Monday, March 7, 2011

चोकर्स !!! क्लुस्नरनं कमावलं डोनाल्डनं गमावलं…




खरंतर कोणताही शब्द हा एखाद्या गोष्टीला ओळख प्राप्त करून देत असतो. चोकर्स या विशिष्ट शब्दाच्या बाबतीत मात्र ही परिस्थिती नेमकी उलट झालेली आढळते. सध्या चोकर्स या शब्दाचीच ओळख द. आफ्रिकेवरून आणि त्यांच्या शेवटच्या क्षणी कचखाऊ कामगिरी करण्याच्या सवयीवरून होऊ लागली आहे. क्रिकेटमध्ये चोकर्स म्हणजे द आफ्रिका आणि द. आफ्रिका म्हणजे चोकर्स हे समीकरण इतकं रूढ झालंय की या शब्दाचा मुळात वेगळाही काही अर्थ आहे हेच लोकांच्या विस्मरणात गेलं आहे. कालच्या सामन्यात पुन्हा एकदा इंग्लंडविरूद्ध आफ्रिकेने आपल्यावरी चोकर्स हा टॅग सार्थ ठरवला. यानिमित्ताने १९९९ सालच्या विश्वचषकातील उपान्त्य फेरीतील थरारक सामन्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

१७ जून १९९९... स्थळ- एजबिस्टन ग्राऊंड, बर्मिंगहॅम... विश्वचषकातील अत्यंत महत्त्वाचा उपांत्य फेरीचा सामना. पोलॉक आणि डोनाल्डच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला अवघ्या २१३ या धावसंख्येवर रोखण्यात यश मिळवलं होतं. बेवन आणि स्टीव वॉ तसेच काही प्रमाणात पॉन्टिंग वगळता इतर कोणत्याही खेळाडूला ऑस्ट्रेलियातर्फे चमक दाखवता आलेली नव्हती. त्यांचे चार खेळाडू तर भोपळा न फोडताच माघारी परतले होते. बेवन आणि वॉच्या अर्धशतकी खेळीही अत्यंत संथ गतीने झाल्या होत्या.  त्यामुळे ४९.२ षटकांत सर्वबाद २१३ धावा अशी मजल मारून ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी तसेच अंतिम पेरीत प्रवेश मिळवण्यासाठी २१४ चं लक्ष्य ठेवलं होतं. यावेळी पोलॉक आणि डोनाल्ड यांनी अनुक्रमे ५ आणि ४ बळी मिळवत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

