Monday, March 21, 2011

प्लॅटफॉर्मवर राहून ट्रेनशीच वैर !!! टाटाची अनोखी शक्कल...

       'पाण्यात राहून माशांशी वैर बाळगू नये' असं मराठीत म्हंटलं जातं. मात्र सध्या दादर, वाशी तसेच इतर प्रमुख रेल्वेस्थानकांवर नजर फिरवली असता यात थोडासा बदल करून 'प्लॅटफॉर्मवर राहून ट्रेनशीच वैर बाळगू नये' असं म्हणावसं वाटतंय. आपणापैकी कोणी गेल्या काही दिवसांत मुंबईच्या लोकल रेल्वे स्थानकांवर नजर फिरवली असल्यास जिकडे-तकडे टाटाच्या इंडिका इ व्ही 2 या गाडीच्या जाहिराती पाहायला मिळाल्या असतील. मोठ्या प्रमाणावर टाटाने रेल्वे स्थानकांवर याची जाहिरात केल्याने त्या पटकन डोळ्यांत भरण्यासारख्या आहेत. मात्र या जाहिराती प्रवाशांचं लक्ष खेचून घेण्यात यशस्वी ठरतायत त्याचं आणखी एक कारण म्हणजे या जाहिरातीतील आशय..


        
           पेट्रोल प्राइसेस मोकिंग यू टेक द ट्रेन? असा प्रश्न विचारून टाटाने आपल्या या इंडिका इ व्ही 2 गाडीची फ्युएल एफिशियन्सी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच आता पेट्रोलच्या महागाईमुळे तुम्हाला नाईलाजाने ट्रेनचा मार्ग पत्करावा लागतोय, तर मग आमच्या प्रतिलिटर 25 किमी पळणाऱ्या आणि भारतात सर्वात जास्त अॅव्हरेज देणाऱ्या गाडीची निवड करा आणि थोडक्यात ट्रेनचा प्रवास टाळा असाच संदेश या जाहिरातीतून देण्याचा प्रयत्न टाटाने केला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. एरव्ही या आशयाची जाहिरात फारशी आकर्षक ठरली नसती. मात्र टाटाने मोठी शक्कल लढवून रेल्वे स्थानकांतच मोठमोठाले बॅनर लावून ही जाहिरात केल्याने हा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.  हे सगळं पाहिल्यानंतर रेल्वेने आपल्या स्थानकांवर जाहिराती स्वीकारताना त्या जाहिरातीचा आशय एकदाही पाहू नये का ? का ते पाहूनही रेल्वेला त्यात आक्षेपार्ह काहीच वाटत नाहीये ? असे अनेक प्रश्न पडलेयत. हे म्हणजे मुंबईत मटाने लोकसत्तामध्येच आपली जाहिरात छापण्यासारखा प्रकार आहे.

       पुन्हा आत्ताच या पोस्टसाठी फोटो शोधता शोधता एका ब्लॉगवर या जाहिरातीतील आणखी एक विचित्र गोष्ट लक्षात आली. या ब्लॉगवर टाटाच्या या जाहिरातीतील एक फोलपणाही उघड केलाय. या जाहिरातीच्या खालच्या बाजूला छोट्याशा अक्षरात  एआरएआयने ही गाडी सीआरफोर इंजिनमध्ये 25 किमी प्रतिलिटर पळत असल्याचा दाखला दिला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पण मग डिझेल इंजिनवर गाडी हा परफॉर्मन्स देत असताना जाहिरातीत पेट्रोलचा उल्लेख अशारितीने करणे म्हणजे ग्राहकांची फसवणूक करण्यासारखेच झाले नाही का ? 

3 comments:

  1. मझ्या लहानश्या प्रयत्नाला आपण प्रतिसाद दिला त्या बद्दल मी आपला आभारी आहे .
    धन्यवाद

    ReplyDelete
  2. नमस्कार
    आपला ब्लॉगमराठीनेटभेटब्लॉगकट्ट्यात समाविष्ट करण्यात आला आहे
    आपल्या प्रतिसादाबद्दल नेटभेटब्लॉगकट्टा आपला आभारी आहे
    आपण जोडलेले विजेट आपण पुन्हा एकदा जोडावे कारण मराठीनेटभेटब्लॉगकट्ट्याचा पत्ता बदललेला आहे.
    नवीन पत्ता खाली दिला आहे.
    (www.marathinetbhetblogkatta.blogspot.com)
    धन्यवाद

    ReplyDelete
  3. नवीन विजेट जोडले. आपला हा प्रयत्न उत्तरोत्तर आणखी बहरत जावा या शुभेच्छा!!!

    ReplyDelete