Showing posts with label मनातलं.... Show all posts
Showing posts with label मनातलं.... Show all posts

Monday, March 21, 2011

प्लॅटफॉर्मवर राहून ट्रेनशीच वैर !!! टाटाची अनोखी शक्कल...

       'पाण्यात राहून माशांशी वैर बाळगू नये' असं मराठीत म्हंटलं जातं. मात्र सध्या दादर, वाशी तसेच इतर प्रमुख रेल्वेस्थानकांवर नजर फिरवली असता यात थोडासा बदल करून 'प्लॅटफॉर्मवर राहून ट्रेनशीच वैर बाळगू नये' असं म्हणावसं वाटतंय. आपणापैकी कोणी गेल्या काही दिवसांत मुंबईच्या लोकल रेल्वे स्थानकांवर नजर फिरवली असल्यास जिकडे-तकडे टाटाच्या इंडिका इ व्ही 2 या गाडीच्या जाहिराती पाहायला मिळाल्या असतील. मोठ्या प्रमाणावर टाटाने रेल्वे स्थानकांवर याची जाहिरात केल्याने त्या पटकन डोळ्यांत भरण्यासारख्या आहेत. मात्र या जाहिराती प्रवाशांचं लक्ष खेचून घेण्यात यशस्वी ठरतायत त्याचं आणखी एक कारण म्हणजे या जाहिरातीतील आशय..


        
           पेट्रोल प्राइसेस मोकिंग यू टेक द ट्रेन? असा प्रश्न विचारून टाटाने आपल्या या इंडिका इ व्ही 2 गाडीची फ्युएल एफिशियन्सी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच आता पेट्रोलच्या महागाईमुळे तुम्हाला नाईलाजाने ट्रेनचा मार्ग पत्करावा लागतोय, तर मग आमच्या प्रतिलिटर 25 किमी पळणाऱ्या आणि भारतात सर्वात जास्त अॅव्हरेज देणाऱ्या गाडीची निवड करा आणि थोडक्यात ट्रेनचा प्रवास टाळा असाच संदेश या जाहिरातीतून देण्याचा प्रयत्न टाटाने केला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. एरव्ही या आशयाची जाहिरात फारशी आकर्षक ठरली नसती. मात्र टाटाने मोठी शक्कल लढवून रेल्वे स्थानकांतच मोठमोठाले बॅनर लावून ही जाहिरात केल्याने हा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.  हे सगळं पाहिल्यानंतर रेल्वेने आपल्या स्थानकांवर जाहिराती स्वीकारताना त्या जाहिरातीचा आशय एकदाही पाहू नये का ? का ते पाहूनही रेल्वेला त्यात आक्षेपार्ह काहीच वाटत नाहीये ? असे अनेक प्रश्न पडलेयत. हे म्हणजे मुंबईत मटाने लोकसत्तामध्येच आपली जाहिरात छापण्यासारखा प्रकार आहे.

       पुन्हा आत्ताच या पोस्टसाठी फोटो शोधता शोधता एका ब्लॉगवर या जाहिरातीतील आणखी एक विचित्र गोष्ट लक्षात आली. या ब्लॉगवर टाटाच्या या जाहिरातीतील एक फोलपणाही उघड केलाय. या जाहिरातीच्या खालच्या बाजूला छोट्याशा अक्षरात  एआरएआयने ही गाडी सीआरफोर इंजिनमध्ये 25 किमी प्रतिलिटर पळत असल्याचा दाखला दिला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पण मग डिझेल इंजिनवर गाडी हा परफॉर्मन्स देत असताना जाहिरातीत पेट्रोलचा उल्लेख अशारितीने करणे म्हणजे ग्राहकांची फसवणूक करण्यासारखेच झाले नाही का ? 

Saturday, February 5, 2011

अनाकलनीय निर्णय...

