Sunday, January 23, 2011

युनिकोडचा वापर कसा कराल?

(आजकाल अनेकांना इंटरनेटवर खासकरून फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर मराठीत लिहिण्याची इच्छा असते. त्यासाठी मग बर्याचदा गूगल ट्रान्सलेटरचा उपयोग केला जातो. मात्र त्यातही अनेक अडचणी उद्भवतात. या सगळ्यावर जालीम उपाय म्हणजे युनिकोडचा वापर... अनेकांकडून याची विचारणा झाली होती. त्यासाठी गेल्या मराठी भाषा दिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) माझा "लोकसत्ता"मधील हा पूर्वप्रकाशित लेख येथे ब्लॉगवर टाकत आहे.)

कोणतीही भाषा टिकायची झाल्यास बदलत्या काळातील नवनवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे त्या भाषेला क्रमप्राप्त असते. याच अनुषंगाने आजच्या नव्या पिढीबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्या दैनंदिन जीवनातील बहुतांश वेळ हा संगणकासमोर बसून कामकाज करण्यात किंवा सोशल नेटवर्किंग करण्यात जात असल्याचे दिसून येते. आणि नेमक्या याच मोक्याच्या माध्यमात इंग्रजीच्या तुलनेत मराठीची पीछेहाट झाल्याचे अपल्या निदर्शनास येईल. कारण संगणकावर इंग्रजीच्या मानाने मराठीची वापर हा नगण्यच आहे. आता यावर बऱ्याचदा संगणकावर मराठीत लिहिण्याची सोयच उपलब्ध नाही किंवा मराठीत लिहिणे खूप जिकिरीचे आहे, कोण तो मराठीचा टंक (फॉन्ट) आपल्या संगणकात उतरवून घेणार अशी नानाविध कारणे ऐकू येतात. मात्र खरं सांगायचं तर यात अजिबात तथ्य नाही. संगणकावर मराठी वापरासंबंधीचे लोकांमध्ये असलेले अज्ञान हेच मोठे दुर्दैव आहे. कारण मुळात संगणकावर मराठी वापरणे हे अतिशय सोपे असून त्यासाठी काही शोधाशोध करण्याची किंवा कोणताही टंक उतरवून घेण्याची गरज नाही. आपल्यापैकी काही मराठी भाषा प्रेमी सध्या उपलब्ध असलेल्या विविध टंकांचा उपयोग करून मराठीत मजकूर लिहितही असतील. मात्र अनेकवेळा हा मजकूर इतरांना पाठविल्यावर त्यांच्या संगणकावर तो विशिष्ट टंक उपलब्ध नसल्याने निव्वळ ठोकळेच दिसतात. मात्र या अडचणीवर देखील मात करणारा अत्यंत सोपा मार्ग आपल्याला उपलब्ध आहे याची आपल्याला कल्पना नाही. संगणकावर अत्यंत सहजरीत्या मराठी व इतर अनेक स्थानिक भाषांचा वापर करता यावा यासाठी ‘युनिकोड’ ही संकेतप्रणाली आपल्या संगणकावर मुळातच अस्तित्वात असते. त्यासाठी कोणताही टंक आपल्या संगणकात उतरवून घेणे आवश्यक नाही. हे वाचल्यावर अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला असेल. तसेच ही प्रणाली कशी वापरायची? त्याचा खर्च किती? असे अनेक प्रश्नही पडले असतील. तर अशा या ‘युनिकोड’च्या वापरासाठी कोणताही खर्च नसून ‘विंडोज’ कार्यकारी प्रणालीसोबत (operating system)) आपल्याला ती अगदी विनामूल्य मिळत असते. मात्र अनेकवेळा आप्लया संगणकात ती कार्यरत केलेली नसते. परंतु अवघ्या चुटकीसरशी आपण हे ‘युनिकोड’ कार्यरत करून संगणकावर इंग्रजीऐवजी मराठीत लिहू शकतो.
आपल्या संगणकावर ‘युनिकोड’ कार्यरत करण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करा.
१.Start- Contro panel- Regional & Language option या क्रमाने टिक करा (मार्क करा).
२. यानंतर एक चौकट येईल. चौकटीच्या वरच्या भागातील Language या पर्यायावर टिक करा.
३. ‘विंडोज एक्स्पी’ची चकती (सीडी) संगणकात टाका.
४. आता चौकटीच्या खालील भागातील install files for complex script and right-to-left languages (including Thai) हा पर्याय निवडा.
५. यानंतर apply आणि ‘ ok पर्यायांवर टिकटिकवा.
६. संगणक बंद करून पुन्हा सुरू करावा (रिस्टार्ट) अशी सूचना येईल. त्याप्रमाणे कृती करा.
७. तुमच्या संगणकावर ‘युनिकोड’ कार्यप्रणाली कार्यरत होईल.
यानंतर तुमचा कळफलक (की-बोर्ड) मराठीत करण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करा.
१. Start- Contro panel- Regional & Language option- Languages या क्रमाक्रमाने टिक करा.
२. चौकटीतीली details हा पर्याय निवडा.
३. यानंतर येणाऱ्या चौकटीतील add पर्यायावर टिक करा.
४. पुन्हा एक नवी चौकट येईल. यामध्ये add input language या पर्यायाखालील विविध भाषांच्या सूचीतून मराठी भाषा निवडा.
५. ok वर टिक करा.
६. याआधीच्या चौकटीतील apply आणि ok वर पण टिक करा.
७. आता तुमच्या संगणकाच्या तळपट्टीवर उजव्या बाजूस MA असे लिहिलेले दिसेल. त्याऐवजी EN असे दिसत असल्यास एकाच वेळी Alt आणि Shift या दोन्ही कळा दाबा. म्हणजे तेथे MA असे दिसेल. याचा अर्थ तुम्ही आता युनिकोडच्या माध्यमातून मराठीत लिहू शकता.
एकदा का तुम्ही ‘युनिकोड’ कार्यरत केले, की संगणकावरील संपूर्ण जग तुम्हाला मराठीत उपलब्ध होईल. याचा वापर करून तुम्ही मराठीत ई-टपाल (ई-मेल) पाठवू शकता, इंटरनेटवरील मराठीतील माहिती शोधू शकता, इतकंच काय तर आपल्या आवडत्या ऑर्कुट, फेसबुकवर सुद्धा मराठीतून गप्पा-गोष्टी करू शकता.
मग आता वाट कसली पाहताय? तडक उठा आणि कामाला लागा. आपल्या मातृभाषेविषयी अभिमान प्रक ट करण्यासाठी यापेक्षा उत्तम माध्यम शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे युनिकोड वापरा आता तुमचाही संगणक चालवा शुद्ध मराठी मध्ये..
युनिकोड वापरासंबंधीची विस्तृत माहिती marathi-vikas.blogspot.com तसेच यासारख्याच इंटरनेटवरील अनेक संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=52259:2010-03-04-16-16-23&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81

