकेविरूद्ध विजयी-

भारताविरूद्ध जिंकल्यास विंडिजचे ८ गुण होतील तर बांग्लादेशही आफ्रिकेवरील विजयासह ८ गुणांवर येऊन पोहोचेल. पराभवामुळे आफ्रिकाही ८ गुणांवरच अडकेल. परिणामत: हे तिन्ही संघ  धावगतीप्रमाणे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहतील. तर भारत आणि इंग्लंड या दोघांचे ७-७ गुण होतील. सध्याच्या धवगतीप्रमाणे भारत(+०.७६८) इंग्लडपेक्षा (+०.०७२) खूप खूप पुढे आहे. त्यामुळे अगदीच दारूण आणि अविश्वसनीय पराभव भारताच्या पददी पडला नाही तर ते सरस धवगतीच्या जोरीवर इंग्लंडला मागे टाकतील आणि चौथ्या क्रमांकावर झेप घेऊन बाद फेरी गाठतील. इंग्लंड स्पर्धेबाहेर!!!

(फक्त याच शक्यतेत भारताला थोडासा धोका संभावतो.. कारण इकडे मामला रनरेट वर येणार आहे. याक्षणी भारताचा रनरेट इंग्लंडपेक्षा खूप सरस आहे. मात्र वेस्ट इडिजविरूद्ध भारताचा अगदी दारूण पराभव झाल्यास त्यांचा रनरेट खाली घसरू शकतो. आणि या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.)

( अगदी खोलात जायचे म्हटल्यास धावगतींच्या नियमांप्रमाणे भारत हा सामना हरताना त्यांच्या आणि विंडीजच्या धावगतीत ३.४ पेक्षा जास्त अंतर असून नये. म्हणजे भारतच इंग्लंडपेक्षा सरस ठरेल. उदाहरणार्थ विंडिजने प्रथम फलंदाजी करताना ६ च्या धावगतीने ३०० धावा केल्या. तर भाराताला (५० षटाकंच्या हिशेबाने) २.६ च्या गतीने, म्हणजेच सरळ सांगायचे झाल्यास १३० धावा तरी करता यायला हव्यात. मात्र विंडिजच्या ३०० च्या आसापस धावसंख्येला प्रत्युत्तर देताना १०० वगैरे करून आपला संघ ढेपाळला तर इंग्लंडसाठी ते वरदान ठरेल आणि भारताला मागे टाकून ते उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील.)

४) भारत विंडिजविरूद्ध पराभूत, बांग्लादेश आफ्रिकेविरूद्ध पराभूत-

आफ्रिका १० गुण पटकावून अव्वल स्थान पटकावेल. तर वेस्ट इंडिजचे ८ गुण होतील आणि ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतील. भारत आणि इंग्लंडचे सात गुण झाल्याने ते तिसऱ्या , चौथ्या क्रमांकावर राहतील. आणि परिणामत: बांग्लादेशला आपला गाशा गुंडाळावा लागेल. बांग्लादेश बाहेर !!!

(खास बाब- हाहाहा... एवढी क्लिष्ट मांडणी करताना मी एक गोष्ट मात्र बाजूला ठेवून चाललोय. ती टाय किंवा रद्द सामन्याची. आता या दोनपैकी एकजरी सामना टाय झाला तर आणखी वेगळी समीकरणं तयार होतील. त्यामुळे त्याच्या खोलात जात नाही. मात्र आपल्याला दिलासा म्हणजे कोणताही सामना टाय किंवा रद्द झाला, तर भारताला फायदाच होईल आणि ते कोणत्याही स्थितीत बाद फेरी गाठतील. (इकडेही खरंतर बांग्लादेशबरोबर नेट रनरेटची तुलना होऊ शकतो.पण नाही रे.. क्रिकेट हा कितीही अनिश्चिततेचा खेळ असला तरी काहीतरी लिमिट आहे ना... च्यायला असं करत बसलो तर झालंच मग...)

असो, बाकी काही होऊदे. माझा सिक्स्थ सेन्स सांगतोय की, भारत नक्कीच उपांत्यपूर्व फेरी गाठणार (आणि बहुतेक बांग्लादेशचा टाट-बाय बाय होणार). त्यामुळे खरंतर मी माझ्याच लेखाच्या पहिल्याच ओळीला चॅलेंज करतोय. आय होप हे सगळं वाचून तुमचं डोकं गरगरायला नाही लागलंय. काय करणार.. आफ्टर ऑल इट्स अ गेम ऑफ नंबर्स!!! इजन्ट इट ???


