बघता
बघता पहिलीवहिली इंडियन ग्रां.पी. दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. ३० ऑक्टोबरला
उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नॉयडा येथे तयार करण्यात आलेल्या बुद्ध इंटरनॅशनल
सर्किटवर भारतातील ही पहिलीच फॉर्म्युला वन शर्यत पार पडणार असून यानिमित्ताने
प्रथमच भारतात या महागड्या खेळाचे आगमन होणार आहे.
गेल्या
काही वर्षांपर्यंत खरंतच भारताचा या खेळाशी दुरान्वयेही संबंध नव्हता. मात्र
टी.व्ही.च्या माध्यमातून कधीतरी रविवारी सकाळी स्पोर्ट्स चॅनेलवर तब्बल ३०० किमी
प्रति तास या वेगाने पळणाऱया या गाड्या पाहून अनेकांचे कुतूहल चाळवले जायचे. त्यात
या काळात मायकल शूमाकररुपी हिरो या खेळाला सापडला आणि असंख्य भारतीय तरूणांनीही
त्याला डोक्यावर घेतले. परंतु तोपर्यंत या खेळात भारताचे असे काहीच स्थान नव्हते.
त्याची सुरूवात झाली ती नरेन कार्तिकेयन या भारतीय ड्रायव्हरने जेव्हा फॉर्म्युला
वनच्या शर्यतीत भार घेतला तेव्हा. मात्र कार्तिकेयनला यात फारशी चमक दाखवता आली
नाही आणि त्याने एफ वन शर्यतीत ड्रायविंग करायचे थांबवले.
त्यानंतर
२००७ सालच्या एका घटनेने मात्र भारतीयांना कायमचे या खेळाशी जोडून टाकले. भारतीय
उद्योगपती विजय मल्ल्या यांनी तब्बल ९० मिलियन युरो मोजून फॉर्म्युला वनमधील
स्पायकर हा संघ विकत घेतला आणि नंतर त्याचे फोर्स इंडिया असे अस्सल भारतीय
नामकरणही केले. मात्र आपण एक गोष्ट इकडे लक्षात घेतली पाहिजे की, खरंतर फॉर्म्युला
वनमधील संघ किंवा ड्रायव्हर्स हे कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व करत नसतात. हा
पूर्णपणे खासगी स्वरूपाचा खेळ आपल्याला म्हणता येईल. बड्याबड्या उद्योगपतींचे
त्यांच्या कंपनीच्या नावाने ओळखले जाणारे संघ आणि त्यात असणारे देशविदेशातील
नानाविध खेळाडू असे साधारण या खेळाचे स्वरूप असते. त्यात कोणीही कोणत्याही देशाचे
प्रतिनिधित्व करत नसते.
२००७
मधील विजय मल्ल्यांच्या या सीमोल्लंघनामुळे भारतीयांना फॉर्म्युला वन हा खेळ जरा
जास्तच आपलासा वाटू लागला. आणि याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी मल्ल्यांच्याच
पुढाकाराने यंदा पहिलीवहिली इंडियन ग्रां.पी. अर्थात एफ वनची शर्यत भारतात आयोजित
करण्याचे ठरवले गेले.
एफ
वनची बऱयापैकी माहिती झाली असली, तरी नेमका हा खेळ कसा खेळला जातो, त्यात कोण
विजयी ठरतं, काय नियम असतात असे बरेच प्रश्न भारतीयांना सध्या पडले आहेत. त्यामुळे
फॉर्म्युला वन हा खेळ समजावून घेण्यापूर्वी त्यातील काही विशिष्ट संज्ञांची ओळख
असणे फार महत्त्वाचे ठरते. आज त्यापैकी काही महत्त्वपूर्ण संज्ञा पाहूयात.
ग्रॅड
प्रिक्स किंवा ग्रां. पी. – फॉर्म्युला वन किंवा एफ वनमध्ये ग्रां. पी. हा शब्द
बऱ्याचदा आपल्या कानी पडतो. हे ग्रां.पी. म्हाणजे दुसरे तिसरे काही नसून शर्यत असा
त्याचा सरळसाधा अर्थ आपण घेऊ शकतो. उदा. इंडियन ग्रां.पी. प्रत्येक वर्षी किती
ग्रां. पी. भरवायच्या आणि त्या कुठे घ्यायच्या याचे वेळापत्रक वर्षाच्या
सुरूवातीलाच तयार केले जाते. जगाच्या विविध कोपऱ्यात या शर्यती भरवल्या जातात.
दरवर्षी या शर्यंतींचा आकडा १-२ ने बदलत असतो. यंदाच्या मोसमात (२०११) एकूण १९ शर्यती
पार पडणार आहेत. ३० तारखेला नॉयडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर पार पडणारी शर्यत
या हंगामातील १७ वी ग्रां.पी. आहे. यावर्षी २७ मार्चला झालेल्या मेलबर्न
ग्रां.पी.ने मासमाची सुरूवात झालेली, तर २९ नोव्हेंबरला ब्राझीलमधील साओ पालो
ग्रांपीने या मोसमाचा शेवट होणार आहे.
