Wednesday, January 12, 2011

शोकांतिका भारतीय फुटबॉलची...

       यंदा तब्बल २७ वर्षांनंतर भारतीय फुटबॉल संघ 'एशिया कप'साठी पात्र ठरला आहे.  द.आफ्रिकेबरोबरच्या क्रिकेट सामन्यांमुळे तशी फारच कमी क्रीडाप्रेमींनी याची दखल घेतलीये. मात्र सर्वात निराशाजनक बाब म्हणजे भारतीय मीडियाचंही याकडे दुर्लक्ष झालंय. १० जानेवारीपासून सुरू झालेल्या या एशिया कपच्या पहिल्याच सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून ४-० असा सपाटून मार खावा लागलाय खरा... मात्र १९८४ नंतर प्रथमच या स्पर्धेत खेळण्याची संधी भारताला मिळतेय हेही नसे थोडके !!! आणि जागतिक रॅंकिंगमध्ये २६व्या तर आशिया खंडात नंबर १ वर असलेल्या ऑस्ट्रेलियासमोर १४२ क्रमांकाच्या भारताची डाळ शिजणे जरा अवघडच होते. त्यामुळे हा निकाल तसा अपेक्षितच म्हणायला हवा. यानंतरही ग्रुप स्टेजमध्ये भारताची गाठ द. कोरिया आणि बहरीनसारख्या तगड्या टीम्सशी पडणार आहे. यातील कोरियाचे रॅकिंग ४० तर बहरीनचे रॅंकिंग ९३ आहे. त्यामुळे यापैकी एकाजरी सामन्यात भारताने ड्रॉ किंवा विजय संपादन केला तर तो चमत्कारच म्हणायला हवा. मात्र  अशा चमत्काराची आशा ठेवायला हरकत नाही.

        सध्या जेमतेम कामगिरी करणार्या भारतीय फुटबॉल टीमने कधी काळी याच एशिया कपच्या फायनलमध्येही धडक मारली होती, हे कळल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतील. इतकंच नाही तर १९५६ च्या ऑलिम्पकमध्ये भारतीय फुटबॉल संघाने चक्क सेमीफायनल गाठण्याचा पराक्रम केला होता. म्हणजे पदकापासून ते केवळ एक पाऊल मागे राहिले होते. याहून वरचढ म्हणजे गेल्यावर्षी भारतीयांनी डोक्यावर घेतलेल्या फिफा विश्वचषकाच्या इतिहासात कधीकाळी भारतही पात्र ठरला होता. (मात्र फिफाने भारतीयांच्या शूजशिवाय खेळण्याच्या पद्धातीला आक्षेप घेतल्याने तसेच यासाठी ब्राझीलला जाणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या १९५०च्या या विश्वचषकातून भारताने अखेर माघार घेतली होती. तसेच ही आकडेवारी वरकरणी धूळफेकच मानू शकतो. कारण १९५६चे ऑलिम्पिक तसेच ५० चा विश्वचषक या दोन्ही स्पर्धांमध्ये जगातील बहुतांश मुख्य देशांनी माघार घेतल्याने भारताला ही मजल मारता आली होती. :P) मात्र तरी, आजच्या तुलनेत नक्कीच भारताची कामगिरी त्यावेळी खूपच उजवी होती एवढं नक्की. ५०-६० ची दशकं हा तर भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ म्हणता येईल. ६४च्या एशिया कपमधील उपविजेतेपद तसेच इतर स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत भारताची घाैडदाैड बर्यापैकी सुरू होती. त्यामानाने भारतीय फुटबॉलचा हा भरभराटीचा काळ लक्षात घेतल्यास सध्याची अवस्था पाहून भारतीय फुटबॉलप्रेमींना हळहळण्याखेरीज गत्यंतर नाही. आजही भारतीय फुटबॉची ओळख ही फक्त बायचुंग भुतियापुरतीच मर्यादित असावी ही खरंतर निराशाजनक बाब म्हणायली हवी. अजूनही आपल्या पूर्ण संघाची मदार या ३४ वर्षीय खेळाडूवर  असणे ही गोष्ट अजिबात भूषणावह नाही. त्यातल्यात्यात गेल्याकाही काळात आपल्या जबरदस्त खेळाने अनेकांचे लक्ष वेधून घेणारा आणि परदेशी क्लबसाठी खेळण्याचा मान मिळवणारा स्ट्रायकर सुनिल चेत्री ही भारताची नवी उमेद आहे. मात्र हे तुरळक अपवाद वगळता दर्जेदार खेळाडूंची वानवाच दिसते.

