Wednesday, October 26, 2011

'फॉर्म्युला वन'ची बाराखडी




बघता बघता पहिलीवहिली इंडियन ग्रां.पी. दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. ३० ऑक्टोबरला उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नॉयडा येथे तयार करण्यात आलेल्या बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर भारतातील ही पहिलीच फॉर्म्युला वन शर्यत पार पडणार असून यानिमित्ताने प्रथमच भारतात या महागड्या खेळाचे आगमन होणार आहे.

गेल्या काही वर्षांपर्यंत खरंतच भारताचा या खेळाशी दुरान्वयेही संबंध नव्हता. मात्र टी.व्ही.च्या माध्यमातून कधीतरी रविवारी सकाळी स्पोर्ट्स चॅनेलवर तब्बल ३०० किमी प्रति तास या वेगाने पळणाऱया या गाड्या पाहून अनेकांचे कुतूहल चाळवले जायचे. त्यात या काळात मायकल शूमाकररुपी हिरो या खेळाला सापडला आणि असंख्य भारतीय तरूणांनीही त्याला डोक्यावर घेतले. परंतु तोपर्यंत या खेळात भारताचे असे काहीच स्थान नव्हते. त्याची सुरूवात झाली ती नरेन कार्तिकेयन या भारतीय ड्रायव्हरने जेव्हा फॉर्म्युला वनच्या शर्यतीत भार घेतला तेव्हा. मात्र कार्तिकेयनला यात फारशी चमक दाखवता आली नाही आणि त्याने एफ वन शर्यतीत ड्रायविंग करायचे थांबवले.

त्यानंतर २००७ सालच्या एका घटनेने मात्र भारतीयांना कायमचे या खेळाशी जोडून टाकले. भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांनी तब्बल ९० मिलियन युरो मोजून फॉर्म्युला वनमधील स्पायकर हा संघ विकत घेतला आणि नंतर त्याचे फोर्स इंडिया असे अस्सल भारतीय नामकरणही केले. मात्र आपण एक गोष्ट इकडे लक्षात घेतली पाहिजे की, खरंतर फॉर्म्युला वनमधील संघ किंवा ड्रायव्हर्स हे कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व करत नसतात. हा पूर्णपणे खासगी स्वरूपाचा खेळ आपल्याला म्हणता येईल. बड्याबड्या उद्योगपतींचे त्यांच्या कंपनीच्या नावाने ओळखले जाणारे संघ आणि त्यात असणारे देशविदेशातील नानाविध खेळाडू असे साधारण या खेळाचे स्वरूप असते. त्यात कोणीही कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व करत नसते.

२००७ मधील विजय मल्ल्यांच्या या सीमोल्लंघनामुळे भारतीयांना फॉर्म्युला वन हा खेळ जरा जास्तच आपलासा वाटू लागला. आणि याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी मल्ल्यांच्याच पुढाकाराने यंदा पहिलीवहिली इंडियन ग्रां.पी. अर्थात एफ वनची शर्यत भारतात आयोजित करण्याचे ठरवले गेले.

एफ वनची बऱयापैकी माहिती झाली असली, तरी नेमका हा खेळ कसा खेळला जातो, त्यात कोण विजयी ठरतं, काय नियम असतात असे बरेच प्रश्न भारतीयांना सध्या पडले आहेत. त्यामुळे फॉर्म्युला वन हा खेळ समजावून घेण्यापूर्वी त्यातील काही विशिष्ट संज्ञांची ओळख असणे फार महत्त्वाचे ठरते. आज त्यापैकी काही महत्त्वपूर्ण संज्ञा पाहूयात.

ग्रॅड प्रिक्स किंवा ग्रां. पी. – फॉर्म्युला वन किंवा एफ वनमध्ये ग्रां. पी. हा शब्द बऱ्याचदा आपल्या कानी पडतो. हे ग्रां.पी. म्हाणजे दुसरे तिसरे काही नसून शर्यत असा त्याचा सरळसाधा अर्थ आपण घेऊ शकतो. उदा. इंडियन ग्रां.पी. प्रत्येक वर्षी किती ग्रां. पी. भरवायच्या आणि त्या कुठे घ्यायच्या याचे वेळापत्रक वर्षाच्या सुरूवातीलाच तयार केले जाते. जगाच्या विविध कोपऱ्यात या शर्यती भरवल्या जातात. दरवर्षी या शर्यंतींचा आकडा १-२ ने बदलत असतो. यंदाच्या मोसमात (२०११) एकूण १९ शर्यती पार पडणार आहेत. ३० तारखेला नॉयडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर पार पडणारी शर्यत या हंगामातील १७ वी ग्रां.पी. आहे. यावर्षी २७ मार्चला झालेल्या मेलबर्न ग्रां.पी.ने मासमाची सुरूवात झालेली, तर २९ नोव्हेंबरला ब्राझीलमधील साओ पालो ग्रांपीने या मोसमाचा शेवट होणार आहे.

सर्किट – सर्किट म्हणजेच एफ वन शर्यतींसाठी बांधण्यात आलेला खास रस्ता. फॉर्म्युला वनच्या कार्स या प्रचंड वेगाने पळत असल्याने साध्या नेहमीच्या रस्त्यांवर त्या पळणे शक्य नसते. त्यासाठी खास वेगळ्या प्रकारचे रस्ते बांधावे लागतात. भारतातील शर्यतीसाठी बांधण्यात आलेल्या या सर्किटचे बुद्ध इंटरनॅशनल सर्किट असे नामकरण करण्यात आलेले आहे. तब्बल ८७५ एकर इतक्या परिसरात हे सर्किट असून त्याची लांबी साधारण ५.१४ किमी इतकी आहे. साधारण दीड लाख लोक या शर्यतीचा याचि देही याचि डोळा आनंद घेऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या ट्रॅक किंवा सर्किटवर एकूण १६ वळणे आहेत, जिथे ड्रायव्हर्सची खरी कसोटी लागणार आहे. सरळ रस्त्यावर तब्बल ३२० किमी प्रति तास इतका वेगही ड्रायव्हर्स गाठू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर वळणांवर मात्र साधारण २१० किमी प्रति तास इतका वेग असेल.

लॅप - एफ वनची एखादी शर्यत पूर्ण करण्यासाठी किंवा ती जिंकण्यासाठी ड्रायव्हर्सना या सर्किटला ठरवलेल्या संख्येएवढ्या फेऱ्या माराव्या लागतात. म्हणजेच या सर्किटचे हे साधारण ५.१४ किमीचे अंतर पुन्हा पुन्हा कापावे लागते. या सर्किटची एक फेरी म्हणजेच लॅप. प्रत्येक शर्यतीत त्या सर्किटच्या लांबीचा विचार करून लॅपची संख्या ठरवण्यात येते. ती साधारण ६० ते ८० च्या दरम्यान असते. इंडियन ग्रां.पी. मध्ये ६० लॅप्स असणार आहेत. म्हणजे एका कारला या सर्किटला ६० फेऱ्या मारायच्या आहेत.

ड्रायव्हर्स आणि कंस्ट्रक्टर्स – एफ वनच्या भाषेत एखादा संघ म्हणजेच कंस्ट्रक्टर. जगभरातील विविध कंपन्या या एफ वनमधील संघांच्या मालक आहेत. यंदाच्या मोसमात एकूण १२ संघ आहेत. फेरारी, रेडबुल, मॅक्लेरन, मर्सिडीज, विलियम आणि अर्थात विजय मल्ल्यांची फोर्स इंडिया ही त्यापैकी काही नावं आपण ऐकली असतील. याप्रमाणेच एचआरटी, टोरो रोसो, वर्जिन, सौबर, टीम लोटस हे इतर संघ किंवा कंस्ट्रक्टर आहेत.

