Wednesday, August 31, 2011

जरा हटके जरा बचके !!!



सर्वसाधारणपणे क्रिकेटच्या पुस्तकातील फलंदाज बाद होण्याचे त्रिफळाचीत, झेलबाद, धावचीत, पायचीत, यष्टिचीत हे नियम आपणा सर्वांना ठाऊक असतात. पण क्रिकेटसारख्या रंजक खेळात नेहमीपेक्षा हटके काही घडलं नाही तर मग त्यात नावीन्य ते काय...


या नेहमीच्या पद्धतींखेरीजही क्रिकेटजगतात अत्यंत विचित्र पद्धतीने फलंदाज बाद झाले आहेत.

यातील काही प्रसंग लक्षात घेऊन यासाठी आधीच काही नियम आस्तित्वात होते, तर काही घटना मात्र क्रिकेटबुकलाही नवीन होत्या... नेहमीपेक्षा हटक्या पद्धतीने फलंदाज बाद झालेल्या अशाच काही विचित्र विकेट्सचा हा आढावा...

हॅन्डल्ड  बॉल

२००१ च्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौ-यातील कर्णधार स्टीव वॉची विकेट अनेकांना स्मरणात असेल. चेन्नई टेस्टमध्ये हरभजन सिंग वॉला गोलंदाजी करत असताना एक वेगळाच किस्सा मैदानावर घडला होता. टेस्टच्या पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची दमदार फलंदाजी सुरू होती आणि ३४० या धावसंख्येवर त्यांचे फक्त ३ गडी बाद झाले होते.

यावेळी वॉने हरभजन सिंगच्या चेंडूवर स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न फसला आणि चेंडू जाऊन सरळ त्याच्या पॅडवर आदळला. हरभजनसकट यष्टीरक्षक आणि स्टम्प्सजवळील सर्वच क्षेत्ररक्षकांनी पायचीतचे जोरदार अपील केले. मात्र पंचांनी लागलीच ते फेटाळून लावले.

परंतु याच वेळी स्लीपमध्ये उभ्या असलेल्या द्रविडची नजर मात्र चेंडूवरच होती. वॉच्या पॅड्सवर चेंडू आदळळ्यानंतर तो तसाच टप्पा खाऊन स्टम्प्सवर जाण्याच्या बेतात होता. घाईगडबडीत तो चेंडू स्टंम्पसवर जाऊ नये म्हणून वॉने तो आपल्या हातानेच अडवला आणि नेमकं हेच द्रविडच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही आणि तत्काळ त्याने पंचांकडे 'हॅन्डलिंग द बॉल'चं अपील केले. पंचांनीही लगेच आपलं बोट उंचावत वॉ बाद असल्याचा निर्णय दिला.

क्रिकटेच्या नियमांनुसार बॅट हातात नसताना फलंदाजाने हलता चेंडू आपल्या हाताने अडवल्यास (काही अपवादात्मक प्रसंग सोडून) त्याला 'हॅन्डल्ड द बॉल' या नियमाअंतर्गत बाद ठरविण्यात येते. स्टीव वॉ याच नियमानुसार बाद ठरविण्यात आला होता.

मात्र अशा रितीने बाद होणारा स्टीव वॉ हा काही एकमेव फलंदाज नाही. वॉच्या आधीही द. आफ्रिकेचा रसेल एनडीन, ऑस्ट्रेलियाचा अॅन्ड्रू हिडीक, पाकिस्तानचा मोशिन खान, वेस्ट इंडिजचा डेस्मंड हेन्स, भारताचा मोहिंदर अमरनाथ, इंग्लंडचा ग्रॅहम गूच आणि द. आफ्रिकेचा डॅरल कलिनन हे सुद्धा काहीशा अशाच पद्धतीने बाद ठरविण्यात आले होते.

स्टीव वॉ नंतर त्याचवर्षी डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा भारताबरोबरच खेळताना इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉ देखील याच नियमाचा शिकार झाला होता. हा निर्णय मात्र काहीसा विवादास्पद ठरलेला. गंमत म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या अशा एकूण ९ प्रसंगांपैकी चार प्रसंगात भारताचा त्या सामन्यात सहभाग होता. तीन वेळा भारतीय संघ गोलंदाजी करत होता, तर एकात भारताचाच फलंदाज यात बाद झाला आहे.