१९९२ च्या विश्वचषकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यापासून प्रत्येकवेळी द. आफ्रिकेच्या संघाला स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार मानण्यात येत असे. मात्र तरीही प्रत्यक्षात त्यांना वर्ल्डकप जिंकण्यात अपयश आलेलं होतं. आणि हा इतिहास बदलण्याची हीच ती वेळ असा निश्चय करून आफ्रिकेचे फलंदाज यावेळी मैदानावर उतरले होते. गिब्स आणि कर्स्टनच्या सावध सुरूवातीनंतर आणि ४८ धावांच्या सलामीनंतर मात्र शेन वॉर्नने आपला जलवा दाखवला आणि द. आफ्रिकन फलंदाजांना आपल्यासमोर गुडघे टेकण्यास भाग पाडले. आफ्रिकेची वरची फळी वॉर्नने एकहाती कापून काढली आणि १ बाद ४८ वरून त्यांची अवस्था ४ बाद ६१ अशी करून टाकली. यानंतर मात्र जॉन्टी ऱ्होड्स आणि जॅक कॅलिसने भक्कम भागीदारी करत पुन्हा एकदा सामन्याचं पारडं आफ्रिकेच्या दिशेने झुकवलं. हे दोघेही बाद झाले तेव्हा आफ्रिकेचा धावफलक होता ४५ षटकांत ६ बाद १७५ धावा. मात्र याक्षणी आफ्रिकेच्या पारड्यात असलेली एकच महत्त्वाची आणि सकारात्मक गोष्ट म्हणजे त्यांची अत्यंत खोलवर असलेली फलंदाजी. त्यांचा मार्क बाऊचरसारखा खेळाडू नवव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास येणार होता. त्यामुळे आफ्रिकेच्या आशा अजूनही जिवंत होत्या. भरवशाचा लान्स क्लुस्नरही खेळपट्टीवर होता. शेवटी अखेरच्या २ षटकांत क्लुस्नर आणि बाऊचर फलंदाजी करत होते आणि शेवटच्या तीन विकेट हाताशी असताना आफ्रिकेला  विजयासाठी १८ धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाचा हुकमी गोलंदाज ग्लेन मॅकग्राने ४९ व्या षटकातील पहिल्या चार चेंडूंमध्ये अप्रतिम गोलंदाजी करून केवळ २ धावा देत बाऊचरचा त्रिफळा उडवला तर एलवर्थीही यादरम्यान धावचीत झाला. यानंतर उरलेल्या १० चेंडूंमध्ये १६ धावा करण्याचं आव्हान आफ्रिकेसमार होतं आणि क्लुस्नरच्या साथीला शेवटचा खेळाडू डोनाल्ड आला होता. सामना जवळपास ऑस्ट्रेलियाच्या खिशात गेलाच अशी लोकांची भावना झाली होती. मात्र त्याचवेळी आपल्या तडाखेबंद फलंदाजीने पुढच्या चार चेंडूंमध्ये क्लुस्नरने संपूर्ण सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. त्याने आधी मॅकग्राच्या पाचव्या चेंडूवर एक षटकार ठोकला आणि मग शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत अंतिम षटकासाठी स्ट्राइक आपल्याकडेच ठेवला. त्यानंतर डॅमियन फ्लेमिंगच्या शेवटच्या षटकात पहिल्या दोन चेंडूतच दोन खणखणीत चौकार ठोकत क्लुस्नरने धावसंख्या बरोबरीतही करून टाकली आणि काही मिनिटातच अवघ्या चार चेंडूंमध्ये त्याने आफ्रिकेला विजयाच्या तोंडाशी आणून ठेवलं.. आता चार चेंडूत हवी होती फक्त एक धाव... वर्ल्डकपमध्ये प्रथमच अंतिम फेरी गाठण्यापासून आफ्रिका फक्त एक धाव लांब होती... फ्लेमिंगचा चौथा चेंडू क्लुस्नरने लेगसाइडला मारला... विजयी धाव घेण्यासाठी डोनाल्ड लगेच चार पावलं पुढे सरकला होता... मात्र झपकन पुढे सरसावत डॅरन लिहमनने चेंडू पकडला  आणि नॉनस्ट्रायकर एंडवरील यष्टींवर थ्रो केला.. डोनाल्ड माघारी फिरला असला तरी अजून क्रीझबाहेरच होता... लाखो अफ्रिकन्सचा श्वास दोन सेकंदांसाठी तिथेच अडकला... मात्र लिहमनचा थ्रो थोडक्यासाठी चुकला... आणि आफ्रिकन खेळाडूंनी हुश्श केलं !!! पण  नियतीला आफ्रिकेचं हे जीवदान मंजूरच नव्हतं म्हणायचं... कारण पुढच्याच चेंडूवर सगळं काही व्यर्थ गेलं... फ्लेमिंगचा चौथा चेंडू ऑफसाइटला यॉर्कर लेंग्थला पडला.. तो नीट टायमिंग न झाल्याने धीम्या गतीने सरळ पुढे गेला. नॉन स्ट्रायकर एंडला धावचीत होण्याची शक्यता असल्याने क्लुस्नर चेंडू तटवताच जीवाच्या आकांताने पळत सुटला होता. इथे मिडऑफला क्षेत्ररक्षण करणाऱ्या मार्क वॉनेही चेंडूवर झडप घालत धडपडत का होईला पण तत्काळ थ्रो केला होता. नॉन स्ट्रायकर एंडवर थोडक्यात त्याचा नेम चुकला आणि क्लुस्नर य़शस्वीपणे क्रीझमध्ये पोहोचला... पण डोनाल्ड कुठे होता??? दुर्दैवाने डोनाल्डही अजून नॉन स्ट्रायकर एंडवरच थांबला होता.. चेंडू कुठे जातोय हे बघत राहिल्याने समोरून धावत येणाऱ्या क्लुस्नरकडे त्याचं लक्षच नव्हतं.. अखेर क्लुस्नरही त्याच्यापर्यंत पोहोचल्यावर डोनाल्ड महाशय ताळ्यावर आले... मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता... वॉने थ्रो केला केलेला चेंडू फ्लेमिंगने कलेक्ट करून तोपर्यंत यष्टिरक्षक गिलख्रिस्टकडे फेकला होता आणि गिलख्रिस्टने डोनाल्ड खेळपट्टीच्या मध्यापर्यंतही पोहोचण्यापूर्वीच बेल्स उडवून जल्लोषालाही सुरूवात केली होती... ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेच्या तोंडचा घास हिरावला होता... खरंतर सामना बरोबरीत (टाय) सुटला होता... मात्र विश्वचषकातील या सामन्यापूर्वीच्या सरस कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेवर कडी करत अंतिम फेरीत धडक मारली होती... दुर्दैवाने आफ्रिकेने पुन्हा एकदा आपला चोकर्स हा टॅग सार्थ ठरवला होता !!!