Tuesday, March 15, 2011

द मेकिंग ऑफ क्रिकेट बॅट !!!


असं म्हंटलं जातं की, मुंबईतील मूल ज्यावेळी हातात पाटी-पेन्सिल घेतं, त्यापेक्षाही आधी क्रिकेटच्या बॅटला ते सरावलेलं असतं. क्रिकेट हा धर्म मानल्या जाणाऱ्या भारतात क्रिकेटची किती क्रेझ आहे हे आता मी सांगायची गरज नाही. मात्र क्रिकेट या खेळाइतकंच लहानपणीच्या गल्ली क्रिकेटपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळताना क्रिकेटर्सना सदासर्वकाळ सोबत करणारी त्यांची बॅट कशी बनते हे पाहणंही मोठं रंजक आहे. आज सहज नेटवर सर्फ करत असताना क्रिकेट बॅटच्या निर्मिती प्रक्रियेचा छोटासा पण खूप माहितीपूर्ण व्हिडीयो सापडला. यात लाकडापासून टप्प्याटप्प्याने एखादी सुबक बॅट कशी तयार केली जाते याचे कॉमेन्ट्रीसह छान वर्णन करण्यात आले आहे. ज्या 'दे घुमा के' च्या तालावर आज आपण नाचतो त्या बॅटची ही निर्मिती प्रक्रिया प्रत्येक क्रिकेटप्रेमीने आवर्जून पाहावी अशीच आहे.



Monday, March 7, 2011

चोकर्स !!! क्लुस्नरनं कमावलं डोनाल्डनं गमावलं…




खरंतर कोणताही शब्द हा एखाद्या गोष्टीला ओळख प्राप्त करून देत असतो. चोकर्स या विशिष्ट शब्दाच्या बाबतीत मात्र ही परिस्थिती नेमकी उलट झालेली आढळते. सध्या चोकर्स या शब्दाचीच ओळख द. आफ्रिकेवरून आणि त्यांच्या शेवटच्या क्षणी कचखाऊ कामगिरी करण्याच्या सवयीवरून होऊ लागली आहे. क्रिकेटमध्ये चोकर्स म्हणजे द आफ्रिका आणि द. आफ्रिका म्हणजे चोकर्स हे समीकरण इतकं रूढ झालंय की या शब्दाचा मुळात वेगळाही काही अर्थ आहे हेच लोकांच्या विस्मरणात गेलं आहे. कालच्या सामन्यात पुन्हा एकदा इंग्लंडविरूद्ध आफ्रिकेने आपल्यावरी चोकर्स हा टॅग सार्थ ठरवला. यानिमित्ताने १९९९ सालच्या विश्वचषकातील उपान्त्य फेरीतील थरारक सामन्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

१७ जून १९९९... स्थळ- एजबिस्टन ग्राऊंड, बर्मिंगहॅम... विश्वचषकातील अत्यंत महत्त्वाचा उपांत्य फेरीचा सामना. पोलॉक आणि डोनाल्डच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला अवघ्या २१३ या धावसंख्येवर रोखण्यात यश मिळवलं होतं. बेवन आणि स्टीव वॉ तसेच काही प्रमाणात पॉन्टिंग वगळता इतर कोणत्याही खेळाडूला ऑस्ट्रेलियातर्फे चमक दाखवता आलेली नव्हती. त्यांचे चार खेळाडू तर भोपळा न फोडताच माघारी परतले होते. बेवन आणि वॉच्या अर्धशतकी खेळीही अत्यंत संथ गतीने झाल्या होत्या.  त्यामुळे ४९.२ षटकांत सर्वबाद २१३ धावा अशी मजल मारून ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी तसेच अंतिम पेरीत प्रवेश मिळवण्यासाठी २१४ चं लक्ष्य ठेवलं होतं. यावेळी पोलॉक आणि डोनाल्ड यांनी अनुक्रमे ५ आणि ४ बळी मिळवत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