प्रत्येक संघाचे किंवा कंस्ट्रक्टरचे दोन ड्रायव्हर्स शर्यतीत उतरतात. म्हणजे यंदा १२ संघांचे २४ ड्रायव्हर्स हे या शर्यतींमध्ये स्पर्धक म्हणून भिडतायत. मायकल शूमाकल, जेन्सन बटन, सेबेस्टियल वेटेल, फर्नांडो अलोन्सो, मार्क वेबर, लुईस हॅमिल्टन हे सध्याचे काही आघाडीचे ड्रायव्हर्स म्हणता येतील. विजय मल्ल्यांच्या फोर्स वन संघातर्फे अड्रियन सुटिल आणि पॉल दि रेस्ता हे दोन ड्रायव्हर्स आपल्याला इंडियन ग्रां.पी. मध्ये भाग घेताना दिसतील.

गुण – प्रत्येक शर्यतीत विजयी होणाऱ्या म्हणजेच सर्वात कमी वेळात त्या सर्किटचे ठरवण्यात आलेले लॅप्स पूर्ण करणाऱ्या ड्रायव्हरला विजयी घोषित करण्यात येते. आणि त्यानंतर इतर ड्रायव्हर्सचेही त्यांच्या वेळेनुसार पुढील क्रमांक लावले जातात. प्रत्येक शर्यतीनंतर त्या शर्यतीतील त्यांच्या क्रमांकानुसार ड्रायव्हर्सना काही गुण दिले जातात. त्यानुसार प्रथम येणाऱ्यास २५ गुण, दुसऱ्या क्रमांकाच्या ड्रायव्हरला १८, तिसऱ्याला १५, चौथ्याला १२, पाचव्याला १०, सहाव्याला ८, सातव्याला ६, आठव्याला ४, नवव्याला २ आणि दहाव्या क्रमांकावारील स्पर्धकाला १ गुण दिला जातो. वर्षाअखेरीस मोसमातील सर्व शर्यतीत मिळून सर्वात जास्त गुण पटकावणारा ड्रायव्हर त्या मोसमातील चॅम्पियन ठरतो. तर त्याप्रमाणेच आपल्या दोन्ही ड्रायव्हर्सचे गुण मिळून ज्या संघाचे सर्वाधिक गुण होतात, त्या संघाला कंस्ट्रक्टर चॅम्पियनशिप दिली जाते.

मोसमातील ३ शर्यती बाकी असल्या तरी यापूर्वीच आपल्या इतर प्रतिस्पर्ध्याच्या खूप पुढे निघून गेल्याने रेड बुलच्या सेबेस्टियन वेटेलने यंदा जेतेपदावर कब्जा केला आहे. त्याचे आता ३४९ गुण झाले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरील मॅक्लेरेनच्या जेन्सन बटनचे २२२ गुण आहेत. फेरारीचा फर्नांडो अलोन्सो हा २१२ गुणांसहित सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर रेड बुलने मॅक्लेरेनला मागे टाकत ५५८ गुणांसहित कंस्ट्रक्टर चॅम्पियनशिपवर दावा सांगितला आहे.

Wednesday, August 31, 2011

जरा हटके जरा बचके !!!



सर्वसाधारणपणे क्रिकेटच्या पुस्तकातील फलंदाज बाद होण्याचे त्रिफळाचीत, झेलबाद, धावचीत, पायचीत, यष्टिचीत हे नियम आपणा सर्वांना ठाऊक असतात. पण क्रिकेटसारख्या रंजक खेळात नेहमीपेक्षा हटके काही घडलं नाही तर मग त्यात नावीन्य ते काय...


या नेहमीच्या पद्धतींखेरीजही क्रिकेटजगतात अत्यंत विचित्र पद्धतीने फलंदाज बाद झाले आहेत.

यातील काही प्रसंग लक्षात घेऊन यासाठी आधीच काही नियम आस्तित्वात होते, तर काही घटना मात्र क्रिकेटबुकलाही नवीन होत्या... नेहमीपेक्षा हटक्या पद्धतीने फलंदाज बाद झालेल्या अशाच काही विचित्र विकेट्सचा हा आढावा...

हॅन्डल्ड  बॉल

२००१ च्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौ-यातील कर्णधार स्टीव वॉची विकेट अनेकांना स्मरणात असेल. चेन्नई टेस्टमध्ये हरभजन सिंग वॉला गोलंदाजी करत असताना एक वेगळाच किस्सा मैदानावर घडला होता. टेस्टच्या पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची दमदार फलंदाजी सुरू होती आणि ३४० या धावसंख्येवर त्यांचे फक्त ३ गडी बाद झाले होते.

यावेळी वॉने हरभजन सिंगच्या चेंडूवर स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न फसला आणि चेंडू जाऊन सरळ त्याच्या पॅडवर आदळला. हरभजनसकट यष्टीरक्षक आणि स्टम्प्सजवळील सर्वच क्षेत्ररक्षकांनी पायचीतचे जोरदार अपील केले. मात्र पंचांनी लागलीच ते फेटाळून लावले.

परंतु याच वेळी स्लीपमध्ये उभ्या असलेल्या द्रविडची नजर मात्र चेंडूवरच होती. वॉच्या पॅड्सवर चेंडू आदळळ्यानंतर तो तसाच टप्पा खाऊन स्टम्प्सवर जाण्याच्या बेतात होता. घाईगडबडीत तो चेंडू स्टंम्पसवर जाऊ नये म्हणून वॉने तो आपल्या हातानेच अडवला आणि नेमकं हेच द्रविडच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही आणि तत्काळ त्याने पंचांकडे 'हॅन्डलिंग द बॉल'चं अपील केले. पंचांनीही लगेच आपलं बोट उंचावत वॉ बाद असल्याचा निर्णय दिला.

क्रिकटेच्या नियमांनुसार बॅट हातात नसताना फलंदाजाने हलता चेंडू आपल्या हाताने अडवल्यास (काही अपवादात्मक प्रसंग सोडून) त्याला 'हॅन्डल्ड द बॉल' या नियमाअंतर्गत बाद ठरविण्यात येते. स्टीव वॉ याच नियमानुसार बाद ठरविण्यात आला होता.

मात्र अशा रितीने बाद होणारा स्टीव वॉ हा काही एकमेव फलंदाज नाही. वॉच्या आधीही द. आफ्रिकेचा रसेल एनडीन, ऑस्ट्रेलियाचा अॅन्ड्रू हिडीक, पाकिस्तानचा मोशिन खान, वेस्ट इंडिजचा डेस्मंड हेन्स, भारताचा मोहिंदर अमरनाथ, इंग्लंडचा ग्रॅहम गूच आणि द. आफ्रिकेचा डॅरल कलिनन हे सुद्धा काहीशा अशाच पद्धतीने बाद ठरविण्यात आले होते.

स्टीव वॉ नंतर त्याचवर्षी डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा भारताबरोबरच खेळताना इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉ देखील याच नियमाचा शिकार झाला होता. हा निर्णय मात्र काहीसा विवादास्पद ठरलेला. गंमत म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या अशा एकूण ९ प्रसंगांपैकी चार प्रसंगात भारताचा त्या सामन्यात सहभाग होता. तीन वेळा भारतीय संघ गोलंदाजी करत होता, तर एकात भारताचाच फलंदाज यात बाद झाला आहे.


ऑबस्ट्रक्टींग  फिल्ड 

पुन्हा एकदा याही विचित्र नियमाची ओळख नव्या पिढीतील बहुतेकांना भारताच्याच एका सामन्यादरम्यान झाली. ६ फेब्रुवारी २००६ रोजी पेशावरमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार इंझमाम उल हक या दुर्मिळ पद्धतीने बाद झाला होता. मालिकेतील या अत्यंत महत्त्वाच्या आणि अटीतटीच्या झालेल्या पहिल्याच सामन्यात अगदी मोक्याच्या क्षणी पाकिस्तानला हा नियम चांगलाच महागात पडला.

भारताच्या ३२९ या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्ताननेही चोख प्रत्त्युत्तर देत ५ गडी बाद २८९ अशी मजल मारली होती. ५ विकेट्स शिल्लक असताना त्यांना ४१ चेंडूंमध्ये फक्त ४० धावा हव्या होत्या. फलंदाजीला होता कर्णधार इंझमाम (बटाट्या)...