हॅट्ट्रिकची ट्रिक !!!



      वेस्टइंडिजच्या किमर रोचने सोमवारी नेदरलॅंडविरूद्ध खेळताना हॅट्ट्रिकची किमया साधली. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील ही सहावी हॅट्ट्रिक ठरली. यापूर्वी विश्वचषकात एकूण पाच हॅट्ट्रिक्स नोंदवल्या गेल्या असून त्यापैकी दोन श्रीलंकन गोलंदाजांच्या नावावर आहेत तर भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया यांच्या गोलंदाजाने प्रत्येकी एकदा ही किमया साधली आहे. विशेष म्हणजे भारताच्या चेतन शर्मानेच १९८७ साली विश्वचषकातील पहिल्या हॅट्ट्रिची नोंद केली होती. त्यानंतर १९९९ मध्ये पाकिस्तानचा साकलेन मुश्ताक, २००३ मध्ये लंकेचा चमिंदा वास आणि कांगांरूंचा ब्रेट ली आणि आता गेल्या विश्वचषकात लंकेच्याच लसिथ मलिंगाने बोनससकट हॅट्ट्रिकचा मान मिळवला होता. तर यंदाच्या विश्वचषकात किमर रोचने हा मान मिळवला. रोचपूर्वी विश्वचषकात पाहयला मिळालेल्या पाच हॅट्ट्रिक्सचा हा आढावा..

चेतन शर्मा (भारत), प्रतिस्पर्धी – न्यूझीलॅंड, स्थळ- नागपूर, ३१ ऑक्टोबर १९८७

     रिलायन्स कपच्या अ गाटातील या साखळी सामन्यात न्यूझीलॅंडने प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर ४ बाद १८१ अशी मजल मारली होती. ६० धावांची भागीदारी झाल्यानंतर रूदरफोर्ड आणि पटेल यांचा जम बसला होता आणि आता शेवटच्या षटकांत हाणामारी करून ते आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभी करून देण्याच्या तयारीत होते. तेव्हाच रवी शास्त्रीने १८१ या धावसंख्येवर पटेलला कपिल देवकरवी झेलबाद केले आणि किवीजना एक धक्का बसला. तरी अजून त्यांचा निम्मा संघ खेळायचा होता. मात्र त्यानंतर धावसंख्येत एकाच धावेची भर घातल्यानंतर न्यूझीलंडचा डाव गडगडला. चेतन शर्माने अप्रतिम गोलंदाजी करत चक्क तीन चेंडूंत तीन फलंदाजांच्या यष्ट्या वाकवल्या. सर्वात आधी त्याने रूदरफोर्डची मधली यष्टी मोठ्या थाटात गुल केली. यानंतर फलंदाजीला आलेल्या इयन स्मिथलाही चेतन शर्माचा इनस्विंगर कळला नाही आणि तो सुद्धा क्लीन बोल्ड झाला. चेतन शर्मा आता हॅट्ट्रिकच्या उंबरठ्यावर होता आणि समोर होता इव्हान चॅटफिल्ड.. बचावात्मक खेळण्याच्या नादात चेतनचा लेग स्टंम्पवरील चेंडू कधी त्याला त्रिफळाचीत करून गेला हे त्याला कळेपर्यंत भारतीय खेळाडूंनी उड्या मारत जल्लोष करायला सुरूवात केली होती. त्यानंतर न्यूझीलॅंडला ५० षटकांत २२१ या धावसंख्येवरच समाधान मानावे लागले आणि भारतीयांनी सुनिल गावस्करच्या शतकी खेळीच्या जोरावर सामना आरामात आपल्या खिशात घातला. विशेष म्हणजे या तिन्ही विकेट्स मिळवताना चेतन शर्माने फलंदाजाला त्रिफळाचीत केले होते.