सर्किट
– सर्किट म्हणजेच एफ वन शर्यतींसाठी बांधण्यात आलेला खास रस्ता. फॉर्म्युला वनच्या
कार्स या प्रचंड वेगाने पळत असल्याने साध्या नेहमीच्या रस्त्यांवर त्या पळणे शक्य
नसते. त्यासाठी खास वेगळ्या प्रकारचे रस्ते बांधावे लागतात. भारतातील शर्यतीसाठी
बांधण्यात आलेल्या या सर्किटचे बुद्ध इंटरनॅशनल सर्किट असे नामकरण करण्यात आलेले
आहे. तब्बल ८७५ एकर इतक्या परिसरात हे सर्किट असून त्याची लांबी साधारण ५.१४ किमी
इतकी आहे. साधारण दीड लाख लोक या शर्यतीचा याचि देही याचि डोळा आनंद घेऊ शकतील अशी
व्यवस्था करण्यात आली आहे. या ट्रॅक किंवा सर्किटवर एकूण १६ वळणे आहेत, जिथे
ड्रायव्हर्सची खरी कसोटी लागणार आहे. सरळ रस्त्यावर तब्बल ३२० किमी प्रति तास इतका
वेगही ड्रायव्हर्स गाठू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर वळणांवर मात्र
साधारण २१० किमी प्रति तास इतका वेग असेल.
लॅप
- एफ वनची एखादी शर्यत पूर्ण करण्यासाठी किंवा ती जिंकण्यासाठी ड्रायव्हर्सना या
सर्किटला ठरवलेल्या संख्येएवढ्या फेऱ्या माराव्या लागतात. म्हणजेच या सर्किटचे हे
साधारण ५.१४ किमीचे अंतर पुन्हा पुन्हा कापावे लागते. या सर्किटची एक फेरी म्हणजेच
लॅप. प्रत्येक शर्यतीत त्या सर्किटच्या लांबीचा विचार करून लॅपची संख्या ठरवण्यात
येते. ती साधारण ६० ते ८० च्या दरम्यान असते. इंडियन ग्रां.पी. मध्ये ६० लॅप्स
असणार आहेत. म्हणजे एका कारला या सर्किटला ६० फेऱ्या मारायच्या आहेत.
ड्रायव्हर्स
आणि कंस्ट्रक्टर्स – एफ वनच्या भाषेत एखादा संघ म्हणजेच कंस्ट्रक्टर. जगभरातील
विविध कंपन्या या एफ वनमधील संघांच्या मालक आहेत. यंदाच्या मोसमात एकूण १२ संघ
आहेत. फेरारी, रेडबुल, मॅक्लेरन, मर्सिडीज, विलियम आणि अर्थात विजय मल्ल्यांची
फोर्स इंडिया ही त्यापैकी काही नावं आपण ऐकली असतील. याप्रमाणेच एचआरटी, टोरो
रोसो, वर्जिन, सौबर, टीम लोटस हे इतर संघ किंवा कंस्ट्रक्टर आहेत.
प्रत्येक
संघाचे किंवा कंस्ट्रक्टरचे दोन ड्रायव्हर्स शर्यतीत उतरतात. म्हणजे यंदा १२
संघांचे २४ ड्रायव्हर्स हे या शर्यतींमध्ये स्पर्धक म्हणून भिडतायत. मायकल शूमाकल,
जेन्सन बटन, सेबेस्टियल वेटेल, फर्नांडो अलोन्सो, मार्क वेबर, लुईस हॅमिल्टन हे
सध्याचे काही आघाडीचे ड्रायव्हर्स म्हणता येतील. विजय मल्ल्यांच्या फोर्स वन
संघातर्फे अड्रियन सुटिल आणि पॉल दि रेस्ता हे दोन ड्रायव्हर्स आपल्याला इंडियन
ग्रां.पी. मध्ये भाग घेताना दिसतील.
गुण
– प्रत्येक शर्यतीत विजयी होणाऱ्या म्हणजेच सर्वात कमी वेळात त्या सर्किटचे
ठरवण्यात आलेले लॅप्स पूर्ण करणाऱ्या ड्रायव्हरला विजयी घोषित करण्यात येते. आणि
त्यानंतर इतर ड्रायव्हर्सचेही त्यांच्या वेळेनुसार पुढील क्रमांक लावले जातात.
प्रत्येक शर्यतीनंतर त्या शर्यतीतील त्यांच्या क्रमांकानुसार ड्रायव्हर्सना काही
गुण दिले जातात. त्यानुसार प्रथम येणाऱ्यास २५ गुण, दुसऱ्या क्रमांकाच्या
ड्रायव्हरला १८, तिसऱ्याला १५, चौथ्याला १२, पाचव्याला १०, सहाव्याला ८, सातव्याला
६, आठव्याला ४, नवव्याला २ आणि दहाव्या क्रमांकावारील स्पर्धकाला १ गुण दिला जातो.
वर्षाअखेरीस मोसमातील सर्व शर्यतीत मिळून सर्वात जास्त गुण पटकावणारा ड्रायव्हर
त्या मोसमातील चॅम्पियन ठरतो. तर त्याप्रमाणेच आपल्या दोन्ही ड्रायव्हर्सचे गुण
मिळून ज्या संघाचे सर्वाधिक गुण होतात, त्या संघाला कंस्ट्रक्टर चॅम्पियनशिप दिली
जाते.
मोसमातील
३ शर्यती बाकी असल्या तरी यापूर्वीच आपल्या इतर प्रतिस्पर्ध्याच्या खूप पुढे निघून
गेल्याने रेड बुलच्या सेबेस्टियन वेटेलने यंदा जेतेपदावर कब्जा केला आहे. त्याचे
आता ३४९ गुण झाले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरील मॅक्लेरेनच्या जेन्सन बटनचे २२२
गुण आहेत. फेरारीचा फर्नांडो अलोन्सो हा २१२ गुणांसहित सध्या तिसऱ्या क्रमांकावर
आहे. तर रेड बुलने मॅक्लेरेनला मागे टाकत ५५८ गुणांसहित कंस्ट्रक्टर चॅम्पियनशिपवर
दावा सांगितला आहे.