लक्ष्य आवाक्यात आले आहे असे वाटत असतानाच इंझमामने स्वत:च्या हाताने (की बॅटने (!) आपलाच घात करून घेतला. श्रीसंथचा एक सरळ चेंडू हलकाच मिडऑफच्या दिशेने तटवल्यानंतर इंझमाम दोन-तीन पावलंच पुढे सरकला होता. मिडऑफला उभ्या असणाऱ्या सुरेश रैनाने हे पाहिले आणि सहजच चेंडू यष्टिंच्या दिशेने फेकला.

चेंडू झपकन आपल्या दिशने येत असल्याचे लक्षात येताच क्रीझच्या बाहेर असलेल्या इंझमामने तसाच उलट्या पावली मागे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू नेमका अचूकरित्या यष्टींच्या दिशेने जात असल्याने इंझमाम चेंडूच्या मार्गात आला. त्याने स्वत:ला चेंडू लागू नये म्हणून बॅट मध्ये घातली. मात्र यावेळी इंझमाम क्रीझच्या बाहेरच होता आणि तो सरळ स्टंम्पसवर जाणाऱ्या थ्रोच्या मध्ये आला होता. त्यामुळे भारतीय क्षेत्ररक्षकांनी यावर आक्षेप घेताच पंच सायमन टॉफेल यांनी त्याला ऑबस्ट्रक्टींग द फिल्ड अंतर्गत बाद ठरवले. पाकिस्तानी संघासाठी हा एक मोठा धक्का होता आणि यानंतर त्यांनी हातातोंडाशी आलेला सामनाही गमावला.

इंझमामच्या आधीही तीन फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने बाद झाले होते. त्यापैकी हॅन्डल्ड द बॉल पाठोपाठ येथेही भारतातर्फे नंबर लावला होता मोहिंदर अमरनाथने. श्रीलंकेविरूद्धच्या अहमदाबाद येथील सामन्यात धावचीत होण्यापासून वाचण्यासाठी अमरनाथने चेंडूलाच लाथ मारली होती. लेन हटन आणि रमीझ राजा सुद्धा एकदा याचप्रकारे बाद झाले होते.


टाइम आउट-

टेस्ट आणि वनडेपेक्षा २०-२० मध्ये अनेक नव्या आणि निराळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. त्यातलीच एक म्हणजे सामना चालू असताना फलंदाजी करणाऱ्या संघाचे खेळाडू ड्रेसिंग रूमऐवजी चक्क बाऊंन्ड्रीलाइनवरील डगमध्ये बसू लागले आणि प्रेक्षकांना तारे जमीं परचा आभास होऊ लागला. यावेळी २०-२० चे ग्लॅमरस रूप लक्षात घेऊन खेळाडूंना सतत प्रेक्षकांच्या नजरेसमोर ठेवण्याच्या उद्देशाने आयसीसीने हे आदेश दिले की काय अशी शंका अनेकांना आली होती.

मात्र यामागे असलेतसले कोणतेही तद्दन कारण नसून क्रिकेटमधील एका विशिष्ट नियमामुळे सर्व संघांना असे करणे भाग पडले होते. क्रिकेटमध्ये सहसा कधीही उल्लेख न केला जाणारा फलंदाजाला बाद ठरवण्याचा अजून एक नियम म्हणजे टाइम आऊट’.. एखादी विकेट पडल्यावर पुढच्या फलंदाजाने किती वेळात खेळपट्टीवर हजर व्हायचे यासंबंधी मर्यादा घालून वेळेची शिस्त लावणारा नियम म्हणून याचा उल्लेख करावा लागेल.

याअंतर्गत वनडे आणि कसोटी सामन्यात एक गडी बाद झाल्यावर ३ मिनिटांच्या आत पुढच्या फलंदाजाला खेळपट्टीवर हजर व्हायचे असते. तर २०-२० मध्ये हीच वेळ कमी करून अवघे ९० सेंकद इतकी करण्यात आली आहे. याचाच परिणाम म्हणजे आपल्याला बाऊन्ड्रीलाइनवरील डगमध्ये पॅड, ग्लोव्स इत्यादीसह कोणत्याही क्षणी फलंदाजीसाठी तयार असलेले खेळाडू दिसू लागले आहेत.

कसोटी तसेच वनडेमध्ये ठराविक वेळेत फलंदाज खेळपट्टीवर न पोहोचल्यास निव्वळ विरोधी संघाच्या अपीलवरून एका फलंदाजाला बाद ठरवले जाऊ शकते. तर २०-२० मध्ये मात्र इथेही थोडासा बदल करून गोलंदाजाला रिकाम्या खेळपट्टीवर (फलंदाजाशिवाय) गोलंदाजी करण्याची संधी देत त्याने त्रिफळा उडवल्यास विकेट बहाल करण्याचा नियम करण्यात आला आहे.

प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अशाप्रकारे फलंदाजाला बाद देण्याचे काही मोजके प्रसंग घडले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर अजूनतरी असा किस्सा घडला नाहीये. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अशा चार प्रसंगापैकी भारतातील त्रिपुरा वि. ओरिसाच्या एका सामन्यात हेमूलाल यादव या नियमाचा बळी ठरला होता.

हिट  बॉल ट्वाइस-

२००१ चा लगान आठवतोय ??? त्यातला आमीरचा सहकारी गुरा अजही अनेकांच्या स्मरणात असेल. जंगलातून आलेला प्राणी अशी संभावना झाल्यावर चवताळलेल्या गुराने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला होता.. हा गुरा लोकांच्या खास लक्षात राहिला तो त्याच्या आगळ्यावेगळ्या बॅटिंग स्टाइलमुळे...

ब्रिटिश गोलंदाजाचा वेगवान चेंडू एकदा जागच्याजागी बॅटने अडवून त्याला थोडीशी उंची द्यायची आणि मग पुन्हा एकदा त्याला जोरदार हाणायचा... ही या गुराची अनोखी शक्कल.. मात्र लगेचच ब्रिटिश कप्तानाने आक्षेप घेतल्यावर त्याला तसे खेळण्यापासून रोखण्यात आले.. याचे कारण म्हणजे क्रिकेटमधील हिट द बॉल ट्वाइसचा नियम..

स्वाभाविकपणे क्रिकेटमध्ये गोलंजादाच्या हातून चेंडू सुटल्यावर फलंदाजाला एकदाच बॅटने त्याला टोलवायची मुभा देण्यात आली आहे. आणि जाणीवपूर्वक फलंदाजाने दोनदा चेंडू फटकावल्यास त्याला या नियमाप्रमाणे बाद ठरवण्यात येते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याप्रकारे अजून एकही फलंदाज बाद झालेला नाहीये.



(क्रिकेट संबंधित माझे तसेच इतरही ब्लॉगर्स व नामांकित लेखकांचे लेख, क्रिकेटसंबंधित सर्व बातम्या व लाइव्ह अपडेट्स आपण cricketcountry.com/marathi या नव्या क्रिकेट संकेतस्थळावर  पाहू शकता.)


Tuesday, April 26, 2011

एका चेंडूत सात धावा.. त्या सुद्धा चौकार, षटकाराशिवाय !!!




क्रिकेटमध्ये एका चेंडूवर जास्तीतजास्त किती धावा करता येतील असं तुम्हाला वाटतं ? अगदी सरळसाधा चेंडू धरला तर फोरच्या स्वरूपाच चार आणि सिक्स मारला तर ६.. बरोबर?  त्यातल्यात्यात जर नो बॉल पडला आणि मग त्यावर षटकार मारल्यास संघाच्या खात्यात ७ धावा जमा होऊ शकतात. पण नो बॉल शिवायही एकाच चेंडूवर सात धावा काढल्या असं कोणी तुम्हाला सांगितला तर? आणि इतकंच नाही तर या चेंडूवर फलंदाजाने चौकार किंवा षटकारही मारला नव्हता. विश्वास नाही बसत ना? मग हा व्हिडीयो नक्की पाहा...