साकलेन मुश्ताक (पाकिस्तान), प्रतिस्पर्धी- झिम्बाब्वे, स्थळ- ओव्हल, ११ जून १९९९

    चेतन शर्मानंतर विश्वचषकातील दुसऱ्या हॅट्ट्रिकची नोंदही आशियाई खेळाडूनेच केली. पाकिस्तानच्या साकलेन मुश्ताकने १९९९ साली ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेचे शेवटचे तीन बळी घेताना हॅट्ट्रिक नोंदवली. यात त्याने २७१ चा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेची ७ बाद १२३ अशी अवस्था असताना हॅट्ट्रिक घेऊन त्यांचा डाव त्याच धावसंख्येवर संपवून टाकला. साकलेनने आधी ओलोंगा आणि हकलला यष्टिचित केले तर तिसऱ्या चेंडूवर बंगवाला पायचीत पकडत हॅट्ट्रिक साजरी केली आणि पाकिस्तानच्या विजयावरही शिक्कामोर्तब केले.

चमिंदा वास (श्रीलंका), प्रतिस्पर्धी- बांग्लादेश, स्थळ- पीटरमेरीत्झबर्ग, १४ फेब्रुवारी २००३

    वासची हॅट्ट्रिक ही क्रिकेटच्या इतिहासात नेहमीच लक्षात ठेवली जाईल. या हॅट्ट्रिकचे वैशिष्ट्य म्हणजे चमिंदा वासने सामन्याच्या पहिल्या तीन चेंडूंवरच बांग्लादेशचे तीन अव्वल फलंदाज बाद करत अवघ्या काही मिनिटांतच सामन्याचे चित्र स्पष्ट केले  होते. यावेळी बांग्लादेशचा धावफलक ३ बाद ० असा केविलवाणा झाला होता. पुन्हा याही पुढे जाऊन त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर वासने आणखी एक विकेट घेत बांग्लादेशचा चौथा गडीही बाद केला आणि विश्वचषकात अनोखा विक्रम प्रस्थापित केला.

ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया), प्रतिस्पर्धी- केनया, स्थळ- डर्बन, १५ मार्च २००३

     केनयाविरूद्ध खेळताना ब्रेट लीनेही सामना सुरू होऊन तीनच षटके झाली असताना हॅट्ट्रिक घेऊन केनयाची वरची फळी कापून काढली. धावफलकावर केनयाच्या अवघ्या तीन धावा लागल्या असताना त्याने लागोपाठच्या तीन चेंडूंवर ओटिएनो, बी.जी. पटेल आणि ओबुयाला बाद करत हा पराक्रम केला. विशेष म्हणजे लीने २०-२० मध्येही हॅट्ट्रिकची किमया साधली आहे.