ऑबस्ट्रक्टींग  फिल्ड 

पुन्हा एकदा याही विचित्र नियमाची ओळख नव्या पिढीतील बहुतेकांना भारताच्याच एका सामन्यादरम्यान झाली. ६ फेब्रुवारी २००६ रोजी पेशावरमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार इंझमाम उल हक या दुर्मिळ पद्धतीने बाद झाला होता. मालिकेतील या अत्यंत महत्त्वाच्या आणि अटीतटीच्या झालेल्या पहिल्याच सामन्यात अगदी मोक्याच्या क्षणी पाकिस्तानला हा नियम चांगलाच महागात पडला.

भारताच्या ३२९ या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्ताननेही चोख प्रत्त्युत्तर देत ५ गडी बाद २८९ अशी मजल मारली होती. ५ विकेट्स शिल्लक असताना त्यांना ४१ चेंडूंमध्ये फक्त ४० धावा हव्या होत्या. फलंदाजीला होता कर्णधार इंझमाम (बटाट्या)...

लक्ष्य आवाक्यात आले आहे असे वाटत असतानाच इंझमामने स्वत:च्या हाताने (की बॅटने (!) आपलाच घात करून घेतला. श्रीसंथचा एक सरळ चेंडू हलकाच मिडऑफच्या दिशेने तटवल्यानंतर इंझमाम दोन-तीन पावलंच पुढे सरकला होता. मिडऑफला उभ्या असणाऱ्या सुरेश रैनाने हे पाहिले आणि सहजच चेंडू यष्टिंच्या दिशेने फेकला.

चेंडू झपकन आपल्या दिशने येत असल्याचे लक्षात येताच क्रीझच्या बाहेर असलेल्या इंझमामने तसाच उलट्या पावली मागे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू नेमका अचूकरित्या यष्टींच्या दिशेने जात असल्याने इंझमाम चेंडूच्या मार्गात आला. त्याने स्वत:ला चेंडू लागू नये म्हणून बॅट मध्ये घातली. मात्र यावेळी इंझमाम क्रीझच्या बाहेरच होता आणि तो सरळ स्टंम्पसवर जाणाऱ्या थ्रोच्या मध्ये आला होता. त्यामुळे भारतीय क्षेत्ररक्षकांनी यावर आक्षेप घेताच पंच सायमन टॉफेल यांनी त्याला ऑबस्ट्रक्टींग द फिल्ड अंतर्गत बाद ठरवले. पाकिस्तानी संघासाठी हा एक मोठा धक्का होता आणि यानंतर त्यांनी हातातोंडाशी आलेला सामनाही गमावला.

इंझमामच्या आधीही तीन फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने बाद झाले होते. त्यापैकी हॅन्डल्ड द बॉल पाठोपाठ येथेही भारतातर्फे नंबर लावला होता मोहिंदर अमरनाथने. श्रीलंकेविरूद्धच्या अहमदाबाद येथील सामन्यात धावचीत होण्यापासून वाचण्यासाठी अमरनाथने चेंडूलाच लाथ मारली होती. लेन हटन आणि रमीझ राजा सुद्धा एकदा याचप्रकारे बाद झाले होते.


टाइम आउट-

टेस्ट आणि वनडेपेक्षा २०-२० मध्ये अनेक नव्या आणि निराळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. त्यातलीच एक म्हणजे सामना चालू असताना फलंदाजी करणाऱ्या संघाचे खेळाडू ड्रेसिंग रूमऐवजी चक्क बाऊंन्ड्रीलाइनवरील डगमध्ये बसू लागले आणि प्रेक्षकांना तारे जमीं परचा आभास होऊ लागला. यावेळी २०-२० चे ग्लॅमरस रूप लक्षात घेऊन खेळाडूंना सतत प्रेक्षकांच्या नजरेसमोर ठेवण्याच्या उद्देशाने आयसीसीने हे आदेश दिले की काय अशी शंका अनेकांना आली होती.