२००६ च्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी (का इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांनी?) ही अशक्यप्राय मानली जाणारी गोष्ट प्रत्यक्षात करून दाखवली होती. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना फ्लिंटॉफच्या गोलंदाजीवर मायकल क्लार्कने  लेगसाइडला चेंडू मारला. इंग्लंडचा क्षेत्ररक्षक होगार्ड चेंडूचा पाठलाग करत होता. त्याने सीमारेषेजवळ चेंडू अडवला आणि स्टम्प्स खूप लांब असल्याने लॉंगऑनवरून वाटेतल्या मिडऑनवर उभ्या असलेल्या पीटरसनकडे थ्रो केला. तोपर्यंत फलंदाजांनी पळून तीन धावा काढल्या होत्या. त्यानंतर पीटरसनने यष्टीरक्षकाकडे थ्रो केलेला चेंडू त्याला अडवता आला नाही आणि ओवर थ्रो होऊन चेंडू सरळ सीमारेषेपार गेला!!!  आणि अशाप्रकारे एका चेंडूवर सिक्स, फोर, नो बॉल शिवाय सात धावा निघाल्या!

Friday, April 8, 2011

आयपीएल-4 चे वेळापत्रक



क्र.      तारीख/वेळ                     प्रतिस्पर्धी                                         

1.   8 एप्रिल, 8 वाजता- चेन्नई सुपरकिंग्स वि. कोलकाता नाइट रायडर्स
      
2.   9 एप्रिल, 4 वाजता- डेक्कन चार्जर्स वि. राजस्थान रॉयल्स                

3.   9 एप्रिल, 8 वाजता- कोची तस्कर केरळा  वि.  रॉयल चॅलेंजर्स
                                              
4.   10 एप्रिल, 4 वाजता- दिल्ली डेयरडेव्हिल्स  वि. मुंबई इंडियन्स

5.   10 एप्रिल, 8 वाजता- पुणे वॉरियर्स  वि.  किंग्स 11 पंजाब
                                                                
6.   11 एप्रिल,8 वाजता- कोलकाता नाइट रायडर्स वि.हैदराबाद डेक्कन चार्जर्स
            
7.   12 एप्रिल, 4 वाजता- राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली डेयरडेव्हिल्स
            
8.   12 एप्रिल, 8 वाजता- बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स वि. मुंबई इंडियन्स

9.   13 एप्रिल, 4 वाजता- किंग्स 11 पंजाब वि. चेन्नई सुपरकिंग्स

10. 13 एप्रिल, 8 वाजता- पुणे वॉरियर्स  वि. कोची तस्कर केरळा
    
11. 14 एप्रिल, 8 वाजता- हैदराबाद डेक्कन चार्जर्स वि. बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स
                                                  
12. 15 एप्रिल, 4 वाजता- राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स
                              
13. 15 एप्रिल,   8 वाजता- मुंबई इंडियन्स वि. कोची तस्कर केरळा
    
14. 16 एप्रिल,  4 वाजता- चेन्नई सुपरकिंग्स  वि. बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स

15. 16 एप्रिल, 8 वाजता- हैदराबाद डेक्कन चार्जर्स वि. किंग्स 11 पंजाब

16. 17 एप्रिल,  4 वाजता- पुणे वॉरियर्स  वि. दिल्ली डेयरडेव्हिल्स

17. 17 एप्रिल, 8 वाजता- कोलकाता नाइट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स

18. 18 एप्रिल,  8 वाजता- कोची तस्कर केरळा  वि. चेन्नई सुपरकिंग्स

19. 19 एप्रिल,  4 वाजता- दिल्ली डेयरडेव्हिल्स  वि. हैदराबाद डेक्कन चार्जर्स

20. 19 एप्रिल, 8 वाजता- बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स वि. राजस्थान रॉयल्स

21. 20 एप्रिल, 4 वाजता- मुंबई इंडियन्स वि. पुणे वॉरियर्स

22. 20 एप्रिल,  8 वाजता- कोलकाता नाइट रायडर्स वि. कोची तस्कर केरळा

23. 21 एप्रिल, 8 वाजता- किंग्स 11 पंजाब वि. राजस्थान रॉयल्स

24. 22 एप्रिल, 4 वाजता- कोलकाता नाइट रायडर्स वि. बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स

25. 22 एप्रिल, 8 वाजता- मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपरकिंग्स

26. 23 एप्रिल, 8 वाजता- दिल्ली डेयरडेव्हिल्स  वि. किंग्स 11 पंजाब

27. 24 एप्रिल, 4 वाजता- हैदराबाद डेक्कन चार्जर्स वि. मुंबई इंडियन्स

28. 24 एप्रिल, 8 वाजता- राजस्थान रॉयल्स वि. कोची तस्कर केरळा

29. 25 एप्रिल,  8 वाजता- चेन्नई सुपरकिंग्स  वि. पुणे वॉरियर्स

30. 26 एप्रिल, 8 वाजता दिल्ली डेयरडेव्हिल्स  वि. बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स

31. 27 एप्रिल, 4 वाजता- पुणे वॉरियर्स  वि. चेन्नई सुपरकिंग्स

32. 27 एप्रिल, 8 वाजता- कोची तस्कर केरळा वि. हैदराबाद डेक्कन चार्जर्स

33. 28 एप्रिल,रात्री 8 वाजता-दिल्ली डेयरडेव्हिल्स वि.कोलकाता नाइट रायडर्स

34. 29 एप्रिल, 4 वाजता- राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स

35. 29 एप्रिल,  8 वाजता- बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स वि. पुणे वॉरियर्स

36. 30 एप्रिल, 4 वाजता- कोची तस्कर केरळा  वि. दिल्ली डेयरडेव्हिल्स

37. 30 एप्रिल,  8 वाजता- कोलकाता नाइट रायडर्स वि. किंग्स 11 पंजाब

38. 1 मे,  4 वाजता- राजस्थान रॉयल्स वि. पुणे वॉरियर्स

39. 1 मे, 8 वाजता-  चेन्नई सुपरकिंग्स वि. हैदराबाद डेक्कन चार्जर्स

40. 2 मे,  4 वाजता- मुंबई इंडियन्स वि. किंग्स 11 पंजाब

41. 2 मे, 8 वाजता- दिल्ली डेयरडेव्हिल्स  वि. कोची तस्कर केरळा

42. 3 मे, 8 वाजता हैदराबाद डेक्कन चार्जर्स वि. कोलकाता नाइट रायडर्स

43. 4 मे, 4 वाजता- चेन्नई सुपरकिंग्स  वि. राजस्थान रॉयल्स

44. 4 मे, 8 वाजता- पुणे वॉरियर्स  वि. मुंबई इंडियन्स

45. 5 मे, 4 वाजता- कोची तस्कर केरळा  वि. कोलकाता नाइट रायडर्स

46. 5 मे, 8 वाजता- हैदराबाद डेक्कन चार्जर्स वि. दिल्ली डेयरडेव्हिल्स

47. 6 मे, 8 वाजता- बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स वि. किंग्स 11 पंजाब

48. 7 मे, 4 वाजता- कोलकाता नाइट रायडर्स वि. चेन्नई सुपरकिंग्स

49. 7 मे, 8 वाजता- मुंबई इंडियन्स वि. दिल्ली डेयरडेव्हिल्स

50.  8 मे, 4 वाजता- बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स वि. कोची तस्कर केरळा

51.  8 मे,  8 वाजता- किंग्स 11 पंजाब वि. पुणे वॉरियर्स

52.  9 मे,  8 वाजता- राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपरकिंग्स

53. 10 मे, 4 वाजता- हैदराबाद डेक्कन चार्जर्स वि. पुणे वॉरियर्स

54.  10 मे,  8 वाजता- किंग्स 11 पंजाब वि. मुंबई इंडियन्स

55.  11 मे,  8 वाजता- राजस्थान रॉयल्स वि. बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स