१९९२ च्या विश्वचषकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यापासून प्रत्येकवेळी द. आफ्रिकेच्या संघाला स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार मानण्यात येत असे. मात्र तरीही प्रत्यक्षात त्यांना वर्ल्डकप जिंकण्यात अपयश आलेलं होतं. आणि हा इतिहास बदलण्याची हीच ती वेळ असा निश्चय करून आफ्रिकेचे फलंदाज यावेळी मैदानावर उतरले होते. गिब्स आणि कर्स्टनच्या सावध सुरूवातीनंतर आणि ४८ धावांच्या सलामीनंतर मात्र शेन वॉर्नने आपला जलवा दाखवला आणि द. आफ्रिकन फलंदाजांना आपल्यासमोर गुडघे टेकण्यास भाग पाडले. आफ्रिकेची वरची फळी वॉर्नने एकहाती कापून काढली आणि १ बाद ४८ वरून त्यांची अवस्था ४ बाद ६१ अशी करून टाकली. यानंतर मात्र जॉन्टी ऱ्होड्स आणि जॅक कॅलिसने भक्कम भागीदारी करत पुन्हा एकदा सामन्याचं पारडं आफ्रिकेच्या दिशेने झुकवलं. हे दोघेही बाद झाले तेव्हा आफ्रिकेचा धावफलक होता ४५ षटकांत ६ बाद १७५ धावा. मात्र याक्षणी आफ्रिकेच्या पारड्यात असलेली एकच महत्त्वाची आणि सकारात्मक गोष्ट म्हणजे त्यांची अत्यंत खोलवर असलेली फलंदाजी. त्यांचा मार्क बाऊचरसारखा खेळाडू नवव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास येणार होता. त्यामुळे आफ्रिकेच्या आशा अजूनही जिवंत होत्या. भरवशाचा लान्स क्लुस्नरही खेळपट्टीवर होता. शेवटी अखेरच्या २ षटकांत क्लुस्नर आणि बाऊचर फलंदाजी करत होते आणि शेवटच्या तीन विकेट हाताशी असताना आफ्रिकेला  विजयासाठी १८ धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाचा हुकमी गोलंदाज ग्लेन मॅकग्राने ४९ व्या षटकातील पहिल्या चार चेंडूंमध्ये अप्रतिम गोलंदाजी करून केवळ २ धावा देत बाऊचरचा त्रिफळा उडवला तर एलवर्थीही यादरम्यान धावचीत झाला. यानंतर उरलेल्या १० चेंडूंमध्ये १६ धावा करण्याचं आव्हान आफ्रिकेसमार होतं आणि क्लुस्नरच्या साथीला शेवटचा खेळाडू डोनाल्ड आला होता. सामना जवळपास ऑस्ट्रेलियाच्या खिशात गेलाच अशी लोकांची भावना झाली होती. मात्र त्याचवेळी आपल्या तडाखेबंद फलंदाजीने पुढच्या चार चेंडूंमध्ये क्लुस्नरने संपूर्ण सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. त्याने आधी मॅकग्राच्या पाचव्या चेंडूवर एक षटकार ठोकला आणि मग शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत अंतिम षटकासाठी स्ट्राइक आपल्याकडेच ठेवला. त्यानंतर डॅमियन फ्लेमिंगच्या शेवटच्या षटकात पहिल्या दोन चेंडूतच दोन खणखणीत चौकार ठोकत क्लुस्नरने धावसंख्या बरोबरीतही करून टाकली आणि काही मिनिटातच अवघ्या चार चेंडूंमध्ये त्याने आफ्रिकेला विजयाच्या तोंडाशी आणून ठेवलं.. आता चार चेंडूत हवी होती फक्त एक धाव... वर्ल्डकपमध्ये प्रथमच अंतिम फेरी गाठण्यापासून आफ्रिका फक्त एक धाव लांब होती... फ्लेमिंगचा चौथा चेंडू क्लुस्नरने लेगसाइडला मारला... विजयी धाव घेण्यासाठी डोनाल्ड लगेच चार पावलं पुढे सरकला होता... मात्र झपकन पुढे सरसावत डॅरन लिहमनने चेंडू पकडला  आणि नॉनस्ट्रायकर एंडवरील यष्टींवर थ्रो केला.. डोनाल्ड माघारी फिरला असला तरी अजून क्रीझबाहेरच होता... लाखो अफ्रिकन्सचा श्वास दोन सेकंदांसाठी तिथेच अडकला... मात्र लिहमनचा थ्रो थोडक्यासाठी चुकला... आणि आफ्रिकन खेळाडूंनी हुश्श केलं !!! पण  नियतीला आफ्रिकेचं हे जीवदान मंजूरच नव्हतं म्हणायचं... कारण पुढच्याच चेंडूवर सगळं काही व्यर्थ गेलं... फ्लेमिंगचा चौथा चेंडू ऑफसाइटला यॉर्कर लेंग्थला पडला.. तो नीट टायमिंग न झाल्याने धीम्या गतीने सरळ पुढे गेला. नॉन स्ट्रायकर एंडला धावचीत होण्याची शक्यता असल्याने क्लुस्नर चेंडू तटवताच जीवाच्या आकांताने पळत सुटला होता. इथे मिडऑफला क्षेत्ररक्षण करणाऱ्या मार्क वॉनेही चेंडूवर झडप घालत धडपडत का होईला पण तत्काळ थ्रो केला होता. नॉन स्ट्रायकर एंडवर थोडक्यात त्याचा नेम चुकला आणि क्लुस्नर य़शस्वीपणे क्रीझमध्ये पोहोचला... पण डोनाल्ड कुठे होता??? दुर्दैवाने डोनाल्डही अजून नॉन स्ट्रायकर एंडवरच थांबला होता.. चेंडू कुठे जातोय हे बघत राहिल्याने समोरून धावत येणाऱ्या क्लुस्नरकडे त्याचं लक्षच नव्हतं.. अखेर क्लुस्नरही त्याच्यापर्यंत पोहोचल्यावर डोनाल्ड महाशय ताळ्यावर आले... मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता... वॉने थ्रो केला केलेला चेंडू फ्लेमिंगने कलेक्ट करून तोपर्यंत यष्टिरक्षक गिलख्रिस्टकडे फेकला होता आणि गिलख्रिस्टने डोनाल्ड खेळपट्टीच्या मध्यापर्यंतही पोहोचण्यापूर्वीच बेल्स उडवून जल्लोषालाही सुरूवात केली होती... ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेच्या तोंडचा घास हिरावला होता... खरंतर सामना बरोबरीत (टाय) सुटला होता... मात्र विश्वचषकातील या सामन्यापूर्वीच्या सरस कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेवर कडी करत अंतिम फेरीत धडक मारली होती... दुर्दैवाने आफ्रिकेने पुन्हा एकदा आपला चोकर्स हा टॅग सार्थ ठरवला होता !!!