लसिथ मलिंगा (श्रीलंका), प्रतिस्पर्धी- दक्षिण आफ्रिका, स्थळ- गयाना, २८ मार्च २००७

     विश्वचषक इतिहासातील किंबहुना एकूणच क्रिकेटमधील सर्वात थरारक हॅट्ट्रिक म्हणून मलिंगाच्या या हॅट्ट्रिकचा उल्लेख करावा लागेल. या हॅट्ट्रिकचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ही कामगिरी बलाढ्य संघाविरूद्ध नोंदवली गेली होती. यापूर्वीच्या तीन हॅट्ट्रिक्स या तुलनेने दुबळ्या संघांविरूद्ध पाहायला मिळाल्या होत्या. मात्र प्रतिस्पर्धी द. आफ्रिका असणं यापेक्षाही या हॅट्ट्रिकचं महत्त्व आणखी एका वेगळ्या कारणासाठी खूपच जास्त होतं. कॅरेबियन बेटांवर झालेल्या विश्वचषकातील या लढतीत श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना फक्त २०९ धावा केल्या होत्या. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे आफ्रिकेनं अगदी सहजरित्या विजयाच्या दिशेने आपली वाटचाल केली होती. ४४.४ षटकांतच त्यांनी ५ बाद २०६ अशी मजल मारली आणि ३२ चेंडू व पाच विकेट्स हाताशी असताना आणखी ४ धावा जमवणं म्हणजे निव्वळ फॉर्मेलिटी उरली होती. खरंतर यावेळी सगळेच सुस्तावलेले होते. कारण सामना तसा संपल्यातच जमा होता. मात्र ४५ वं षटक टाकायला आलेल्या मलिंगाने गयानाच्या या मैदानावर एक अद्भुत चमत्कार करून दाखवला. आफ्रिकेच्या निव्वळ फॅर्मेलिटी राहिलेला विजय मिळवण्याच्या मार्गात मलिंगा नावाचे प्रचंड वादळ उठले होते. बघताबघता मलिंगाने सामन्याचे चित्रच पालटून टाकलं आणि लंकेला विजयाच्या उंबरठ्यावर आणून उभं केलं... हो, विजयाच्या उंबरठ्यावर.. आधी पंचेचाळीसाव्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर त्याने लागोपाठ पोलॉक आणि हॉलचे बळी मिळवून आफ्रिकेला ७ बाद २०६ वर आणलं. त्यानंतर मध्ये ४६ व्या षटकात आफ्रिकेने एक धाव काढली. मात्र पुन्हा पुढच्याच षटकात मलिंगा आला आणि यापूर्वीच्या दोन सलग चेंडूंवर बळी मिळवलेले असल्याने त्याला हॅट्ट्रिकची संधी होती.. कॅलिसला संगकाराकरवी झेलबाद करत त्याने हॅट्ट्रिक तर साधलीच.. मात्र लगेच पुढच्याच चेंडूवर एनटीनीलाही क्लीन बोल्ड करत सामना आफ्रिकेच्या जबड्यातून खेचून बाहेर काढला... आफ्रिका ९ बाद २०७.. आफ्रिकेला जिंकायला आणखी तीन धावा तर लंकेला १ विकेट.. पीटरसन फलंदाजीला होता.. आणि अक्षरश:  फक्त नशीब बलवत्तर म्हणून तो मलिंगाच्या एका अफलातून चेंडूवर बचावला.. चेंडू ऑफस्टंम्पला अगदी काही मिलिमीटरने चुकवत संगकाराच्या ग्लोव्समध्ये विसवला होता. पुन्हा पुढचाच चेंडू बॅटची कड घेता घेता राहून गेला.. काही मिनिटातच सामन्याचे चित्र पालटले होते.. आतापर्यंत रिलॅक्स असलेल्या आफ्रिकेच्या ड्रेसिंग रूममध्ये सन्नाटा होता, तर लंकेच्या ड्रेसिंगरूममध्ये अनपेक्षित कमबॅकने वातावरणात जान आली होती.. मात्र पुन्हा एकदा शेवटी नशीबाने आफ्रिकेची साथ दिली आणि मलिंगाने टाकलेला एक चेंडू पीटरसनच्या बॅटची कड घेऊन दुसऱ्या स्लीपच्या जागेतून निघत सीमारेषेपार गेला आणि आफ्रिकेने हा सामना जिंकला.. यावेळी जयवर्धनेने दुसरी स्लीप का नाही ठेवली म्हणून बरीच टीका झाली.. दुसरी स्लीप असती तर... वगैरे चर्चा झडल्या.. पण ते म्हणतात ना, क्रिकेटमध्ये या जर-तरला काहीच अर्थ नसतो... शेवटी मलिंगाच्या चमत्कारानंतरही आफ्रिकेने सामना जिंकण्यात यश मिळवले होते हेच सत्य होतं.. प्रथमच विश्वचषकात हॅट्ट्रिक साधूनही त्या संघाला सामना जिंकण्यात अपयश आलं होतं...