56.  12 मे,  8 वाजता- चेन्नई सुपरकिंग्स  वि. दिल्ली डेयरडेव्हिल्स

57.  13 मे, 8 वाजता-  कोची तस्कर केरळा  वि. किंग्स 11 पंजाब

58.  14 मे, 4 वाजता-  बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स वि. कोलकाता नाइट रायडर्स

59.  14 मे, 8 वाजता- मुंबई इंडियन्स वि. हैदराबाद डेक्कन चार्जर्स

60.  15 मे, 4 वाजता- किंग्स 11 पंजाब वि. दिल्ली डेयरडेव्हिल्स

61.  15 मे,8 वाजता- कोची तस्कर केरळा  वि. राजस्थान रॉयल्स

62.  16 मे,  8 वाजता- पुणे वॉरियर्स  वि. हैदराबाद डेक्कन चार्जर्स

63.  17 मे, रात्री 8 वाजता- किंग्स 11 पंजाब वि. बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स

64.  18 मे, 8 वाजता  चेन्नई सुपरकिंग्स  वि. कोची तस्कर केरळा

65.  19 मे, 8 वाजता- पुणे वॉरियर्स  वि. कोलकाता नाइट रायडर्स

66.  20 मे, 8 वाजता- मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स

67.  21 मे, दुपारी 4 वाजता- किंग्स 11 पंजाब वि. हैदराबाद डेक्कन चार्जर्स

68.  21 मे, 8 वाजता- दिल्ली डेयरडेव्हिल्स  वि. पुणे वॉरियर्स

69.  22 मे, 4 वाजता- बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स वि. चेन्नई सुपरकिंग्स

70.  22 मे,  8 वाजता- कोलकाता नाइट रायडर्स वि. मुंबई इंडियन्स

71.  24 मे, 8वाजता- (क्वालिफायर 1) गुणांनुसार क्र. 1 वि. गुणांनुसार क्र. 2

72.  25 मे, 8 वाजता- (नॉकआऊट) गुणांनुसार क्र. 3 वि. गुणांनुसार क्र.4

73.  27 मे,रात्री 8 वाजता  (क्वालिफायर-2)-  विजेता (नॉकआऊट सामना) वि. पराभूत (क्वालिफायर 1)

74.  28 मे,8 वाजता(अंतिम सामना)- विजेता (क्वालिफायर 1) वि. विजेता (क्वालिफायर-2)
                                                                                                              

Wednesday, April 6, 2011

ब्लॉगला द्या वेबसाइटचे स्वरूप

नमस्कार मंडळी, खरंतर मी कोणीही सॉफ्टवेअर इंजिनियर नाही. परंतु स्वत:चा ब्लॉग तयार करताना आलेल्या अनुभवांचा फायदा इतर सर्वसामान्य (म्हणजे माझ्यासारख्या एचटीएमएलचा गंध नसलेल्या) ब्लॉगर्सना व्हावा यासाठी ही पोस्ट टाकत आहे.

आपण बऱ्याचदा मराठी तसेच इंग्रजीमधील अनेक ब्लॉग्स पाहतो, ज्यांच्या यूआरएलमध्ये ब्लॉगस्पॉटचा उल्लेख असतो, मात्र त्या ब्लॉगला असं काही सजवलेलं असतं की एखादी वेबसाइटही त्यासमोर मार खाईल. आपण मराठी ब्लॉग विश्वाच्या माध्यमातून असे अनेक ब्लॉग्स पाहिलेही असतील. यापैकी बहुतेक जण हे स्वत: इंजिनियर असल्याने किंवा त्यांना तत्सम ज्ञान असल्याने  ब्लॉगला असं रूपडं देणं त्यांना सहज शक्य असतं. काही दिवसांपासून मी सुद्धा माझ्या ब्लॉगमध्ये वेबसाइटप्रमाणेच विविध विषयांचे स्वतंत्र टॅब असावेत यासाठी  प्रयत्न करत होतो. तेव्हा खुद्द ब्लॉगरनेच आता याप्रकारची सोय उपलब्ध करून  दिल्याचे लक्षात आले.

तुम्ही माझ्या ब्लॉगवर पाहू शकता की, वर वेबसाइटप्रमाणे क्रिकेट, स्पोर्ट्स, ओपन ग्राऊंड असे विविध टॅब्स दिले गेले आहेत. या प्रत्येक टॅबवर क्लिक केले असता तुम्हाला त्या सेक्शनमधील सर्व लेख एकाच ठिकाणी सापडतील.

खरंतर ब्लॉगरने ही (स्टॅटिक पेजची) सुविधा अबाऊट मी, कॉन्टॅक्ट यांसारखे स्थायी टॅब बनविण्यासाठी सुरू केली आहे. मात्र आपण त्याचा वापर यापेक्षाही महत्त्वाच्या गोष्टींसाठी करू. या सुविधेचा वापर करून आपण आपल्या ब्लॉगवरील एका विषयाशी संबंधित सर्व लेख एकाच ठिकाणी उपलब्ध करून वाचकांना वाचायला सोप्पं पडेल अशी योजना करू शकतो.

तुमच्या ब्लॉगवरही याप्रमाणे एका विषयासंबंधिचे सगळे पोस्टस् एकत्र करायण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करता येईल.

1. नेहमी आपण नवीन पोस्ट टाकण्यासाठी ज्या न्यू पोस्ट ऑप्शनवर क्लिक करतो, तेथेच क्लिक करा.

2. आता पोस्टिंग या टायटल अंतर्गत न्यू पोस्ट, एडिट पोस्ट आणि एडिच पेजेस असे तीन ऑप्शन्स आपल्याला दिसतील. यातील एडिट पेजेसवर क्लिक करा.

3. याठिकाणी आपण जास्तीत जास्त 10 पेजेस तयार करू शकतो. नवीन पेज (टॅब) तयार करण्यासाठी न्यू पेजवर क्लिक करून पेज टायटलमध्ये आपणास हवे ते टॅबचे नाव द्या. उदा. मी क्रिकेटचा एक स्वतंत्र टॅब तयार केला आहे.

4. आता टायटल खालील मोठ्या चौकटीत मी माझ्या त्या विषयाअंतर्गत येणाऱ्या सगळ्या लेखांची नावं लिहून त्या मजकूरालाच त्या लेखाची लिंक जोडली आहे. हे करणं  अतिशय सोप्पं आहे. त्या टॅबअंतर्गत यावा अशा तुमच्या एखाद्या लेखाचं नाव लिहा. त्यानंतर ते सिलेक्ट करून वरच्या बारवरील लिंक या ऑप्शवनर क्लिक करा. एक विंडो ओपन होईल.

5. आता एका वेगळ्याच विंडोत तुमचा ब्लॉग ओपन करून त्या ठराविक लेखाच्या शीर्षकावर क्लिक करा. आणि वरच्या अॅड्रेसबारवरील संपूर्ण यूआरएल कॉपी करून क्रमांक 4 ची कृती केल्यावर येणाऱ्या विंडोतील वेब अॅड्रेससमोरील मोकळ्या चौकटीत पेस्ट करा. म्हणजो त्या लेखाच्या शीर्षकावर क्लिक करताच वाचक ती संपूर्ण पोस्ट वाचू शकेल.

6. याप्रकारे त्या टॅब अंतर्गत येणारे सर्व लेख या यादीत तुम्ही जोडू शकता. हे झाल्यावर खाली पब्लिश पेजवर क्लिक करा. याप्रकारे एक-दोन नाही तर तब्बल 10 निरनिराळे टॅब तुम्ही तयार करू शकता.

आय होप, ही माहिती काही सर्वसामान्य ब्लॉगर्सना उपयोगी पडली असेल. तसं असल्यास आपला प्रतिसाद नक्की कळवा. तसेच जर कोणी इंजिनियर असल्यास याप्रकारे या स्टॅटिक पेजेसचा आणखी चांगल्याप्रकारे वापर कसा करता येईल याबद्दल त्यांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.. बाकी इतर सगळ्यांनीच आपल्या शंका मोकळेपणाने विचारा. एकमेकां सहाय्य करू... तत्त्वाने चालत राहू...काय?

