Saturday, February 5, 2011

अनाकलनीय निर्णय...

          मुंबई हायकोर्टाने कालच एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना ज्योतिषशास्त्र हे एक विज्ञान असल्याचा निकाल दिला... खरंतर याबद्दलचा पूर्ण निकाल मी वाचलेला नाही किंवा मी या क्षेत्रातला जाणकारही नाही... तसेच यातून सन्मानीय न्यायालयाचा अवमान करण्याचाही उद्देश नाही... मात्र तरीही एक सामान्य नागरीक म्हणून या निकालावर प्रतिक्रिया देताना काय म्हणावं हेच कळत नाहीये.. अनाकलनीय !!! इतकंच म्हणावं लागेल... म्हणजे याबाबतीत माझे वैयक्तिक विचार तर फारच टोकाचे आहेत.. पण ते जरी बाजूला ठेवलं तरी विज्ञान ??? अरे यार प्लीज... पहिली गोष्ट म्हणजे याला विज्ञान म्हणून मान्यता देताना त्याची सत्यता कोणी आणि कधी तपासली हा सर्वात मोठा प्रश्न पडलाय.. माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत कोणीही समोर येऊन खुलं आव्हान  (अं.नि.स. ने वारंवार असं खुलं आव्हान दिलंय) घेऊन हा ज्योतिष वगैरे प्रकार सिद्ध करून दाखवला नाहीये... त्यामुळे एकवेळ लगेच त्याला ढोंग ठरवू नका, पण त्याला विज्ञान म्हणून मान्यता देण्यासाठीही काहीच बेस नाहीये.
     हेहे...मला खरंच हसायला येतं यार हा विषय निघाल्यावर... म्हणजे खरं सांगायचं तर यात समोरची बाजू ऐकून घ्यायला मला खरंच आवडतं.. की कोणी कसा याचा पुरस्कार करू शकतं यार... म्हणजे अगदी साधं म्हणायचं झालं तर च्यायला काय ते एका राशीचे करोडो लोक... या सगळ्यांचं एखाद्या ठराविक दिवसाचं नशीब एकच कसं असू शकतं रे ?? हेहे.. म्हणजे बघा हा... आता समजा तिकडे बिल गेट्स आणि इकडे मुंबईच्या फूटपाथवरचा एक भिकारी.. हे दोघं जर एकाच वेळी जन्माला आले असतील... किंवा काय ते ज्या काही नियमांप्रमाणे त्यांची रास एकच असेल, तर यांचं भाग्य समान निघणार होय !!! व्वा व्वा !!! ते इंग्रजी होरोस्कोप तर अजूनच हॉरर आहे !!! म्हणजे ठराविक अमुक दिवसांच्या दरम्यान जन्म घेतलेले त बिलियन्स, ट्रिलियन्स लोक.. या सगळ्यांचं नशीब चार ओळींत सारखंच... यापेक्षा मोठा जोक नाही होऊ शकत यार... 
           सगळ्यात हाईट म्हणजे आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या क्षणी आपण या गोष्टीवर विसंबून राहतो.. काय तर छत्तीसच्या छत्तीस गुण... च्यायला त्या इंग्लंडने चांगलाच धडा शिकवलाय या लोकांना... येथील नियमाप्रमाणे कोणी असं सांगून लग्न देणार असेल आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला, तर त्या सो कॉल्ड ज्योतिषाला भरभक्कम नुकसानभरपाई द्यावी लागते.. नाहीतर मग गप्प आधीच सांगायचं की हे सगळं निव्वळ मनोरंजनासाठी आहे.. सगळ्या पाश्चिमात्त्य गोष्टींचं अनुकरण करतो ना आपण.. मला वाटतं याबाबतीतही ते करावं मग.. आज २१व्या शतकातही आपल्या समाजातील सुशिक्षित म्हणवणाऱ्या लोकांनी असल्या गोष्टींच्या आहारी जावं यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही रे कोणती.. खरंच वाईट वाटतं.. म्हणजे आज लोकशिक्षणाचा ठेका घेणाऱ्या मीडियालाही यासाठी जबाबदार ठरवावं लागेल. किंबहुना फक्त त्यांनाच जबाबदार धरावं लागेल.. अरे ऐर्यागैर्यांची गोष्ट सोडा, पण सुशिक्षितांची वृत्तपत्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांतातही साप्ताहिक भविष्याच्या कॉलम्नला अजूनही महत्त्वाचे स्थान आहे. आज ज्या चॅनेलने याबद्दल चर्चा आयोजित केली त्यांच्याच चॅनेलवर सकाळीसकाळी ते भगरे (गुरूजी??? plzzzzz) (वाईट यमक शब्द येत होता तोंडात,पण सेन्सॉर केलाय.. ;) ) का कोण येऊन लोकांना त्यांचं भविष्य सांगत असतात. मीडियानेच असल्या गोष्टींचे उदात्तीकरण करणे यापेक्षी वाईट काहीच असू शकत नाही रे...
     मला कल्पना आहे की आपल्यापैकीही अनेकजण वर्तमानपत्रांतील आपलं भविष्य मोठ्या चवीनं वाचत असणार.. काही जण हा काय काही लिहित सुटलाय काही माहीत नसताना असंही म्हणतील (अशा लोकांच्या कमेन्ट्सची आतुरतेने वाट पाहतो आहे)... पण मला वाटतं की या ज्योतिष वगैरे संबंधित लोकांना त्यांचे खरेपण सिद्ध करण्याची पुरेपूर संधी यापूर्वी दिली गेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे नरेन्द्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वेळोवेळी या लोकांना आपली सत्यता दाखवून देण्याचे खुले आव्हान दिले आहे. त्यासाठी लाखोंचं बक्षिस ठेवलं आहे. आपल्या या शास्त्रावर इतका जर विश्वास असेल तर का कोणी पुढे नाही आलं मग यावेळी... आम्हाला अं.नि.स. च्या सर्टिफिकेटची गरज नाही असं म्हणून प्रत्येकवेळी हे पळवाट शोधत आले आहेत.. अत्यंत दुर्देवाने आजच्या निकालाने ते काही कायदेशीर कारवाईतून मोकाट सुटत आहेत.. अर्थात ही लढाई पुढे वरच्या कोर्टात जाईल म्हणा.. पण कोर्टाच्या निकालाची वाट पाहण्यापेक्षा आपणच सद्सद्विवेकबुद्धीचा उपयोग करून अशा चाळ्यांना लांब ठेवण्याची गरज आहे असं वाटतं... 

(दोन्ही मतप्रवाहांच्या बहुमूल्य कमेन्ट्सचे सहर्ष स्वागत आहे... )