Wednesday, January 12, 2011

शोकांतिका भारतीय फुटबॉलची...

       यंदा तब्बल २७ वर्षांनंतर भारतीय फुटबॉल संघ 'एशिया कप'साठी पात्र ठरला आहे.  द.आफ्रिकेबरोबरच्या क्रिकेट सामन्यांमुळे तशी फारच कमी क्रीडाप्रेमींनी याची दखल घेतलीये. मात्र सर्वात निराशाजनक बाब म्हणजे भारतीय मीडियाचंही याकडे दुर्लक्ष झालंय. १० जानेवारीपासून सुरू झालेल्या या एशिया कपच्या पहिल्याच सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून ४-० असा सपाटून मार खावा लागलाय खरा... मात्र १९८४ नंतर प्रथमच या स्पर्धेत खेळण्याची संधी भारताला मिळतेय हेही नसे थोडके !!! आणि जागतिक रॅंकिंगमध्ये २६व्या तर आशिया खंडात नंबर १ वर असलेल्या ऑस्ट्रेलियासमोर १४२ क्रमांकाच्या भारताची डाळ शिजणे जरा अवघडच होते. त्यामुळे हा निकाल तसा अपेक्षितच म्हणायला हवा. यानंतरही ग्रुप स्टेजमध्ये भारताची गाठ द. कोरिया आणि बहरीनसारख्या तगड्या टीम्सशी पडणार आहे. यातील कोरियाचे रॅकिंग ४० तर बहरीनचे रॅंकिंग ९३ आहे. त्यामुळे यापैकी एकाजरी सामन्यात भारताने ड्रॉ किंवा विजय संपादन केला तर तो चमत्कारच म्हणायला हवा. मात्र  अशा चमत्काराची आशा ठेवायला हरकत नाही.

