हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला!!! |
१३ मार्च १९९६... विल्स वर्ल्डकपचा उपांत्य सामना... खच्चून भरलेलं कोलकात्याचं इडन गार्डन्सचं स्टेडियम.. भारत आणि श्रीलंका हे स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी केलेले दोन संघ आमनेसामने.. डिसिल्व्हा आणि रोशन महानामा यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर लंकेने अडीचशेचा टप्पा ओलांडला आणि भारताला ५० षटकांत २५२ धावा करण्याचे लक्ष्य दिलं.. सिद्धूला लवकरच गमावल्यानंतर सलामीला आलेल्या सचिनने सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती आणि लंकन गोलंदाजांची यथेच्छ धुलाई सुरू होती.. वन-डाऊन आलेला संजय मांजरेकरही त्याला चांगली साथ देत होता.. बघता बघता २२ व्या षटकात भारताने १ बाद ९८ अशी मजल मारली.. या स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावणारा सचिन अशा झोकात फलंदाजी करत असताना भारताचा विजय अगदीच सहज वाटत होता.. मात्र नेमकं तेव्हाच एक अघटित घडलं आणि संपूर्ण सामन्याचं चित्रच पालटलं.. जयसूर्याचा सचिनला टाकलेला लेग स्टम्पवरील एक चेंडू हलकासा त्याच्या मांडीवर आदळला आणि तसाच पुढे जाऊन यष्टीरक्षक कालुवितरनाच्या ग्लोव्समध्ये चिकटला. चेंडू पायाला लागून कुठे गेलाय याची कल्पना न आल्याने स्वाभाविक हालचाल म्हणून सचिनने आपला पाय क्रीझबाहेर काढला आणि इकडेच भारतीय संघाचा घात झाला.. कालुवितरनाने क्षणाचाही विलंब न लावता बेल्स उडवल्या आणि सचिन यष्टिचित कम रनआऊट असा विचित्र पद्धतीने बाद झाला.. खरंतर आणखी आठ विकेट्स शिल्लक असताना लंकेच्या धावसंख्या गाठणे भारताच्या आवाक्यातच होतं.. मात्र अचानक लंकन स्पिनर्सचा चेंडू काहीतरीच टर्न घेऊ लागला आणि याने भारताचे सचिनसकट पुढील ७ फलंदाज अवघ्या २२ धावांत माघारी परतले.. १ बाद ९८ वरून भारताची हालत ८ बाद १२० अशी झाली..
संतापलेल्या प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये जाळपोळ केली. |
अशा स्थितीत भारताचा विजय अशक्यप्रायच होता. आणि इडन गार्डनमधील प्रेक्षकांनाही याची जाणीव झाली होती.. त्यामुळे काही प्रेक्षकांचा राग अनावर होऊन मैदानावर विचित्र परिस्थती ओढावली. काही प्रेक्षकांनी मैदानावर पाण्याच्या बाटल्या फेकण्यास सुरूवात केली. तसेच काहींनी तर स्टेडियममधील खुर्च्याच पेटवून दिल्या. यामुळे पंचांना सामना थांबवावा लागला. त्यानंतर परिस्थिती आवाक्यात आणून पुन्हा एकदा पंधरा मिनिटांनी सामना रिस्टार्ट करण्याचा प्रयत्न झाला...पण पुन्हा तेच.. प्रेक्षकांची हुल्लडबाजी काही थांबत नव्हती.. शेवटी सामनाधिकाऱ्यांनी सामना संपल्याचे घोषित केले आणि स्कोअरबोर्डवरील लंकेचे वर्चस्व लक्षात घेऊन त्यांना सामना बहाल केला. भारत सामना तर हरलाच होता आणि भारतीय प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीने आपली आणखीच नाचक्की झाली होती.. एवढ्या सगळ्या गोंधळात सामना संपल्याचे घोषित झाल्यानंतर याचंच एक प्रतिबिंब म्हणून पॅव्हेलियनकडे परतणाऱ्या विनोद कांबळीचे दृश्य पाहायला मिळालं.. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर विनोद फक्त समोरील बाजूस पडणाऱ्या विकेट्सच बघत होता. कोणीच खेळपट्टीवर थांबण्याचे नाव घेत नव्हतं. विनोद मात्र आपला नॉन-स्ट्रायकर एंडवरून हा तमाशा पाहत होता.. शेवटी सामनाच संपल्याचे घोषित झाल्यानंतर विनोदला आपलं रडू आवरलं नाही.. पॅव्हेलियनकडे परततानाच त्याने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.. भारताच्या निराशाजनक कामगिरीने आणि प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीने विनोद प्रचंड दुखावला होता.. आणि त्याला त्या भावना यावेळी लपवता आल्या नाहीत...भारत स्पर्धेबाहेर झाला होता तर लंकेने अंतिम फेरीत धडक मारली होती. मग पुढच्याच सामन्यात कांगारूंना धूळ चारत रणतुंगाच्या नेतृत्वाखाली त्यांनी हा विश्वचषकही खिशात घातला.
No comments:
Post a Comment