मात्र यामागे असलेतसले कोणतेही तद्दन कारण नसून क्रिकेटमधील एका विशिष्ट नियमामुळे सर्व संघांना असे करणे भाग पडले होते. क्रिकेटमध्ये सहसा कधीही उल्लेख न केला जाणारा फलंदाजाला बाद ठरवण्याचा अजून एक नियम म्हणजे टाइम आऊट’.. एखादी विकेट पडल्यावर पुढच्या फलंदाजाने किती वेळात खेळपट्टीवर हजर व्हायचे यासंबंधी मर्यादा घालून वेळेची शिस्त लावणारा नियम म्हणून याचा उल्लेख करावा लागेल.

याअंतर्गत वनडे आणि कसोटी सामन्यात एक गडी बाद झाल्यावर ३ मिनिटांच्या आत पुढच्या फलंदाजाला खेळपट्टीवर हजर व्हायचे असते. तर २०-२० मध्ये हीच वेळ कमी करून अवघे ९० सेंकद इतकी करण्यात आली आहे. याचाच परिणाम म्हणजे आपल्याला बाऊन्ड्रीलाइनवरील डगमध्ये पॅड, ग्लोव्स इत्यादीसह कोणत्याही क्षणी फलंदाजीसाठी तयार असलेले खेळाडू दिसू लागले आहेत.

कसोटी तसेच वनडेमध्ये ठराविक वेळेत फलंदाज खेळपट्टीवर न पोहोचल्यास निव्वळ विरोधी संघाच्या अपीलवरून एका फलंदाजाला बाद ठरवले जाऊ शकते. तर २०-२० मध्ये मात्र इथेही थोडासा बदल करून गोलंदाजाला रिकाम्या खेळपट्टीवर (फलंदाजाशिवाय) गोलंदाजी करण्याची संधी देत त्याने त्रिफळा उडवल्यास विकेट बहाल करण्याचा नियम करण्यात आला आहे.

प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अशाप्रकारे फलंदाजाला बाद देण्याचे काही मोजके प्रसंग घडले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर अजूनतरी असा किस्सा घडला नाहीये. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अशा चार प्रसंगापैकी भारतातील त्रिपुरा वि. ओरिसाच्या एका सामन्यात हेमूलाल यादव या नियमाचा बळी ठरला होता.

हिट  बॉल ट्वाइस-

२००१ चा लगान आठवतोय ??? त्यातला आमीरचा सहकारी गुरा अजही अनेकांच्या स्मरणात असेल. जंगलातून आलेला प्राणी अशी संभावना झाल्यावर चवताळलेल्या गुराने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला होता.. हा गुरा लोकांच्या खास लक्षात राहिला तो त्याच्या आगळ्यावेगळ्या बॅटिंग स्टाइलमुळे...

ब्रिटिश गोलंदाजाचा वेगवान चेंडू एकदा जागच्याजागी बॅटने अडवून त्याला थोडीशी उंची द्यायची आणि मग पुन्हा एकदा त्याला जोरदार हाणायचा... ही या गुराची अनोखी शक्कल.. मात्र लगेचच ब्रिटिश कप्तानाने आक्षेप घेतल्यावर त्याला तसे खेळण्यापासून रोखण्यात आले.. याचे कारण म्हणजे क्रिकेटमधील हिट द बॉल ट्वाइसचा नियम..

स्वाभाविकपणे क्रिकेटमध्ये गोलंजादाच्या हातून चेंडू सुटल्यावर फलंदाजाला एकदाच बॅटने त्याला टोलवायची मुभा देण्यात आली आहे. आणि जाणीवपूर्वक फलंदाजाने दोनदा चेंडू फटकावल्यास त्याला या नियमाप्रमाणे बाद ठरवण्यात येते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याप्रकारे अजून एकही फलंदाज बाद झालेला नाहीये.



(क्रिकेट संबंधित माझे तसेच इतरही ब्लॉगर्स व नामांकित लेखकांचे लेख, क्रिकेटसंबंधित सर्व बातम्या व लाइव्ह अपडेट्स आपण cricketcountry.com/marathi या नव्या क्रिकेट संकेतस्थळावर  पाहू शकता.)