        सध्या जेमतेम कामगिरी करणार्या भारतीय फुटबॉल टीमने कधी काळी याच एशिया कपच्या फायनलमध्येही धडक मारली होती, हे कळल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतील. इतकंच नाही तर १९५६ च्या ऑलिम्पकमध्ये भारतीय फुटबॉल संघाने चक्क सेमीफायनल गाठण्याचा पराक्रम केला होता. म्हणजे पदकापासून ते केवळ एक पाऊल मागे राहिले होते. याहून वरचढ म्हणजे गेल्यावर्षी भारतीयांनी डोक्यावर घेतलेल्या फिफा विश्वचषकाच्या इतिहासात कधीकाळी भारतही पात्र ठरला होता. (मात्र फिफाने भारतीयांच्या शूजशिवाय खेळण्याच्या पद्धातीला आक्षेप घेतल्याने तसेच यासाठी ब्राझीलला जाणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या १९५०च्या या विश्वचषकातून भारताने अखेर माघार घेतली होती. तसेच ही आकडेवारी वरकरणी धूळफेकच मानू शकतो. कारण १९५६चे ऑलिम्पिक तसेच ५० चा विश्वचषक या दोन्ही स्पर्धांमध्ये जगातील बहुतांश मुख्य देशांनी माघार घेतल्याने भारताला ही मजल मारता आली होती. :P) मात्र तरी, आजच्या तुलनेत नक्कीच भारताची कामगिरी त्यावेळी खूपच उजवी होती एवढं नक्की. ५०-६० ची दशकं हा तर भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ म्हणता येईल. ६४च्या एशिया कपमधील उपविजेतेपद तसेच इतर स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत भारताची घाैडदाैड बर्यापैकी सुरू होती. त्यामानाने भारतीय फुटबॉलचा हा भरभराटीचा काळ लक्षात घेतल्यास सध्याची अवस्था पाहून भारतीय फुटबॉलप्रेमींना हळहळण्याखेरीज गत्यंतर नाही. आजही भारतीय फुटबॉची ओळख ही फक्त बायचुंग भुतियापुरतीच मर्यादित असावी ही खरंतर निराशाजनक बाब म्हणायली हवी. अजूनही आपल्या पूर्ण संघाची मदार या ३४ वर्षीय खेळाडूवर  असणे ही गोष्ट अजिबात भूषणावह नाही. त्यातल्यात्यात गेल्याकाही काळात आपल्या जबरदस्त खेळाने अनेकांचे लक्ष वेधून घेणारा आणि परदेशी क्लबसाठी खेळण्याचा मान मिळवणारा स्ट्रायकर सुनिल चेत्री ही भारताची नवी उमेद आहे. मात्र हे तुरळक अपवाद वगळता दर्जेदार खेळाडूंची वानवाच दिसते.