          मुंबई हायकोर्टाने कालच एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना ज्योतिषशास्त्र हे एक विज्ञान असल्याचा निकाल दिला... खरंतर याबद्दलचा पूर्ण निकाल मी वाचलेला नाही किंवा मी या क्षेत्रातला जाणकारही नाही... तसेच यातून सन्मानीय न्यायालयाचा अवमान करण्याचाही उद्देश नाही... मात्र तरीही एक सामान्य नागरीक म्हणून या निकालावर प्रतिक्रिया देताना काय म्हणावं हेच कळत नाहीये.. अनाकलनीय !!! इतकंच म्हणावं लागेल... म्हणजे याबाबतीत माझे वैयक्तिक विचार तर फारच टोकाचे आहेत.. पण ते जरी बाजूला ठेवलं तरी विज्ञान ??? अरे यार प्लीज... पहिली गोष्ट म्हणजे याला विज्ञान म्हणून मान्यता देताना त्याची सत्यता कोणी आणि कधी तपासली हा सर्वात मोठा प्रश्न पडलाय.. माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत कोणीही समोर येऊन खुलं आव्हान  (अं.नि.स. ने वारंवार असं खुलं आव्हान दिलंय) घेऊन हा ज्योतिष वगैरे प्रकार सिद्ध करून दाखवला नाहीये... त्यामुळे एकवेळ लगेच त्याला ढोंग ठरवू नका, पण त्याला विज्ञान म्हणून मान्यता देण्यासाठीही काहीच बेस नाहीये.
     हेहे...मला खरंच हसायला येतं यार हा विषय निघाल्यावर... म्हणजे खरं सांगायचं तर यात समोरची बाजू ऐकून घ्यायला मला खरंच आवडतं.. की कोणी कसा याचा पुरस्कार करू शकतं यार... म्हणजे अगदी साधं म्हणायचं झालं तर च्यायला काय ते एका राशीचे करोडो लोक... या सगळ्यांचं एखाद्या ठराविक दिवसाचं नशीब एकच कसं असू शकतं रे ?? हेहे.. म्हणजे बघा हा... आता समजा तिकडे बिल गेट्स आणि इकडे मुंबईच्या फूटपाथवरचा एक भिकारी.. हे दोघं जर एकाच वेळी जन्माला आले असतील... किंवा काय ते ज्या काही नियमांप्रमाणे त्यांची रास एकच असेल, तर यांचं भाग्य समान निघणार होय !!! व्वा व्वा !!! ते इंग्रजी होरोस्कोप तर अजूनच हॉरर आहे !!! म्हणजे ठराविक अमुक दिवसांच्या दरम्यान जन्म घेतलेले त बिलियन्स, ट्रिलियन्स लोक.. या सगळ्यांचं नशीब चार ओळींत सारखंच... यापेक्षा मोठा जोक नाही होऊ शकत यार... 
           सगळ्यात हाईट म्हणजे आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या क्षणी आपण या गोष्टीवर विसंबून राहतो.. काय तर छत्तीसच्या छत्तीस गुण... च्यायला त्या इंग्लंडने चांगलाच धडा शिकवलाय या लोकांना... येथील नियमाप्रमाणे कोणी असं सांगून लग्न देणार असेल आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला, तर त्या सो कॉल्ड ज्योतिषाला भरभक्कम नुकसानभरपाई द्यावी लागते.. नाहीतर मग गप्प आधीच सांगायचं की हे सगळं निव्वळ मनोरंजनासाठी आहे.. सगळ्या पाश्चिमात्त्य गोष्टींचं अनुकरण करतो ना आपण.. मला वाटतं याबाबतीतही ते करावं मग.. आज २१व्या शतकातही आपल्या समाजातील सुशिक्षित म्हणवणाऱ्या लोकांनी असल्या गोष्टींच्या आहारी जावं यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही रे कोणती.. खरंच वाईट वाटतं.. म्हणजे आज लोकशिक्षणाचा ठेका घेणाऱ्या मीडियालाही यासाठी जबाबदार ठरवावं लागेल. किंबहुना फक्त त्यांनाच जबाबदार धरावं लागेल.. अरे ऐर्यागैर्यांची गोष्ट सोडा, पण सुशिक्षितांची वृत्तपत्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांतातही साप्ताहिक भविष्याच्या कॉलम्नला अजूनही महत्त्वाचे स्थान आहे. आज ज्या चॅनेलने याबद्दल चर्चा आयोजित केली त्यांच्याच चॅनेलवर सकाळीसकाळी ते भगरे (गुरूजी??? plzzzzz) (वाईट यमक शब्द येत होता तोंडात,पण सेन्सॉर केलाय.. ;) ) का कोण येऊन लोकांना त्यांचं भविष्य सांगत असतात. मीडियानेच असल्या गोष्टींचे उदात्तीकरण करणे यापेक्षी वाईट काहीच असू शकत नाही रे...
     मला कल्पना आहे की आपल्यापैकीही अनेकजण वर्तमानपत्रांतील आपलं भविष्य मोठ्या चवीनं वाचत असणार.. काही जण हा काय काही लिहित सुटलाय काही माहीत नसताना असंही म्हणतील (अशा लोकांच्या कमेन्ट्सची आतुरतेने वाट पाहतो आहे)... पण मला वाटतं की या ज्योतिष वगैरे संबंधित लोकांना त्यांचे खरेपण सिद्ध करण्याची पुरेपूर संधी यापूर्वी दिली गेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे नरेन्द्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वेळोवेळी या लोकांना आपली सत्यता दाखवून देण्याचे खुले आव्हान दिले आहे. त्यासाठी लाखोंचं बक्षिस ठेवलं आहे. आपल्या या शास्त्रावर इतका जर विश्वास असेल तर का कोणी पुढे नाही आलं मग यावेळी... आम्हाला अं.नि.स. च्या सर्टिफिकेटची गरज नाही असं म्हणून प्रत्येकवेळी हे पळवाट शोधत आले आहेत.. अत्यंत दुर्देवाने आजच्या निकालाने ते काही कायदेशीर कारवाईतून मोकाट सुटत आहेत.. अर्थात ही लढाई पुढे वरच्या कोर्टात जाईल म्हणा.. पण कोर्टाच्या निकालाची वाट पाहण्यापेक्षा आपणच सद्सद्विवेकबुद्धीचा उपयोग करून अशा चाळ्यांना लांब ठेवण्याची गरज आहे असं वाटतं... 