हॅट्ट्रिकची ट्रिक !!!



      वेस्टइंडिजच्या किमर रोचने सोमवारी नेदरलॅंडविरूद्ध खेळताना हॅट्ट्रिकची किमया साधली. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील ही सहावी हॅट्ट्रिक ठरली. यापूर्वी विश्वचषकात एकूण पाच हॅट्ट्रिक्स नोंदवल्या गेल्या असून त्यापैकी दोन श्रीलंकन गोलंदाजांच्या नावावर आहेत तर भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया यांच्या गोलंदाजाने प्रत्येकी एकदा ही किमया साधली आहे. विशेष म्हणजे भारताच्या चेतन शर्मानेच १९८७ साली विश्वचषकातील पहिल्या हॅट्ट्रिची नोंद केली होती. त्यानंतर १९९९ मध्ये पाकिस्तानचा साकलेन मुश्ताक, २००३ मध्ये लंकेचा चमिंदा वास आणि कांगांरूंचा ब्रेट ली आणि आता गेल्या विश्वचषकात लंकेच्याच लसिथ मलिंगाने बोनससकट हॅट्ट्रिकचा मान मिळवला होता. तर यंदाच्या विश्वचषकात किमर रोचने हा मान मिळवला. रोचपूर्वी विश्वचषकात पाहयला मिळालेल्या पाच हॅट्ट्रिक्सचा हा आढावा..