           गंमत म्हणजे भारतीय संघाच्या कामगिरीपेक्षा फुटबॉलबाबतचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन आणखीनच निराशाजनक आहे. एकीकडे दररोज टी.व्ही.ला चिकटून ईपीएल, स्पॅनिश ला लीगा, चॅम्पियन्स लीग फॉलोव करणार्या आपल्याला भारतीय फुटबॉल संघाचे तर साधे शेड्यूलही माहीत नसते. मॅंचेस्टर युनायटेड, चेल्सी यांच्यासाठी देव पाण्यात घालून बसणारे, त्यांचे कट्टर समर्थक म्हणवणारे आपण भारतीय प्रेक्षक आपल्या देसी फुटबॉलची किती माहिती ठेवतो हा प्रश्न अनेकांना अडचणीत टाकणारा ठरेल. मेसी, रूनी, रोनाल्डो, टेरी यांच्या नावाचे टीशर्ट मोठ्या अभिमानाने मिरवणार्या आपले भारतीय फुटबॉलचे ग्यान मात्र भुतियापासून सुरू होउन भुतियावरच संपते. त्यामुळे देशात फुटबॉलबद्दल असलेली अनास्था या फुटबॉलच्या शोकांतिकेत भरच घालत असते. खरंतर भारतीय संघाची कामगिरी आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद या दोन्ही गोष्टी एकमेकांना परस्पर पूरक म्हणायला हव्यात. कारण भारतीय फुटबलचा दर्जा तितकासा चांगला नसल्याने त्यात आम्हाला रस नाही असं म्हणून आम्ही मोकळे होतो आणि देशात कोणाला इंटरेस्टच नाही म्हंटल्यावर तो दर्जा वाढणार तरी कसा असा यक्षप्रश्न निर्माण होतो... आजही फुटबॉल म्हंटलं की गोवा, केरळ, बंगाल ही मोजकीच राज्यं डोळ्यासमोर येतात.. वर्षानुवर्षे नॅशनल लीगवर (आत्ताची आय लीग) इस्ट बंगाल, डेम्पो, मोहन बगान, जेसीटी, चर्चिल ब्रदर्स यांचंच वर्चस्व दिसून येतं. मग हा खेळ वाढतोय तरी कुठे असं वाटल्याखेरीज राहत नाही... पण मुळात तो वाढेलच का ? कारण मुंबईपुरतं तरी बोलायचं झालं तर सर्वसाधारणपणे  आपला फुटबॉलशी संबंध येतो तो जास्तीतजास्त पावसाळ्यातील रांगडा फुटबॉल खेळण्यापुरता.. इकडे साधं फुटबॉलचा ऑफसाइडच्या नियमाचा अर्थ लावतालावताही आपल्या नाकीनऊ येतात. गंमत म्हणजे इकडेही क्रिकेटच्या टर्म्सशी घुसखोरी थांबत नाही. (ऑफसाइडबरोबर आमच्या पोरांनी फुटबॉलमधली लेगसाइडही शोधून काढलीये.) चुकून आपल्यामधला कोणी कॉन्वेन्ट शाळेत शिकत असेल तर त्याच्या रूपात आपल्या फुटबॉल ज्ञानात भर पडते. आणि ही कॉन्वेन्टचीच मुलं थोडंफार काय ते शाळेत सिरीयस फुटबॉल खेळतात. (त्या दर्ज्यावरही प्रश्नचिन्ह आहेच ) बिपिन फुटबॉल केंद्रासारखी मोजकी शिबिरं या मोजक्या उगवत्या फुटबॉलप्रेमींना पुढचं व्यासपीठ उपलब्ध करून देतात. मात्र तिथे पोहोचेपर्यंत देशात फुटबॉलला मिळणारा प्रतिसाद पाहून त्या मुलाचं फुटबॉलचं भूत उतरलेलं असतं. पालकांनी या खेळाला पाठिंबा देण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. ( आयपीएलमध्ये मालामाल होत असलेल्या स्थानिक क्रिकेटपटूंच्या तुलनेत इंडियन फुटबॉल लीगमधील मानधनाचा विषयच न काढलेला बरा) मग होऊन होऊन भारतीय फुटबॉलची प्रगती होणार तरी कशी ? जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असणार्या या खेळाचे भारतातील आजचे चित्रही निराशाजनक आहे आणि भविष्यात ते सुधारण्याची चिन्हंही दिसत नाहीयेत..किमान तसे प्रयत्न तरी होताना दिसत नाहीयेत.. ( फिफाच्या विस्तार धोरणात पुढील लक्ष्य भारत असल्याने आशेचा किरण आहे म्हणा.. मात्र थेट वरच्या पातळीवर काही होण्यापूर्वी ग्रास रूटवर बदल होणं महत्त्वाचं आहे हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नाही)
      ही सगळी परिस्थिती पाहता  आपण आयुष्यभर फक्त मॅनयू आणि चेल्सीचेच घोडे नाचवत राहणार का असा प्रश्न पडल्याखेरीज राहत नाही.. मात्र आत्ता या क्षणी निदान आपण आपल्यापरीने तरी ही परिस्थिती सुधारण्यासाठी हातभार लावावा...दोन दिवस नाक्यावर ईपीएल ऐवजी एशिया कपची चर्चा झाली तरी मोठ्ठं यश म्हणावं लागेल. कोण जाणे आपल्या संघाने बहरीन किंवा कोरियाला रोखत चमत्कार करून दाखवला तर...लेट्स होप फॉर द बेस्ट !!!