Sunday, March 6, 2011

बूम बूम आफ्रिदी


     बुधवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी बम बम भोलेचा जयघोष केला असेल. दुसऱ्या दिवशी त्यात थोडासा बदल झाला आणि सगळीकडे बूम बूमचा आवाज घुमला. कोलम्बोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये लिंबूटिंबू कॅनडाविरूद्ध पाकिस्तानच्या दादा फलंदाजांनी लोटांगण घातल्यानंतर देशाची इभ्रत वाचवण्याची जबाबदारी गोलंदाजांवर येऊन पडली होती. आणि अखेर ती त्यांनी चोख बजावलीही. मात्र या बचाव मोहिमेत मुख्य गोलंदाजांपेक्षा कर्णधार आफ्रिदीच भाव खाऊन गेला. कधीकाळी फक्त आक्रमक फलंदाज म्हणून जगविख्यात झालेल्या आफ्रिदीने चक्क चेंडू हातात घेऊन आपल्या गोलंदाजीने पाकला हा सामना जिंकवून दिला. पण खरंतर आता यात इतकं काही  आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. कारण चेंडूने करामत दाखवण्याची आफ्रिदीची ही काही पहिलीच खेप नव्हती. या विश्वचषकात तर आपल्या फिरकी गोलंदाजीनेच देशाला सामने जिंकवून द्यायचे असं तो ठरवूनच आलेला दिसतोय. कारण पहिल्या सामन्यात केनयाविरूद्ध खेळताना त्याने प्रतिस्पर्ध्यांचे पाच गडी गारद केले. तर दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा आपल्या फिरकीची कमाल दाखवताना लंकेविरूद्ध चार बळी टिपत त्यांच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. आणि आता या सामन्यात पुन्हा एकदा पाच गडींची किमया... निव्वळ तीन सामन्यांत तब्बल १४ गडी गारद करत आफ्रिदी या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.
     परवाच्या इंग्लंड विरूद्ध आयर्लंडच्या सामन्यात ओब्रायनने विश्वचषकातील सर्वात वेगवान शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू केल्यानंतर अनेकांना आफ्रिदीची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. लगेच इंटरनेटवर शोधाशोध करून आतपर्यंतचे वेगवान शतकांचे विक्रम तपासले गेले. आणि अर्थात येथील यादीत सर्वप्रथम नाव सापडले ते बूम बूम आफ्रिदीचेच. इतरांपेक्षा खूपखूप पुढे जात आफ्रिदीने केवळ ३७ चेंडूतच शतक ठोकण्याचा पराक्रम १९९६ साली केला होता. नैरोबी येथील सामन्यात श्रीलंकेविरूद्ध खेळताना आफ्रिदीनामक तुफानाने लंकेच्या सर्व गोलंदाजांच्या पार चिंधड्या उडवल्या आणि तब्बल ११ षटकार आणि ६ चौकारांसहित हे आपले फटाफट शतक साजरे केले होते. ११ षटकार आणि ६ चौकार.. हो, आपण वाचताना कोणतीही चूक केली नाहीये. म्हणजे हिशेब लावायचा झाला तर ११ षटकारांच्या ६६ धावा आणि ४ चौकारांच्या १६ धावा अशा एकूण ८२ धावा तर त्याने उभ्याउभ्याच चेंडू सीमारेषेपार टोलावून मिळवल्या होत्या. धावा पळून काढण्यात त्याचे चांगलीच कंजूष केली होती असं म्हणावं लागेल. आता इतक्या वर्षांचा इतिहास असणाऱ्या क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचा मान पटकावणारा फलंदाज नक्कीच स्पेशल असला पाहिजे. गंम्मत म्हणजे ही एकच वेगवान शतकी खेळी करून थांबेल तो आफ्रिदी कुठला.. वेगवान शतकांच्या यादीतील पहिल्या १० खेळींमध्ये याच पठ्ठ्याच्या तीन-तीन इनिंग्स समाविष्ट आहेत. आता बोला... थोडक्यात काय तर निव्वळ आपल्या फलंदाजीच्या जोरावर हा अस्सल पठाणी जगातील काही सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवण्याचा हक्कदार आहे. क्रिकेट इतिहासात तब्बल २८८ षटकार मैदनाबाहेर भिरकावून देणाऱ्या या फलंदाजाची महती बाकी कशामुळेच कमी होऊ शकत नाही. त्याचं फूटवर्क, अतिउत्साहीपणा, संयमाचा कसलाही मागमूस नसणे अशा शंभर कमतरता काढता येतील, पण म्हणून त्याच्या क्षमतेवर शंका घेण्याचे अजिबात कारण नाही. हे झालं फलंदाजीचं.. पण हा लेख ज्या कारमामुळे लिहायला घेतलंय ते कारणच मुळी वेगळंय.. इकडेच त्याची महानता सिद्ध होते बघा. कारण फलंदाजीबरोबरच तो एक गोलंदाज म्हणूनही प्रतिस्पर्ध्यांसाठी तितकाच धोकादायक ठरला आहे. एकदिवसीय सामन्यांतील फलंदाजीचे नानाविध विक्रम आपल्या नावावर करतानाच गोलंदाजीतही तीनशेहून अधिक विकेट्स घेण्याची किमया आफ्रिदीने करून दाखवली आहे. अशी अष्टपैलू कामगिरी करणारे खेळाडू जागतिक क्रिकेटमध्ये हाताच्या बोटांवर मोजण्याइतके सापडतील. पुन्हा त्याच्या आकडेवारीपेक्षाही प्रत्यक्ष मैदानावरील त्याचे अस्तित्वच जास्त बोलके आणि आक्रमक आहे.
    फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी आजतागयत या खेळाडूचे अनेकांनी गोडवे गाऊन झाले असतील. मात्र सध्या जो आफ्रिदी दिसतोय तो आणखी वेगळा आहे. आणखी परिपक्व आहे. विश्वचषकापूर्वी पाक संघाच्या कर्णधार निवडीवरून मोठे वादळ उठले होते. संघ जाहीर करूनही त्यांच्या कर्णधाराचा मात्र पत्ता नव्हता. अखेरीस शेवटच्या क्षणी आफ्रिदीकडेच हा काटेरी मुकुट कायम ठेवण्यात आला आणि आपल्या संघाला विश्वचषकात योग्य दिशा दाखवण्याचे काम शाहिदवर येऊन पडले. बरोबर १९ वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील आणखी एका पठाणी खेळाडूने असंच आपल्या संघाला सक्षम नेतृत्व देत देशासाठी वर्ल्डकपरूपी भेट आणली होती. तो खेळाडू होता १९९२ मधील पाकिस्तानच्या विश्वविजयी संघाचा कर्णधार इम्रान खान.. आपल्या नेतृत्वगुणांसाठी आणि लिडींग फ्रॉम द फ्रंट अप्रोचसाठी ओळखला जाणारा इम्रान खान.. आज नेमकं त्याच पावलांवर पाऊल टाकत शाहिद आफ्रिदी मैदानावर लढतोय. पाकिस्तानच्या संघात तेव्हाही असेच वादविवाद होते आणि आताही परिस्थिती बदललेली नाहीये. खरंतर वादविवाद हे पाकिस्तान क्रिकेटच्या पाचवीलाच पुजलेले असतात. त्यामुळे ते चित्र कधीच बदलणार नाहीये. पण त्यांच्यातला आणखी एक स्वभावही कधीच बदलणार नाहीये. तो म्हमजे त्यांच्या लढवय्येपणा.. जिंकण्याची जिद्द आणि आक्रमकता.. १९९२ प्रमाणेच आजही या संघात तीच जिद्द, तोच लढवय्येपणा आणि सुदैवाने तसेच लढाऊ आणि स्वकर्तृत्ववान नेतृत्व मौजूद आहे. विश्वचषकाआधीपासूनच या संघाला सगळेच डार्क हॉर्स मानत होते. आणि आता सुरूवातीचे तीनही सामने जिंकून ते मोठ्या थाटात आगेकूच करतायत. या तिन्ही सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणारा आफ्रिदी या संघात असताना जगातील कोणताही संघ त्यांना कमी लेखण्याची घोडचूक करणार नाही. बाकी वादविवादांप्रमाणेच अनिश्चितता हे सुद्धा पाकिस्तानच्या खेळाचे वैशिषट्य राहिलेले आहे. त्यामुळे ते कधी हिट ठरतील आणि कधी फुस्स होतील याचा काही नेम नाही. परंतु या पहिल्या तीन सामन्यांतून त्यांनी सगळ्यांनाच सावधानचा इशारा दिलाय एवढं मात्र नक्की.