Wednesday, January 5, 2011

"द पिंक टेस्ट"

       अक्षरश: पहिल्या दिवसापासून क्रिकेट जगतात गाजत असलेली अॅशेस मालिका सध्या सिडनी टेस्टमधील एका वेगळ्यात कारणासाठी चर्चेत आहे. ज्यांनी सिडनी टेस्टचं प्रक्षेपण पाहिलं असेल त्यांना या टेस्टमधील वेगळेपण लगेच जाणवलंही असेल. कारण कसोटी क्रिकेटचा ट्रेडमार्क रंग असलेल्या पांढर्या रंगाबरोबरच या सामन्यादरम्यान आणखी एका गोडगुलाबी रंगाची उधळण मैदानावर होताना दिसतेय...अगदी स्टंम्पस् पासून सीमारेषेवरील साइन बोर्डसपर्यंत...आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या टीशर्टवरील लोगोपासून स्टेडियममध्ये बसलेल्या हजारो प्रेक्षकांच्या कपडे, टोप्यांपर्यंत... अशी चौफेर  गुलाबी रंगाची पेरणी झालेली आहे... अगदी वोडाफोननेही आपल्या नेहमीच्या लाल रंगाला टाटा बायबाय करत गुलाबी रंगाला आपलंस केलंय... ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी तर यासाठी आपल्या आवडत्या बॅगी ग्रीन कॅपलाही काही काळासाठी दूर सारलं...इंग्लंडची बार्मी आर्मीही या टेस्टसाठी गुलाबी रंगात नटलीये...किंबहुना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तर या टेस्टला अधिकृतरित्या पिंक टेस्ट म्हणूनच घोषित केलंय... कारण ही टेस्ट सेलिब्रेट केली जातेय ती ऑस्ट्रेलियाचा माजी तेज गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याच्या मॅकग्रा फाऊंडेशनसाठी... "टुगेदर वी कॅन मेक डिफरन्स" हे ब्रीदवाक्य घेऊन मॅकग्राची ही स्वयंसेवी संस्था ऑस्ट्रेलियात ब्रेस्ट कॅन्सरसंबंधी जनजागृती करण्याचे तसेच या रोगाने ग्रासलेल्या रुग्णांना योग्य ते उपचार मिळवून देण्याचे मोठे काम करीत आहे. ११ वर्षे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर मॅकग्राची इंग्लिश पत्नी जेन हिचे याच कारणाने निधन झाले होते. मात्र स्वत: या रोगाला बळी पडण्यापूर्नी तिने आपल्यासारखीच वेळ इतर ऑस्ट्रेलियन महिलांवर येऊ नये म्हणून यासंबंधी जनजागृती करण्यासाठी एक चॅरिटी स्थापन केली होती. तिच्या निधनानंतर मॅकग्रानेही या फाऊंडेशनचे काम आव्याहतपणे सुरू ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून ब्रेस्ट कॅन्सरविरोधी मोहिमेचे प्रतीक असलेल्या गुलाबी रंगाची उधळण या सिडनी टेस्टमध्ये करण्यात आली आहे. क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक कार्याला हातभार लावण्याचा हा आणखी एक चांगला प्रयत्न म्हणायला हवा. एक उत्तम खेळाडू म्हणून गाजलेल्या मॅकग्राची समाजकार्यातीलही ही यशस्वी खेळी...

      ग्लेन मॅकग्राप्रमाणेच आणखीही काही क्रिकेटपटूंनी याआधी असा सामाजिक कार्याचा वसा उचललेला आहे. त्यामध्ये पाकिस्तानच्या इम्रान खानचे नाव नेहमीच अग्रभागी असेल. आपल्या आईला कॅन्सर झाल्यानंतर इम्रानला तिची ट्रीटमेन्ट करण्यासाठी परदेशात जाणे भाग पडले होते. कारण तोपर्यंत पाकिस्तानमध्ये कॅन्सरवर उपचार करणारे असे हॉस्पिटलच नव्हते. जिंदादिल इम्रानला ही गोष्ट खूप बोचली आणि त्यानंतर त्याने आपली सर्व शक्ती वापरून जगभरातून निधी गोळा करून पाकिस्तानातील पहिलेवहिले कॅन्सर हॉस्पिटल उभारले. इम्रानच्या आईच्या नावाने नामकरण झालेले हे शौकत खानुम मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल आजही पाकिस्तानातील सर्व कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान ठरत आहे. भारताबद्दल म्हणायचं झालं तर सचिनचं 'अपनालय'चं समाजकार्यही आपल्या परिचयात आहे. क्रिकेटमध्ये आपल्या कर्तृत्वाने यशाची शिखरे गाठणार्या या खेळाडूंच्या व्यक्तिमत्वातील हा माणुसकीचा कोपरा यांना खरंच अजून मोठ्ठं करतो. रियली हॅट्स ऑफ टू देम !!!

No comments:

Post a Comment