Wednesday, January 5, 2011

"द पिंक टेस्ट"

       अक्षरश: पहिल्या दिवसापासून क्रिकेट जगतात गाजत असलेली अॅशेस मालिका सध्या सिडनी टेस्टमधील एका वेगळ्यात कारणासाठी चर्चेत आहे. ज्यांनी सिडनी टेस्टचं प्रक्षेपण पाहिलं असेल त्यांना या टेस्टमधील वेगळेपण लगेच जाणवलंही असेल. कारण कसोटी क्रिकेटचा ट्रेडमार्क रंग असलेल्या पांढर्या रंगाबरोबरच या सामन्यादरम्यान आणखी एका गोडगुलाबी रंगाची उधळण मैदानावर होताना दिसतेय...अगदी स्टंम्पस् पासून सीमारेषेवरील साइन बोर्डसपर्यंत...आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या टीशर्टवरील लोगोपासून स्टेडियममध्ये बसलेल्या हजारो प्रेक्षकांच्या कपडे, टोप्यांपर्यंत... अशी चौफेर  गुलाबी रंगाची पेरणी झालेली आहे... अगदी वोडाफोननेही आपल्या नेहमीच्या लाल रंगाला टाटा बायबाय करत गुलाबी रंगाला आपलंस केलंय... ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी तर यासाठी आपल्या आवडत्या बॅगी ग्रीन कॅपलाही काही काळासाठी दूर सारलं...इंग्लंडची बार्मी आर्मीही या टेस्टसाठी गुलाबी रंगात नटलीये...किंबहुना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तर या टेस्टला अधिकृतरित्या पिंक टेस्ट म्हणूनच घोषित केलंय... कारण ही टेस्ट सेलिब्रेट केली जातेय ती ऑस्ट्रेलियाचा माजी तेज गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याच्या मॅकग्रा फाऊंडेशनसाठी... "टुगेदर वी कॅन मेक डिफरन्स" हे ब्रीदवाक्य घेऊन मॅकग्राची ही स्वयंसेवी संस्था ऑस्ट्रेलियात ब्रेस्ट कॅन्सरसंबंधी जनजागृती करण्याचे तसेच या रोगाने ग्रासलेल्या रुग्णांना योग्य ते उपचार मिळवून देण्याचे मोठे काम करीत आहे. ११ वर्षे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर मॅकग्राची इंग्लिश पत्नी जेन हिचे याच कारणाने निधन झाले होते. मात्र स्वत: या रोगाला बळी पडण्यापूर्नी तिने आपल्यासारखीच वेळ इतर ऑस्ट्रेलियन महिलांवर येऊ नये म्हणून यासंबंधी जनजागृती करण्यासाठी एक चॅरिटी स्थापन केली होती. तिच्या निधनानंतर मॅकग्रानेही या फाऊंडेशनचे काम आव्याहतपणे सुरू ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून ब्रेस्ट कॅन्सरविरोधी मोहिमेचे प्रतीक असलेल्या गुलाबी रंगाची उधळण या सिडनी टेस्टमध्ये करण्यात आली आहे. क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक कार्याला हातभार लावण्याचा हा आणखी एक चांगला प्रयत्न म्हणायला हवा. एक उत्तम खेळाडू म्हणून गाजलेल्या मॅकग्राची समाजकार्यातीलही ही यशस्वी खेळी...

      ग्लेन मॅकग्राप्रमाणेच आणखीही काही क्रिकेटपटूंनी याआधी असा सामाजिक कार्याचा वसा उचललेला आहे. त्यामध्ये पाकिस्तानच्या इम्रान खानचे नाव नेहमीच अग्रभागी असेल. आपल्या आईला कॅन्सर झाल्यानंतर इम्रानला तिची ट्रीटमेन्ट करण्यासाठी परदेशात जाणे भाग पडले होते. कारण तोपर्यंत पाकिस्तानमध्ये कॅन्सरवर उपचार करणारे असे हॉस्पिटलच नव्हते. जिंदादिल इम्रानला ही गोष्ट खूप बोचली आणि त्यानंतर त्याने आपली सर्व शक्ती वापरून जगभरातून निधी गोळा करून पाकिस्तानातील पहिलेवहिले कॅन्सर हॉस्पिटल उभारले. इम्रानच्या आईच्या नावाने नामकरण झालेले हे शौकत खानुम मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल आजही पाकिस्तानातील सर्व कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान ठरत आहे. भारताबद्दल म्हणायचं झालं तर सचिनचं 'अपनालय'चं समाजकार्यही आपल्या परिचयात आहे. क्रिकेटमध्ये आपल्या कर्तृत्वाने यशाची शिखरे गाठणार्या या खेळाडूंच्या व्यक्तिमत्वातील हा माणुसकीचा कोपरा यांना खरंच अजून मोठ्ठं करतो. रियली हॅट्स ऑफ टू देम !!!