(दोन्ही मतप्रवाहांच्या बहुमूल्य कमेन्ट्सचे सहर्ष स्वागत आहे... )

Saturday, January 1, 2011

हुकूमाचे एक्के...१.१.११

       बरोबर दहा वर्षांपूर्वी एका नव्या शतकात पाऊल ठेवताना आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय याची कल्पनाही केली नव्हती... तेव्हा एवढा विचार करण्याची अक्कलच कुठे होती म्हणा... २००१ मध्ये काय ते माझं वय ??? तरी त्यातल्यात्यात प्राथिमक शाळेतील सर्वात वरची इयत्ता म्हणून चौथीचे घोडे...हा चौथीपासूनचा या दशकातील आजवरचा प्रवास.... मागे वळून पाहताना सगळं आत्ताच घडून गेल्यासारखं वाटतंय... पाहता पाहता या शतकातलं हे पहिलं दशक संपलं सुद्धा...शतकातलं पहिलं आणि आयुष्यातलं दुसरं... (आम्हा ९१ वाल्यांचं बरंय.. आकडेमोड सोप्पी होते ) ३० तारखेलाच समस्त मोबाइल कंपन्यांच्या नावाने शिव्या घालणारा फॉरवर्डेड  मेसेज वाचून त्यांच्या नावाने शिमगा केला आणि तेव्हाच नवदशकाचे वेध लागले होते... आपल्या माणसांच्या सोबतीत या नव्या वर्षांचं स्वागत करायला मिळालं...
        आता २०११... एका नव्या वर्षाची...एका नव्या दशकाची..आयुष्यातल्या एका नव्या 'फेज'ची सुरूवात... सर्वार्थाने चैतन्यमयी, एनर्जेटिक अशी ही १.१.११ ची सकाळ अनुभवतानाचा फ्रेशनेस शब्दात वर्णन करणं कठीण जातंय... नवेकोरे कालनिणर्य भिंतीवर टांगताना आपसूकच आजच्या तारखेपासून वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत पुन्हा पुन्हा नजर फिरत होती... वर्तमानपत्रांचाही बदलता लेयआऊट...छान छान रंगांची उधळण...या सगळ्याच गोष्टी पदोपदी एका नावीन्याची जाणीव करून देत होत्या...हे नवं वर्ष, नवं दशक आपल्यासाठी काय काय नवीन घेऊन येणार आहे हे वाचताना एका वेगळ्याच स्वप्नरंजनात जायला होत होतं...पुढील दशकाच्या पहिल्या दिवशी आपण कुठे असू...त्या दिवशी सुद्धा पेपर वाचताना आपल्या मनात काय भवना असतील अशा नाना विचारांनी मनात घर करायला सुरूवात केली...ग्रॅज्युएशन, करिअर असे अनेक महत्त्वाचे टप्पे आपण याच दशकात ओलांडू...त्या अर्थाने  वैयक्तिक आयुष्यात तर येणारे दशक हे खूपच  महत्त्वाचे ठरेल... (खरंतर हे असं चौथीपासूनच १०वी,१२वी अशा प्रत्येक टप्प्यावर भासवून दिल जातं :P) पण तरी, पुढील संपूर्ण आयुष्याची दिशा कदाचित हे येणारे दशकच ठरवेल असं म्हणायला हरकत नाही...१.१.११ बरोबरच  अॅक्चुअल लाइफमधेयेही या वर्षात हुकूमाचे एक्के फेकले जाणार आहेत...ते या आयुष्याच्या  डावाला कसा आकार देतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल... वर्षाची सुरूवात तर झकासच झालीये.. अनेक नवीन संकल्पही सोडले गेले आहेत... ब्लॉगिंगचा हा नवा उद्योगही त्याचाच एक भाग... चार दिवसांपूर्वीच हा किडा डोक्यात शिरला... आजचा मुहूर्त साधलाय... मनातल्या सैरभैर विचारांना वाट मोकळी करून देण्याबरोबरच स्पोर्टस्, टेक्नोलॉजी, राजकीय विषयांवर लिहायचा विचार आहे...बघू, कसं जमतंय ते... :)  
       बरं, मुद्याचंच राहिलं.... तुम्हा सर्वांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा... :):)