चेतन शर्मा (भारत), प्रतिस्पर्धी – न्यूझीलॅंड, स्थळ- नागपूर, ३१ ऑक्टोबर १९८७

     रिलायन्स कपच्या अ गाटातील या साखळी सामन्यात न्यूझीलॅंडने प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर ४ बाद १८१ अशी मजल मारली होती. ६० धावांची भागीदारी झाल्यानंतर रूदरफोर्ड आणि पटेल यांचा जम बसला होता आणि आता शेवटच्या षटकांत हाणामारी करून ते आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभी करून देण्याच्या तयारीत होते. तेव्हाच रवी शास्त्रीने १८१ या धावसंख्येवर पटेलला कपिल देवकरवी झेलबाद केले आणि किवीजना एक धक्का बसला. तरी अजून त्यांचा निम्मा संघ खेळायचा होता. मात्र त्यानंतर धावसंख्येत एकाच धावेची भर घातल्यानंतर न्यूझीलंडचा डाव गडगडला. चेतन शर्माने अप्रतिम गोलंदाजी करत चक्क तीन चेंडूंत तीन फलंदाजांच्या यष्ट्या वाकवल्या. सर्वात आधी त्याने रूदरफोर्डची मधली यष्टी मोठ्या थाटात गुल केली. यानंतर फलंदाजीला आलेल्या इयन स्मिथलाही चेतन शर्माचा इनस्विंगर कळला नाही आणि तो सुद्धा क्लीन बोल्ड झाला. चेतन शर्मा आता हॅट्ट्रिकच्या उंबरठ्यावर होता आणि समोर होता इव्हान चॅटफिल्ड.. बचावात्मक खेळण्याच्या नादात चेतनचा लेग स्टंम्पवरील चेंडू कधी त्याला त्रिफळाचीत करून गेला हे त्याला कळेपर्यंत भारतीय खेळाडूंनी उड्या मारत जल्लोष करायला सुरूवात केली होती. त्यानंतर न्यूझीलॅंडला ५० षटकांत २२१ या धावसंख्येवरच समाधान मानावे लागले आणि भारतीयांनी सुनिल गावस्करच्या शतकी खेळीच्या जोरावर सामना आरामात आपल्या खिशात घातला. विशेष म्हणजे या तिन्ही विकेट्स मिळवताना चेतन शर्माने फलंदाजाला त्रिफळाचीत केले होते.

साकलेन मुश्ताक (पाकिस्तान), प्रतिस्पर्धी- झिम्बाब्वे, स्थळ- ओव्हल, ११ जून १९९९

    चेतन शर्मानंतर विश्वचषकातील दुसऱ्या हॅट्ट्रिकची नोंदही आशियाई खेळाडूनेच केली. पाकिस्तानच्या साकलेन मुश्ताकने १९९९ साली ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेचे शेवटचे तीन बळी घेताना हॅट्ट्रिक नोंदवली. यात त्याने २७१ चा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेची ७ बाद १२३ अशी अवस्था असताना हॅट्ट्रिक घेऊन त्यांचा डाव त्याच धावसंख्येवर संपवून टाकला. साकलेनने आधी ओलोंगा आणि हकलला यष्टिचित केले तर तिसऱ्या चेंडूवर बंगवाला पायचीत पकडत हॅट्ट्रिक साजरी केली आणि पाकिस्तानच्या विजयावरही शिक्कामोर्तब केले.

चमिंदा वास (श्रीलंका), प्रतिस्पर्धी- बांग्लादेश, स्थळ- पीटरमेरीत्झबर्ग, १४ फेब्रुवारी २००३

    वासची हॅट्ट्रिक ही क्रिकेटच्या इतिहासात नेहमीच लक्षात ठेवली जाईल. या हॅट्ट्रिकचे वैशिष्ट्य म्हणजे चमिंदा वासने सामन्याच्या पहिल्या तीन चेंडूंवरच बांग्लादेशचे तीन अव्वल फलंदाज बाद करत अवघ्या काही मिनिटांतच सामन्याचे चित्र स्पष्ट केले  होते. यावेळी बांग्लादेशचा धावफलक ३ बाद ० असा केविलवाणा झाला होता. पुन्हा याही पुढे जाऊन त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर वासने आणखी एक विकेट घेत बांग्लादेशचा चौथा गडीही बाद केला आणि विश्वचषकात अनोखा विक्रम प्रस्थापित केला.

ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया), प्रतिस्पर्धी- केनया, स्थळ- डर्बन, १५ मार्च २००३

     केनयाविरूद्ध खेळताना ब्रेट लीनेही सामना सुरू होऊन तीनच षटके झाली असताना हॅट्ट्रिक घेऊन केनयाची वरची फळी कापून काढली. धावफलकावर केनयाच्या अवघ्या तीन धावा लागल्या असताना त्याने लागोपाठच्या तीन चेंडूंवर ओटिएनो, बी.जी. पटेल आणि ओबुयाला बाद करत हा पराक्रम केला. विशेष म्हणजे लीने २०-२० मध्येही हॅट्ट्रिकची किमया साधली आहे.