Friday, April 1, 2011

आणि विनोद कांबळीला रडू आवरलं नाही.. भारत-लंका सामन्याच्या दु:खद आठवणी!!!


    
     

हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला!!!
     १३ मार्च १९९६... विल्स वर्ल्डकपचा उपांत्य सामना... खच्चून भरलेलं कोलकात्याचं इडन गार्डन्सचं स्टेडियम.. भारत आणि श्रीलंका हे स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी केलेले दोन संघ आमनेसामने.. डिसिल्व्हा आणि रोशन महानामा यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर लंकेने अडीचशेचा टप्पा ओलांडला आणि भारताला ५० षटकांत २५२ धावा करण्याचे लक्ष्य दिलं.. सिद्धूला लवकरच गमावल्यानंतर सलामीला आलेल्या सचिनने सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती आणि लंकन गोलंदाजांची यथेच्छ धुलाई सुरू होती.. वन-डाऊन आलेला संजय मांजरेकरही त्याला चांगली साथ देत होता.. बघता बघता २२ व्या षटकात भारताने १ बाद ९८ अशी मजल मारली.. या स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावणारा सचिन अशा झोकात फलंदाजी करत असताना भारताचा विजय अगदीच सहज वाटत होता.. मात्र नेमकं तेव्हाच एक अघटित घडलं आणि संपूर्ण सामन्याचं चित्रच पालटलं.. जयसूर्याचा सचिनला टाकलेला लेग स्टम्पवरील एक चेंडू हलकासा त्याच्या मांडीवर आदळला आणि तसाच पुढे जाऊन यष्टीरक्षक कालुवितरनाच्या ग्लोव्समध्ये चिकटला. चेंडू पायाला लागून कुठे गेलाय याची कल्पना न आल्याने स्वाभाविक हालचाल म्हणून सचिनने आपला पाय क्रीझबाहेर काढला आणि इकडेच भारतीय संघाचा घात झाला.. कालुवितरनाने क्षणाचाही विलंब न लावता बेल्स उडवल्या आणि सचिन यष्टिचित कम रनआऊट असा विचित्र पद्धतीने बाद झाला.. खरंतर आणखी आठ विकेट्स शिल्लक असताना लंकेच्या धावसंख्या गाठणे भारताच्या आवाक्यातच होतं.. मात्र अचानक लंकन स्पिनर्सचा चेंडू काहीतरीच टर्न घेऊ लागला आणि याने भारताचे सचिनसकट पुढील ७ फलंदाज अवघ्या २२ धावांत माघारी परतले.. १ बाद ९८ वरून भारताची हालत ८ बाद १२० अशी झाली..

संतापलेल्या प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये जाळपोळ केली.
        अशा स्थितीत भारताचा विजय अशक्यप्रायच होता. आणि इडन गार्डनमधील प्रेक्षकांनाही याची जाणीव झाली होती.. त्यामुळे काही प्रेक्षकांचा राग अनावर होऊन मैदानावर विचित्र परिस्थती ओढावली. काही प्रेक्षकांनी मैदानावर पाण्याच्या बाटल्या फेकण्यास सुरूवात केली. तसेच काहींनी तर स्टेडियममधील खुर्च्याच पेटवून दिल्या. यामुळे पंचांना सामना थांबवावा लागला. त्यानंतर परिस्थिती आवाक्यात आणून पुन्हा एकदा पंधरा मिनिटांनी सामना रिस्टार्ट करण्याचा प्रयत्न झाला...पण पुन्हा तेच.. प्रेक्षकांची हुल्लडबाजी काही थांबत नव्हती.. शेवटी सामनाधिकाऱ्यांनी सामना संपल्याचे घोषित केले आणि स्कोअरबोर्डवरील लंकेचे वर्चस्व लक्षात घेऊन त्यांना सामना बहाल केला. भारत सामना तर हरलाच होता आणि भारतीय प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीने आपली आणखीच नाचक्की झाली होती.. एवढ्या सगळ्या गोंधळात सामना संपल्याचे घोषित झाल्यानंतर याचंच एक प्रतिबिंब म्हणून पॅव्हेलियनकडे परतणाऱ्या विनोद कांबळीचे दृश्य पाहायला मिळालं.. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर विनोद फक्त समोरील बाजूस पडणाऱ्या विकेट्सच बघत होता. कोणीच खेळपट्टीवर थांबण्याचे नाव घेत नव्हतं. विनोद मात्र आपला नॉन-स्ट्रायकर एंडवरून हा तमाशा पाहत होता.. शेवटी सामनाच संपल्याचे घोषित झाल्यानंतर विनोदला आपलं रडू आवरलं नाही.. पॅव्हेलियनकडे परततानाच त्याने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.. भारताच्या निराशाजनक कामगिरीने आणि प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीने विनोद प्रचंड दुखावला होता.. आणि  त्याला त्या भावना यावेळी लपवता आल्या नाहीत...भारत स्पर्धेबाहेर झाला होता तर लंकेने अंतिम फेरीत धडक मारली होती. मग पुढच्याच सामन्यात कांगारूंना धूळ चारत रणतुंगाच्या नेतृत्वाखाली त्यांनी हा विश्वचषकही खिशात घातला. 

मॅचफिक्सिंगचं (खोटारडं) भूत...



     सकाळी बसमध्ये बसलो तर पाठी दोन माणसं आपापसात बडबडत होती. काही नाही रे, लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत. सगळं फिक्स आहे. ते क्रिकेटर्स आधीच मालामाल झालेयत. दुसराही त्याला मनापासून दुजोरा देतो. ट्रेन पकडली तर तिकडे यापेक्षाही काही उत्साही मंडळी.. अरे एकेकाला पकडून मारला पाहिजे या इंडियन टीममधल्या. एक नंबरचे चोर साले.. सगळा वर्ल्डकप फिक्स केलाय रे यांनी. मग यावर बाकी महाशयही आपल्याला कसं या बुकीचं रॅकेट माहितेय आणि त्याने आपल्याला कसं सगळं सांगितलंय हे सांगून आणखीन भाव खाण्याचा प्रयत्न करातात. घरी येऊन फेसबुकात डोकं घातलं तर तिकडे याहून वरचढ! क्रिकेट तज्ज्ञ आणि पोहोचलेले बुकीही जितक्या आत्मविश्वासाने सांगू शकणार नाहीत, त्यापेक्षा जास्त ज्ञान असल्याचा आव आणत काही लोकांनी सामना सुरू असतानाच अंतिम स्कोअरबोर्डसहित सामन्याचा निकालही सांगून टाकला आणि मॅच फिक्स असल्याचा पक्का दावा केला. तिकडे एक थर्डक्लास न्यूज चॅनेलवर कोण एक ऑफिसर येऊन भारत पाकिस्तान सामना फिक्स असून भारत तो एवढ्य़ा एवढ्या रन्सने हरणार याचा दिंडोरा पिटायला सुरूवात केली होती. या चॅनेलने तर कहरच करत संपूर्ण दिवस हीच बातमी चालवली होती आणि एक्स्लुसिवच्या नावाखाली टीआरपी वाढवण्याचा डाव मांडला होता. नशीब भारत सामना जिंकला, नाहीतर आमची बातमी कशी बरोबर ठरली हे मिरवत यांनी काय केलं असतं ते देवालाच ठाऊक!