Saturday, January 1, 2011

हुकूमाचे एक्के...१.१.११

       बरोबर दहा वर्षांपूर्वी एका नव्या शतकात पाऊल ठेवताना आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय याची कल्पनाही केली नव्हती... तेव्हा एवढा विचार करण्याची अक्कलच कुठे होती म्हणा... २००१ मध्ये काय ते माझं वय ??? तरी त्यातल्यात्यात प्राथिमक शाळेतील सर्वात वरची इयत्ता म्हणून चौथीचे घोडे...हा चौथीपासूनचा या दशकातील आजवरचा प्रवास.... मागे वळून पाहताना सगळं आत्ताच घडून गेल्यासारखं वाटतंय... पाहता पाहता या शतकातलं हे पहिलं दशक संपलं सुद्धा...शतकातलं पहिलं आणि आयुष्यातलं दुसरं... (आम्हा ९१ वाल्यांचं बरंय.. आकडेमोड सोप्पी होते ) ३० तारखेलाच समस्त मोबाइल कंपन्यांच्या नावाने शिव्या घालणारा फॉरवर्डेड  मेसेज वाचून त्यांच्या नावाने शिमगा केला आणि तेव्हाच नवदशकाचे वेध लागले होते... आपल्या माणसांच्या सोबतीत या नव्या वर्षांचं स्वागत करायला मिळालं...
        आता २०११... एका नव्या वर्षाची...एका नव्या दशकाची..आयुष्यातल्या एका नव्या 'फेज'ची सुरूवात... सर्वार्थाने चैतन्यमयी, एनर्जेटिक अशी ही १.१.११ ची सकाळ अनुभवतानाचा फ्रेशनेस शब्दात वर्णन करणं कठीण जातंय... नवेकोरे कालनिणर्य भिंतीवर टांगताना आपसूकच आजच्या तारखेपासून वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत पुन्हा पुन्हा नजर फिरत होती... वर्तमानपत्रांचाही बदलता लेयआऊट...छान छान रंगांची उधळण...या सगळ्याच गोष्टी पदोपदी एका नावीन्याची जाणीव करून देत होत्या...हे नवं वर्ष, नवं दशक आपल्यासाठी काय काय नवीन घेऊन येणार आहे हे वाचताना एका वेगळ्याच स्वप्नरंजनात जायला होत होतं...पुढील दशकाच्या पहिल्या दिवशी आपण कुठे असू...त्या दिवशी सुद्धा पेपर वाचताना आपल्या मनात काय भवना असतील अशा नाना विचारांनी मनात घर करायला सुरूवात केली...ग्रॅज्युएशन, करिअर असे अनेक महत्त्वाचे टप्पे आपण याच दशकात ओलांडू...त्या अर्थाने  वैयक्तिक आयुष्यात तर येणारे दशक हे खूपच  महत्त्वाचे ठरेल... (खरंतर हे असं चौथीपासूनच १०वी,१२वी अशा प्रत्येक टप्प्यावर भासवून दिल जातं :P) पण तरी, पुढील संपूर्ण आयुष्याची दिशा कदाचित हे येणारे दशकच ठरवेल असं म्हणायला हरकत नाही...१.१.११ बरोबरच  अॅक्चुअल लाइफमधेयेही या वर्षात हुकूमाचे एक्के फेकले जाणार आहेत...ते या आयुष्याच्या  डावाला कसा आकार देतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल... वर्षाची सुरूवात तर झकासच झालीये.. अनेक नवीन संकल्पही सोडले गेले आहेत... ब्लॉगिंगचा हा नवा उद्योगही त्याचाच एक भाग... चार दिवसांपूर्वीच हा किडा डोक्यात शिरला... आजचा मुहूर्त साधलाय... मनातल्या सैरभैर विचारांना वाट मोकळी करून देण्याबरोबरच स्पोर्टस्, टेक्नोलॉजी, राजकीय विषयांवर लिहायचा विचार आहे...बघू, कसं जमतंय ते... :)  
       बरं, मुद्याचंच राहिलं.... तुम्हा सर्वांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा... :):)