           गंमत म्हणजे भारतीय संघाच्या कामगिरीपेक्षा फुटबॉलबाबतचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन आणखीनच निराशाजनक आहे. एकीकडे दररोज टी.व्ही.ला चिकटून ईपीएल, स्पॅनिश ला लीगा, चॅम्पियन्स लीग फॉलोव करणार्या आपल्याला भारतीय फुटबॉल संघाचे तर साधे शेड्यूलही माहीत नसते. मॅंचेस्टर युनायटेड, चेल्सी यांच्यासाठी देव पाण्यात घालून बसणारे, त्यांचे कट्टर समर्थक म्हणवणारे आपण भारतीय प्रेक्षक आपल्या देसी फुटबॉलची किती माहिती ठेवतो हा प्रश्न अनेकांना अडचणीत टाकणारा ठरेल. मेसी, रूनी, रोनाल्डो, टेरी यांच्या नावाचे टीशर्ट मोठ्या अभिमानाने मिरवणार्या आपले भारतीय फुटबॉलचे ग्यान मात्र भुतियापासून सुरू होउन भुतियावरच संपते. त्यामुळे देशात फुटबॉलबद्दल असलेली अनास्था या फुटबॉलच्या शोकांतिकेत भरच घालत असते. खरंतर भारतीय संघाची कामगिरी आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद या दोन्ही गोष्टी एकमेकांना परस्पर पूरक म्हणायला हव्यात. कारण भारतीय फुटबलचा दर्जा तितकासा चांगला नसल्याने त्यात आम्हाला रस नाही असं म्हणून आम्ही मोकळे होतो आणि देशात कोणाला इंटरेस्टच नाही म्हंटल्यावर तो दर्जा वाढणार तरी कसा असा यक्षप्रश्न निर्माण होतो... आजही फुटबॉल म्हंटलं की गोवा, केरळ, बंगाल ही मोजकीच राज्यं डोळ्यासमोर येतात.. वर्षानुवर्षे नॅशनल लीगवर (आत्ताची आय लीग) इस्ट बंगाल, डेम्पो, मोहन बगान, जेसीटी, चर्चिल ब्रदर्स यांचंच वर्चस्व दिसून येतं. मग हा खेळ वाढतोय तरी कुठे असं वाटल्याखेरीज राहत नाही... पण मुळात तो वाढेलच का ? कारण मुंबईपुरतं तरी बोलायचं झालं तर सर्वसाधारणपणे  आपला फुटबॉलशी संबंध येतो तो जास्तीतजास्त पावसाळ्यातील रांगडा फुटबॉल खेळण्यापुरता.. इकडे साधं फुटबॉलचा ऑफसाइडच्या नियमाचा अर्थ लावतालावताही आपल्या नाकीनऊ येतात. गंमत म्हणजे इकडेही क्रिकेटच्या टर्म्सशी घुसखोरी थांबत नाही. (ऑफसाइडबरोबर आमच्या पोरांनी फुटबॉलमधली लेगसाइडही शोधून काढलीये.) चुकून आपल्यामधला कोणी कॉन्वेन्ट शाळेत शिकत असेल तर त्याच्या रूपात आपल्या फुटबॉल ज्ञानात भर पडते. आणि ही कॉन्वेन्टचीच मुलं थोडंफार काय ते शाळेत सिरीयस फुटबॉल खेळतात. (त्या दर्ज्यावरही प्रश्नचिन्ह आहेच ) बिपिन फुटबॉल केंद्रासारखी मोजकी शिबिरं या मोजक्या उगवत्या फुटबॉलप्रेमींना पुढचं व्यासपीठ उपलब्ध करून देतात. मात्र तिथे पोहोचेपर्यंत देशात फुटबॉलला मिळणारा प्रतिसाद पाहून त्या मुलाचं फुटबॉलचं भूत उतरलेलं असतं. पालकांनी या खेळाला पाठिंबा देण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. ( आयपीएलमध्ये मालामाल होत असलेल्या स्थानिक क्रिकेटपटूंच्या तुलनेत इंडियन फुटबॉल लीगमधील मानधनाचा विषयच न काढलेला बरा) मग होऊन होऊन भारतीय फुटबॉलची प्रगती होणार तरी कशी ? जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असणार्या या खेळाचे भारतातील आजचे चित्रही निराशाजनक आहे आणि भविष्यात ते सुधारण्याची चिन्हंही दिसत नाहीयेत..किमान तसे प्रयत्न तरी होताना दिसत नाहीयेत.. ( फिफाच्या विस्तार धोरणात पुढील लक्ष्य भारत असल्याने आशेचा किरण आहे म्हणा.. मात्र थेट वरच्या पातळीवर काही होण्यापूर्वी ग्रास रूटवर बदल होणं महत्त्वाचं आहे हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नाही)
      ही सगळी परिस्थिती पाहता  आपण आयुष्यभर फक्त मॅनयू आणि चेल्सीचेच घोडे नाचवत राहणार का असा प्रश्न पडल्याखेरीज राहत नाही.. मात्र आत्ता या क्षणी निदान आपण आपल्यापरीने तरी ही परिस्थिती सुधारण्यासाठी हातभार लावावा...दोन दिवस नाक्यावर ईपीएल ऐवजी एशिया कपची चर्चा झाली तरी मोठ्ठं यश म्हणावं लागेल. कोण जाणे आपल्या संघाने बहरीन किंवा कोरियाला रोखत चमत्कार करून दाखवला तर...लेट्स होप फॉर द बेस्ट !!!

2 comments:

  1. छान,
    खूप नवीन माहिती दिली आहे.

    ReplyDelete
  2. धन्यवाद आशिष आपल्या अभिप्रायाबद्दल...

    ReplyDelete