      
     
    हे सगळं बघितल्यावर एकच प्रश्न विचारावासा वाटतो. आपण कधीपासून एवढे बेजबाबदार झालो? कसलीही माहिती नसताना निव्वळ प्रसिद्धीसाठी आपण एका खेळालाच बदनाम करत सुटलोय याचं अजिबात भान नाही का आपल्याला? फेसबुकवर हा सामना फिक्स आहे असा दावा करणाऱ्या मंडळींनी आयुष्यात एकदा तरी बेटिंग कसं चालतं हे बघितलं तरी असतं का? ते जाऊद्या. पण यांच्या या विधानांवरून त्यांना क्रिकेटबद्दल तरी काही कळतं का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. भारत- पाकिस्तानसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांत होणाऱ्या अटीतटीच्या लढतीत संपर्ण मॅच फिक्स करणं म्हणजे काही खाऊचं काम आहे का? अहो, भारत पाकिस्तानच्या प्लेयर्सना असं ठरवून हव्या त्या बॉलला आऊट करता आलं असतं वा हव्या त्या चेंडूवर षटकार मारणं शक्य असतं तर इतकी वर्षे ऑस्ट्रेलियाने क्रिकेट जगतावर आपलं वर्चस्व नसतं ना गाजवलं! क्रिकेटसारख्या अनिश्चिततेच्या खेळात पुढच्या चेंडूवर काय होईल याची खुद्ध खेळाडूंनाही कल्पना नसताना संपूर्ण मॅच फिक्स करणं कसं शक्य आहे असा साधा विचारही या मंडळींच्या डोक्यात येत नाही हेच दुर्देव आहे. याआधी असले प्रकार घडलेयत हे मान्य आहे. पण तेव्हाही संपूर्ण सामना असा 22 जणांनी मिळून फिक्स वगैरे केला नव्हता. आणि ते तसं करणं मुळात शक्यच नाही. कोणताही खेळाडू आपल्या स्वत:च्या खेळावरही पूर्ण नियंत्रण ठेवूच शकत नाही. म्हणजे आपण उदाहरण घ्यायचं म्हंटलं की समजा एका संघातील फलंदाज आणि दुसऱ्या संघातील गोलंदाज यांनी मिळून फिक्स केलं की या फलंजादाने 10 धावा करून बाद व्हायचं. तर हे असं करणंही किती कठीण आहे याची कल्पना तरी आहे का? कोणास ठाऊक त्या गोलंदाजाचा एक सुमार चेंडूही नकळत शून्यावरच त्या फलंदाजाचा त्रिफळा उडवून जाईल किंवा 10 धावांवर फलंदाजी करताना बाद व्हायचं ठरवूनही चेंडू बॅटची कड घेऊन पाठी सीमारेषेपार जाईल. अहो, इकडे ही हालत असताना संपूर्ण सामना इतक्या इतक्या धावांनी हा संघ जिंकणार किंवा तो संघ जिंकणार असा फिक्स करणं साक्षात ब्रह्मदेव खाली उतरला तर त्यालाही शक्य होणार नाही. पुन्हा आत्ता आत्ताच स्पॉट फिक्सिगंमध्ये सापडलेल्या खेळाडूंच्या करीयरची झालेली वाताहत पाहून आणि आयसीसीची असल्या गोष्टींवरची करडी नजर लक्षात घेता कोण खेळाडू असली हिम्मत करेल हो.. बरं, पुन्हा इकडे असेही काही थोर टीकाकार आहेत, ज्यांचा दावा तर हाच आहे की आयसीसीनेच पैसे कमवण्यासाठी संपूर्ण वर्ल्डकप फिक्स केलाय आणि म्हणून आपण जिंकतोय. आता यावर शहाण्याने प्रत्युत्तर न दिलेलंच बरं असं वाटू लागलंय मला.


Wednesday, March 30, 2011

भारत वि. पाकिस्तान..मैदानावरील गरमागरम किस्से !!!


 भारत पाकिस्तानचा सामना म्हंटला की मैदानावरील गरमागरम वातावरण हे ठरलेलं असायचं. विशेषत: विश्वचषकातील लढतींमध्ये असे प्रसंग वारंवार घडलेले आहेत. यापूर्वी विश्वचषक स्पर्धेत हे दोन संघ एकूण चार वेळा एकमेकांविरोधात उभे ठाकले असून प्रत्येकवेळी भारताने पाकिस्तावर मात केली आहे. या सामन्यांमध्येही असेच काही अविस्मरमीय प्रसंग घडून गेले आहेत. या आठवणींना व्हिडियोंसहित दिलेला हा उजाळा..


      1992 (सिडनी) - इम्रान खानच्या लढवय्या पाकिस्तानी संघाने 1992 च्या विश्वचषकात न्यूझीलॅंड, इंग्लंड अशा भल्याभल्यांना पाणी पाजत विश्वचषकावर कब्जा केला होता. परंतु या प्रवासातही भारताकडून मात्र त्यांना मात खावी लागली होती. राऊंड रॉबिन पद्धतीने खेळल्या गेलेल्या या बेन्सन अॅन्ड हेजेस विश्वचषकात साखळीत भारताची पाकिस्तानबरोबर गाठ पडली होती. यापूर्वी भारताला इंग्लंड तसेच ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. तर श्रीलंकेविरूद्धचा सामान पावसामुळे धुतला गेला होता. यावेळी अझरूद्दीन कप्तान असलेल्या भारतीय संघात कपिल देव, आताचे निवड समितीचे अध्यक्ष के. श्रीकांत, संजय मांजरेकर यांच्याबरोबरच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचाही समावेश होता. जडेजा, मनोज प्रभाकर, श्रीनाथ, किरण मोरे हे संघातील इतर सदस्य होते. पहिली फलंदाजी करताना भारताला सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या संथ खेळपट्टीवर 49 षटकांत 7 गडी गमावून फक्त 216 च धावा करण्यात यश आले. या धावा जमवण्यात सर्वात मोलाचा वाटा होता तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या छोट्या चणीच्या सचिन रमेश तेंडुलकरचा... सचिनने तब्बल 91 चेंडूंचा सामना करताना नाबाद 54 धावा केल्या होत्या. मात्र शेवटी याच 54 धावा निर्णायक ठरल्या. भारतातर्फे अजय जडेजा, अझरूद्दीन आणि कपिल देवनेही काही छोटेखानी पण उपयुक्त खेळी केल्या. तरी पाकिस्तानसमोर 216 चं आव्हान म्हणजे फारसं काही कठीण वाटत नव्हतं. परंतु भारताच्या श्रीनाथ आणि प्रभाकरने सुरूवातीलाच पाकिस्तानला धक्के देत इंझमाम आणि जाहिद फजलला बाद केलं. दुसरीकडे आमीर सोहेल मात्र खेळपट्टीवर टिकाव धरून होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जावेद मियॉंदादबरोबर त्याची चांगील भागीदारी जमली आणि पाकिस्तानचा डाव आकार घेऊ लागला होता. मात्र अखेर फलंदाजीत चमक दाखवणाऱ्या सचिनने इथे आपल्या गोलंदाजीचीही कमाल दाखवली आणि सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या आमीर सोहेलला 63 धावांवर बाद केले. यानंतर पाकिस्तानी डावाची पडझड झाली आणि त्यांचा डाव 173 धावांतच संपुष्टात आला. फलंदाजीत 54 धावा आणि गोलंदाजीत 10 षटकं टाकून अवघ्या 37 धावा देत आमीर सोहेलचा बळी घेणाऱ्या सचिनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. सचिनच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी हा सामना नेहमीच लक्षात रहिल. मात्र त्यापेक्षाही या सामन्याची एका खास कारणासाठी नेहमीच आठवण काढली जाते. जावेद मियॉंदाद हा नेहमीच भारताविरूद्धच्या सामन्यात काही गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असायचा. चेतन शर्माला शेवटच्या चेंडूवर षटकार खेजून पाकला विजय मिळवून देणाऱ्या जावेदची आणखी एक आठवण याच सामन्यातील आहे. जावेद मियॉंदाद आणि भारताचा यष्टिरक्षक किरण मोरे यांच्यातील प्रसिद्ध शाब्दिक चकमक आणि मियॉंदादच्या त्या माकडउड्या याच सामन्यातल्या. मियॉंदाद फलंदाजी करत असताना पाक फंलदाजांवर दडपण वाढवण्यासाठी भारतीय गोलंदाज, क्षेत्ररक्षक (खासकरून यष्टिरक्षक किरण मोरे) हे वारंवार फलंदाजाच्या पायाला चेंडू लागला रे लागला की पायचीतचे जोरदार अपील करायचे. तसेच पाकिस्तानचीच चिडखोर वृत्ती त्यांच्यावर उलटवण्यासाठी किरण मोरेचे मियॉंदादचे लक्ष विचलित करण्यासाठी प्रयत्न चालले होते. यावर मियॉंदाद चांगलाच चिडला. सचिन गोलंदाजी करताना तो मध्येच थांबला आणि किरण मोरेला त्याने खडसावले. नंतर तर किरण मोरेला चिडवण्यासाठी त्याने माकडउड्या मारून किरण मोरेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मैदानावर प्रचंड गरमागरमी असताना या दोन खेळाडूंमधील ही चकमक चांगलीच रंगली आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील एक अविस्मरणीय प्रसंग बनून गेली.