लसिथ मलिंगा (श्रीलंका), प्रतिस्पर्धी- दक्षिण आफ्रिका, स्थळ- गयाना, २८ मार्च २००७

     विश्वचषक इतिहासातील किंबहुना एकूणच क्रिकेटमधील सर्वात थरारक हॅट्ट्रिक म्हणून मलिंगाच्या या हॅट्ट्रिकचा उल्लेख करावा लागेल. या हॅट्ट्रिकचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ही कामगिरी बलाढ्य संघाविरूद्ध नोंदवली गेली होती. यापूर्वीच्या तीन हॅट्ट्रिक्स या तुलनेने दुबळ्या संघांविरूद्ध पाहायला मिळाल्या होत्या. मात्र प्रतिस्पर्धी द. आफ्रिका असणं यापेक्षाही या हॅट्ट्रिकचं महत्त्व आणखी एका वेगळ्या कारणासाठी खूपच जास्त होतं. कॅरेबियन बेटांवर झालेल्या विश्वचषकातील या लढतीत श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना फक्त २०९ धावा केल्या होत्या. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे आफ्रिकेनं अगदी सहजरित्या विजयाच्या दिशेने आपली वाटचाल केली होती. ४४.४ षटकांतच त्यांनी ५ बाद २०६ अशी मजल मारली आणि ३२ चेंडू व पाच विकेट्स हाताशी असताना आणखी ४ धावा जमवणं म्हणजे निव्वळ फॉर्मेलिटी उरली होती. खरंतर यावेळी सगळेच सुस्तावलेले होते. कारण सामना तसा संपल्यातच जमा होता. मात्र ४५ वं षटक टाकायला आलेल्या मलिंगाने गयानाच्या या मैदानावर एक अद्भुत चमत्कार करून दाखवला. आफ्रिकेच्या निव्वळ फॅर्मेलिटी राहिलेला विजय मिळवण्याच्या मार्गात मलिंगा नावाचे प्रचंड वादळ उठले होते. बघताबघता मलिंगाने सामन्याचे चित्रच पालटून टाकलं आणि लंकेला विजयाच्या उंबरठ्यावर आणून उभं केलं... हो, विजयाच्या उंबरठ्यावर.. आधी पंचेचाळीसाव्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर त्याने लागोपाठ पोलॉक आणि हॉलचे बळी मिळवून आफ्रिकेला ७ बाद २०६ वर आणलं. त्यानंतर मध्ये ४६ व्या षटकात आफ्रिकेने एक धाव काढली. मात्र पुन्हा पुढच्याच षटकात मलिंगा आला आणि यापूर्वीच्या दोन सलग चेंडूंवर बळी मिळवलेले असल्याने त्याला हॅट्ट्रिकची संधी होती.. कॅलिसला संगकाराकरवी झेलबाद करत त्याने हॅट्ट्रिक तर साधलीच.. मात्र लगेच पुढच्याच चेंडूवर एनटीनीलाही क्लीन बोल्ड करत सामना आफ्रिकेच्या जबड्यातून खेचून बाहेर काढला... आफ्रिका ९ बाद २०७.. आफ्रिकेला जिंकायला आणखी तीन धावा तर लंकेला १ विकेट.. पीटरसन फलंदाजीला होता.. आणि अक्षरश:  फक्त नशीब बलवत्तर म्हणून तो मलिंगाच्या एका अफलातून चेंडूवर बचावला.. चेंडू ऑफस्टंम्पला अगदी काही मिलिमीटरने चुकवत संगकाराच्या ग्लोव्समध्ये विसवला होता. पुन्हा पुढचाच चेंडू बॅटची कड घेता घेता राहून गेला.. काही मिनिटातच सामन्याचे चित्र पालटले होते.. आतापर्यंत रिलॅक्स असलेल्या आफ्रिकेच्या ड्रेसिंग रूममध्ये सन्नाटा होता, तर लंकेच्या ड्रेसिंगरूममध्ये अनपेक्षित कमबॅकने वातावरणात जान आली होती.. मात्र पुन्हा एकदा शेवटी नशीबाने आफ्रिकेची साथ दिली आणि मलिंगाने टाकलेला एक चेंडू पीटरसनच्या बॅटची कड घेऊन दुसऱ्या स्लीपच्या जागेतून निघत सीमारेषेपार गेला आणि आफ्रिकेने हा सामना जिंकला.. यावेळी जयवर्धनेने दुसरी स्लीप का नाही ठेवली म्हणून बरीच टीका झाली.. दुसरी स्लीप असती तर... वगैरे चर्चा झडल्या.. पण ते म्हणतात ना, क्रिकेटमध्ये या जर-तरला काहीच अर्थ नसतो... शेवटी मलिंगाच्या चमत्कारानंतरही आफ्रिकेने सामना जिंकण्यात यश मिळवले होते हेच सत्य होतं.. प्रथमच विश्वचषकात हॅट्ट्रिक साधूनही त्या संघाला सामना जिंकण्यात अपयश आलं होतं...



