Friday, April 1, 2011

मॅचफिक्सिंगचं (खोटारडं) भूत...



     सकाळी बसमध्ये बसलो तर पाठी दोन माणसं आपापसात बडबडत होती. काही नाही रे, लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत. सगळं फिक्स आहे. ते क्रिकेटर्स आधीच मालामाल झालेयत. दुसराही त्याला मनापासून दुजोरा देतो. ट्रेन पकडली तर तिकडे यापेक्षाही काही उत्साही मंडळी.. अरे एकेकाला पकडून मारला पाहिजे या इंडियन टीममधल्या. एक नंबरचे चोर साले.. सगळा वर्ल्डकप फिक्स केलाय रे यांनी. मग यावर बाकी महाशयही आपल्याला कसं या बुकीचं रॅकेट माहितेय आणि त्याने आपल्याला कसं सगळं सांगितलंय हे सांगून आणखीन भाव खाण्याचा प्रयत्न करातात. घरी येऊन फेसबुकात डोकं घातलं तर तिकडे याहून वरचढ! क्रिकेट तज्ज्ञ आणि पोहोचलेले बुकीही जितक्या आत्मविश्वासाने सांगू शकणार नाहीत, त्यापेक्षा जास्त ज्ञान असल्याचा आव आणत काही लोकांनी सामना सुरू असतानाच अंतिम स्कोअरबोर्डसहित सामन्याचा निकालही सांगून टाकला आणि मॅच फिक्स असल्याचा पक्का दावा केला. तिकडे एक थर्डक्लास न्यूज चॅनेलवर कोण एक ऑफिसर येऊन भारत पाकिस्तान सामना फिक्स असून भारत तो एवढ्य़ा एवढ्या रन्सने हरणार याचा दिंडोरा पिटायला सुरूवात केली होती. या चॅनेलने तर कहरच करत संपूर्ण दिवस हीच बातमी चालवली होती आणि एक्स्लुसिवच्या नावाखाली टीआरपी वाढवण्याचा डाव मांडला होता. नशीब भारत सामना जिंकला, नाहीतर आमची बातमी कशी बरोबर ठरली हे मिरवत यांनी काय केलं असतं ते देवालाच ठाऊक!

      
     
    हे सगळं बघितल्यावर एकच प्रश्न विचारावासा वाटतो. आपण कधीपासून एवढे बेजबाबदार झालो? कसलीही माहिती नसताना निव्वळ प्रसिद्धीसाठी आपण एका खेळालाच बदनाम करत सुटलोय याचं अजिबात भान नाही का आपल्याला? फेसबुकवर हा सामना फिक्स आहे असा दावा करणाऱ्या मंडळींनी आयुष्यात एकदा तरी बेटिंग कसं चालतं हे बघितलं तरी असतं का? ते जाऊद्या. पण यांच्या या विधानांवरून त्यांना क्रिकेटबद्दल तरी काही कळतं का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. भारत- पाकिस्तानसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांत होणाऱ्या अटीतटीच्या लढतीत संपर्ण मॅच फिक्स करणं म्हणजे काही खाऊचं काम आहे का? अहो, भारत पाकिस्तानच्या प्लेयर्सना असं ठरवून हव्या त्या बॉलला आऊट करता आलं असतं वा हव्या त्या चेंडूवर षटकार मारणं शक्य असतं तर इतकी वर्षे ऑस्ट्रेलियाने क्रिकेट जगतावर आपलं वर्चस्व नसतं ना गाजवलं! क्रिकेटसारख्या अनिश्चिततेच्या खेळात पुढच्या चेंडूवर काय होईल याची खुद्ध खेळाडूंनाही कल्पना नसताना संपूर्ण मॅच फिक्स करणं कसं शक्य आहे असा साधा विचारही या मंडळींच्या डोक्यात येत नाही हेच दुर्देव आहे. याआधी असले प्रकार घडलेयत हे मान्य आहे. पण तेव्हाही संपूर्ण सामना असा 22 जणांनी मिळून फिक्स वगैरे केला नव्हता. आणि ते तसं करणं मुळात शक्यच नाही. कोणताही खेळाडू आपल्या स्वत:च्या खेळावरही पूर्ण नियंत्रण ठेवूच शकत नाही. म्हणजे आपण उदाहरण घ्यायचं म्हंटलं की समजा एका संघातील फलंदाज आणि दुसऱ्या संघातील गोलंदाज यांनी मिळून फिक्स केलं की या फलंजादाने 10 धावा करून बाद व्हायचं. तर हे असं करणंही किती कठीण आहे याची कल्पना तरी आहे का? कोणास ठाऊक त्या गोलंदाजाचा एक सुमार चेंडूही नकळत शून्यावरच त्या फलंदाजाचा त्रिफळा उडवून जाईल किंवा 10 धावांवर फलंदाजी करताना बाद व्हायचं ठरवूनही चेंडू बॅटची कड घेऊन पाठी सीमारेषेपार जाईल. अहो, इकडे ही हालत असताना संपूर्ण सामना इतक्या इतक्या धावांनी हा संघ जिंकणार किंवा तो संघ जिंकणार असा फिक्स करणं साक्षात ब्रह्मदेव खाली उतरला तर त्यालाही शक्य होणार नाही. पुन्हा आत्ता आत्ताच स्पॉट फिक्सिगंमध्ये सापडलेल्या खेळाडूंच्या करीयरची झालेली वाताहत पाहून आणि आयसीसीची असल्या गोष्टींवरची करडी नजर लक्षात घेता कोण खेळाडू असली हिम्मत करेल हो.. बरं, पुन्हा इकडे असेही काही थोर टीकाकार आहेत, ज्यांचा दावा तर हाच आहे की आयसीसीनेच पैसे कमवण्यासाठी संपूर्ण वर्ल्डकप फिक्स केलाय आणि म्हणून आपण जिंकतोय. आता यावर शहाण्याने प्रत्युत्तर न दिलेलंच बरं असं वाटू लागलंय मला.


1 comment:

  1. कधीतरी काढलेल्या एखाद-दुसऱ्या शतकाच्या जोरावर संघात जागा अडवून बसणारे खेळाडूच याला जबाबदार आहेत.

    ReplyDelete