       1996 (बंगळुरू) - किरण मोरे आणि जावेद मियॉंदादमधील किश्शाने 1992 विश्वचषकाचा भारत पाकिस्तान सामना चांगलाच गाजला. यांनतर चार वर्षांनी पुन्हा एकदा विश्वचषकात भारत पाकिस्तान आमनेसामने आले. आणि यावेळीही काहीशा अशाच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली. किंबहुना 92 पेक्षा यावेळी मैदानावरील वातावरण चांगलेच तापले होते असं म्हणावं लागेल. कारण 92 ला सामना दूरदेशी ऑस्ट्रेलियात खेळला जात होता, तर यावेळी हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी बंगळूरच्या स्टेडियम दणाणून सोडणाऱ्या आपल्याच पाठिराख्यांसमोर खेळत होते. तसेच हा सामना साखळीतील साधासुधा सामना नव्हता. तर उपउपांत्य लढत असल्याने येथे पराभव म्हणजे घरचा रस्ता पकडणं भाग होतं. प्रचंड गाजावाजा झालेल्या या सामन्यातील हिरो (वातावरण तापवण्यासाठी) ठरले आमीर सोहेल आणि वेंकटेश प्रसाद... सिद्धूच्या 91 धावांच्या जोरावर 287 धावांचा डोंगर भारताने उभारलेला होता. याचा पाठलाग करताना या सामन्यासाठी बदली कर्णधार असलेला आमीर सोहेल आणि भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेल्या सईद अन्वर या दोघा पाक सलामीवीरांनीही धडाकेबाज सुरूवात केली होती. श्रीनाथ आणि वेंकटेश प्रसाद या दोघांची धुलाई चाललेली. अखेर संघाच्या 84 धावा झाल्या असताना अन्वरची श्रीनाथने शिकार केली. परंतु आमीर सोहेल त्याच जोशात फटकेबाजी करत होता. वेंकटेश प्रसादच्या एका षटकात तर त्याने सलग दोन चेंडूंवर कव्हर्समधून दोन सणसणीत चौकार लगावले. आणि यामुळे त्याला चांगलाच चेव चढला. चौकार मारल्यानंतर मोठ्या माजात त्याने प्रसादला कव्हर्सच्या दिशेने बोट दाखवत याच ठिकाणी मी चौकार मारेन असं सुनावलं. प्रसादने मात्र आपलं डोकं शांत ठेवत पुढचा चेंडू अचूक टप्प्यावर टाकला आणि सोहेलचा त्रिफळा उडवला. अशारितीने सोहेलचा माज उतरला आणि नंतर पाकिस्तानने सामनाही गमावला. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यांतील ही एक ठळक आठवण बनून गेली.



      1999 (मॅंचेस्टर)- 92 आणि 96 नंतर 99 साली मॅंचेस्टरमध्ये भारत आणि पाकिस्तान हे विश्वचषकात तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले. मॅंचेस्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय तसेच पाकिस्तानी लोकांचे वास्तव्य असल्याने याठिकाणी सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सामन्याच्या दिवशी मॅंचेस्टर हे भारत किंवा पाकिस्तानच असल्यासारखे भासत होते. अशात अझरूद्दीनचा भारतीय संघ आणि अक्रमचा पाकिस्तानी संघ आपल्या देशाची इभ्रत वाचवण्यासाठी समोरासमोर आले. आणि पुन्हा एकदा 1996 प्रमाणेच वेंकटेश प्रसादने भेदक गोलंदाजी करत भारताला पाकिस्तानविरूद्ध विश्वचषक स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवून दिला. भारताच्या 227 या धावसंख्येला उत्तर देताना प्रसादच्या पाच विकेट्समुळे पाकिस्तानी टीम 180 मध्येच गारद झाली. यावेळी श्रीनाथनेही तीन बळी घेत प्रसादला मोलाची साथ दिली. भारतातर्फे सचिनने सलामीला येत 45, अझरूद्दीनने 59 तर राहुल द्रविडने 61 धावा केल्या होत्या.


2003 (सेंचुरीयन)- पुन्हा एकदा 2003 मध्ये सेंचुरीयनवर भारताची पाककिस्ताविरूद्ध गाठ पडली. या सामन्याचे वर्णन करायचे झाल्यास सबकुछ सचिन असंच म्हणावं लागेल. यावेळी 92 च्या विश्वचषकानंतर पुन्हा एकदा 11 वर्षांनी सचिनने पाकिस्तानला चांगलाच दणका दिला. सईद अन्वरने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत 101 धावांची शतकी खेळी केल्याने पाकिस्तानने भारतापुढे 274 धावांचे आव्हान ठेवले होते. येथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे विश्वचषक स्पर्धेत प्रथमच भारत पाकिस्तानविरूद्ध धावांचा पाठलाग करणार होता. यापूर्वी तिन्ही खेपेस भारताने प्रथम फलंदाजी केली होती. आणि पाकिस्तानचा संघ दडपणाखाली येऊन कोसळला होता. मात्र आता परिस्थिती नेमकी उलट होती आणि पाकिस्तानी फलंदाजांनी आव्हानात्मक धावसंख्याही उभारली होती. त्यामुळे भारतावर दडपण आले होते. परंतु भारताची फलंदाजी चालू होताच अगदी पहिल्या षटकापासून सचिन-सेहवाग यांनी अशी काही फटकेबाजी चालू केली की पाकिस्तानी गोलंदाजच दबावाखाली आले. आग ओकणारा शोएब अख्तर, वकार युनूस अशा कोणालाच या दोघांनी जुमानले नाही आणि सहाव्या षटकातच संघाचे अर्धशतक फलकावर लावले. मग सेहवाग बाद झाल्यानंतरही सचिनने आपला धडाका कायम ठेवला. सचिनचं शतक मात्र अवघ्या दोन धावांनी हुकलं. पण त्याच्या 75 चेंडूंमधील 98 धावांच्या या तुफान खेळीने भारताला कधीच विजयाच्या दाराशी नेऊन उभे केलं होतं. त्यानंतर द्रविड आणि युवराजने नाबाद खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि पुन्हा एकदा पाकिस्तानला भारतासमोर लोटांगण घ्यावं लागलं. यावेळी सुरूवातीच्या षटकांत सचिन-सेहवाग फलंदाजी करत असतानाचा त्यांचा तुफानी अंदाज निव्वळ दृष्ट लागण्यासारखा होता. अलीकडेच सेहवागने केलेल्या खुलाशानुसार शोएब अख्तर वारंवार त्याला बाउंसर टाकून हुसकावत होता. तेव्हा त्याने समोर तुझा बाप उभा आहे, त्याला बाउंसर टाक, तो सिक्स मारेल असं सुनावलेलं. यावेळी शोएबने सचिनला तेजतर्रार बाउंसर टाकताच सचिनने एक शानदार हुकचा फटका लगावर चेंडू सीमारेषेपार भिरकावून दिला होता. हा सामना पाहिलेला कोणीही भारतीय हा षटकार आपल्या उभ्या आयुष्यात विसरू शकणार नाही.