Sunday, March 6, 2011

बूम बूम आफ्रिदी


     बुधवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी बम बम भोलेचा जयघोष केला असेल. दुसऱ्या दिवशी त्यात थोडासा बदल झाला आणि सगळीकडे बूम बूमचा आवाज घुमला. कोलम्बोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये लिंबूटिंबू कॅनडाविरूद्ध पाकिस्तानच्या दादा फलंदाजांनी लोटांगण घातल्यानंतर देशाची इभ्रत वाचवण्याची जबाबदारी गोलंदाजांवर येऊन पडली होती. आणि अखेर ती त्यांनी चोख बजावलीही. मात्र या बचाव मोहिमेत मुख्य गोलंदाजांपेक्षा कर्णधार आफ्रिदीच भाव खाऊन गेला. कधीकाळी फक्त आक्रमक फलंदाज म्हणून जगविख्यात झालेल्या आफ्रिदीने चक्क चेंडू हातात घेऊन आपल्या गोलंदाजीने पाकला हा सामना जिंकवून दिला. पण खरंतर आता यात इतकं काही  आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. कारण चेंडूने करामत दाखवण्याची आफ्रिदीची ही काही पहिलीच खेप नव्हती. या विश्वचषकात तर आपल्या फिरकी गोलंदाजीनेच देशाला सामने जिंकवून द्यायचे असं तो ठरवूनच आलेला दिसतोय. कारण पहिल्या सामन्यात केनयाविरूद्ध खेळताना त्याने प्रतिस्पर्ध्यांचे पाच गडी गारद केले. तर दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा आपल्या फिरकीची कमाल दाखवताना लंकेविरूद्ध चार बळी टिपत त्यांच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. आणि आता या सामन्यात पुन्हा एकदा पाच गडींची किमया... निव्वळ तीन सामन्यांत तब्बल १४ गडी गारद करत आफ्रिदी या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.
     परवाच्या इंग्लंड विरूद्ध आयर्लंडच्या सामन्यात ओब्रायनने विश्वचषकातील सर्वात वेगवान शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू केल्यानंतर अनेकांना आफ्रिदीची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. लगेच इंटरनेटवर शोधाशोध करून आतपर्यंतचे वेगवान शतकांचे विक्रम तपासले गेले. आणि अर्थात येथील यादीत सर्वप्रथम नाव सापडले ते बूम बूम आफ्रिदीचेच. इतरांपेक्षा खूपखूप पुढे जात आफ्रिदीने केवळ ३७ चेंडूतच शतक ठोकण्याचा पराक्रम १९९६ साली केला होता. नैरोबी येथील सामन्यात श्रीलंकेविरूद्ध खेळताना आफ्रिदीनामक तुफानाने लंकेच्या सर्व गोलंदाजांच्या पार चिंधड्या उडवल्या आणि तब्बल ११ षटकार आणि ६ चौकारांसहित हे आपले फटाफट शतक साजरे केले होते. ११ षटकार आणि ६ चौकार.. हो, आपण वाचताना कोणतीही चूक केली नाहीये. म्हणजे हिशेब लावायचा झाला तर ११ षटकारांच्या ६६ धावा आणि ४ चौकारांच्या १६ धावा अशा एकूण ८२ धावा तर त्याने उभ्याउभ्याच चेंडू सीमारेषेपार टोलावून मिळवल्या होत्या. धावा पळून काढण्यात त्याचे चांगलीच कंजूष केली होती असं म्हणावं लागेल. आता इतक्या वर्षांचा इतिहास असणाऱ्या क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचा मान पटकावणारा फलंदाज नक्कीच स्पेशल असला पाहिजे. गंम्मत म्हणजे ही एकच वेगवान शतकी खेळी करून थांबेल तो आफ्रिदी कुठला.. वेगवान शतकांच्या यादीतील पहिल्या १० खेळींमध्ये याच पठ्ठ्याच्या तीन-तीन इनिंग्स समाविष्ट आहेत. आता बोला... थोडक्यात काय तर निव्वळ आपल्या फलंदाजीच्या जोरावर हा अस्सल पठाणी जगातील काही सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवण्याचा हक्कदार आहे. क्रिकेट इतिहासात तब्बल २८८ षटकार मैदनाबाहेर भिरकावून देणाऱ्या या फलंदाजाची महती बाकी कशामुळेच कमी होऊ शकत नाही. त्याचं फूटवर्क, अतिउत्साहीपणा, संयमाचा कसलाही मागमूस नसणे अशा शंभर कमतरता काढता येतील, पण म्हणून त्याच्या क्षमतेवर शंका घेण्याचे अजिबात कारण नाही. हे झालं फलंदाजीचं.. पण हा लेख ज्या कारमामुळे लिहायला घेतलंय ते कारणच मुळी वेगळंय.. इकडेच त्याची महानता सिद्ध होते बघा. कारण फलंदाजीबरोबरच तो एक गोलंदाज म्हणूनही प्रतिस्पर्ध्यांसाठी तितकाच धोकादायक ठरला आहे. एकदिवसीय सामन्यांतील फलंदाजीचे नानाविध विक्रम आपल्या नावावर करतानाच गोलंदाजीतही तीनशेहून अधिक विकेट्स घेण्याची किमया आफ्रिदीने करून दाखवली आहे. अशी अष्टपैलू कामगिरी करणारे खेळाडू जागतिक क्रिकेटमध्ये हाताच्या बोटांवर मोजण्याइतके सापडतील. पुन्हा त्याच्या आकडेवारीपेक्षाही प्रत्यक्ष मैदानावरील त्याचे अस्तित्वच जास्त बोलके आणि आक्रमक आहे.
    फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी आजतागयत या खेळाडूचे अनेकांनी गोडवे गाऊन झाले असतील. मात्र सध्या जो आफ्रिदी दिसतोय तो आणखी वेगळा आहे. आणखी परिपक्व आहे. विश्वचषकापूर्वी पाक संघाच्या कर्णधार निवडीवरून मोठे वादळ उठले होते. संघ जाहीर करूनही त्यांच्या कर्णधाराचा मात्र पत्ता नव्हता. अखेरीस शेवटच्या क्षणी आफ्रिदीकडेच हा काटेरी मुकुट कायम ठेवण्यात आला आणि आपल्या संघाला विश्वचषकात योग्य दिशा दाखवण्याचे काम शाहिदवर येऊन पडले. बरोबर १९ वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील आणखी एका पठाणी खेळाडूने असंच आपल्या संघाला सक्षम नेतृत्व देत देशासाठी वर्ल्डकपरूपी भेट आणली होती. तो खेळाडू होता १९९२ मधील पाकिस्तानच्या विश्वविजयी संघाचा कर्णधार इम्रान खान.. आपल्या नेतृत्वगुणांसाठी आणि लिडींग फ्रॉम द फ्रंट अप्रोचसाठी ओळखला जाणारा इम्रान खान.. आज नेमकं त्याच पावलांवर पाऊल टाकत शाहिद आफ्रिदी मैदानावर लढतोय. पाकिस्तानच्या संघात तेव्हाही असेच वादविवाद होते आणि आताही परिस्थिती बदललेली नाहीये. खरंतर वादविवाद हे पाकिस्तान क्रिकेटच्या पाचवीलाच पुजलेले असतात. त्यामुळे ते चित्र कधीच बदलणार नाहीये. पण त्यांच्यातला आणखी एक स्वभावही कधीच बदलणार नाहीये. तो म्हमजे त्यांच्या लढवय्येपणा.. जिंकण्याची जिद्द आणि आक्रमकता.. १९९२ प्रमाणेच आजही या संघात तीच जिद्द, तोच लढवय्येपणा आणि सुदैवाने तसेच लढाऊ आणि स्वकर्तृत्ववान नेतृत्व मौजूद आहे. विश्वचषकाआधीपासूनच या संघाला सगळेच डार्क हॉर्स मानत होते. आणि आता सुरूवातीचे तीनही सामने जिंकून ते मोठ्या थाटात आगेकूच करतायत. या तिन्ही सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणारा आफ्रिदी या संघात असताना जगातील कोणताही संघ त्यांना कमी लेखण्याची घोडचूक करणार नाही. बाकी वादविवादांप्रमाणेच अनिश्चितता हे सुद्धा पाकिस्तानच्या खेळाचे वैशिषट्य राहिलेले आहे. त्यामुळे ते कधी हिट ठरतील आणि कधी फुस्स होतील याचा काही नेम नाही. परंतु या पहिल्या तीन सामन्यांतून त्यांनी सगळ्यांनाच सावधानचा इशारा दिलाय एवढं मात्र नक्की.