बुधवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी ‘बम बम’ भोलेचा जयघोष केला असेल. दुसऱ्या दिवशी त्यात थोडासा बदल झाला आणि सगळीकडे ‘बूम बूम’चा आवाज घुमला. कोलम्बोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये लिंबूटिंबू कॅनडाविरूद्ध पाकिस्तानच्या दादा फलंदाजांनी लोटांगण घातल्यानंतर देशाची इभ्रत वाचवण्याची जबाबदारी गोलंदाजांवर येऊन पडली होती. आणि अखेर ती त्यांनी चोख बजावलीही. मात्र या बचाव मोहिमेत मुख्य गोलंदाजांपेक्षा कर्णधार आफ्रिदीच भाव खाऊन गेला. कधीकाळी फक्त आक्रमक फलंदाज म्हणून जगविख्यात झालेल्या आफ्रिदीने चक्क चेंडू हातात घेऊन आपल्या गोलंदाजीने पाकला हा सामना जिंकवून दिला. पण खरंतर आता यात इतकं काही आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. कारण चेंडूने करामत दाखवण्याची आफ्रिदीची ही काही पहिलीच खेप नव्हती. या विश्वचषकात तर आपल्या फिरकी गोलंदाजीनेच देशाला सामने जिंकवून द्यायचे असं तो ठरवूनच आलेला दिसतोय. कारण पहिल्या सामन्यात केनयाविरूद्ध खेळताना त्याने प्रतिस्पर्ध्यांचे पाच गडी गारद केले. तर दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा आपल्या फिरकीची कमाल दाखवताना लंकेविरूद्ध चार बळी टिपत त्यांच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. आणि आता या सामन्यात पुन्हा एकदा पाच गडींची किमया... निव्वळ तीन सामन्यांत तब्बल १४ गडी गारद करत आफ्रिदी या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.
परवाच्या इंग्लंड विरूद्ध आयर्लंडच्या सामन्यात ओब्रायनने विश्वचषकातील सर्वात वेगवान शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू केल्यानंतर अनेकांना आफ्रिदीची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. लगेच इंटरनेटवर शोधाशोध करून आतपर्यंतचे वेगवान शतकांचे विक्रम तपासले गेले. आणि अर्थात येथील यादीत सर्वप्रथम नाव सापडले ते बूम बूम आफ्रिदीचेच. इतरांपेक्षा खूपखूप पुढे जात आफ्रिदीने केवळ ३७ चेंडूतच शतक ठोकण्याचा पराक्रम १९९६ साली केला होता. नैरोबी येथील सामन्यात श्रीलंकेविरूद्ध खेळताना आफ्रिदीनामक तुफानाने लंकेच्या सर्व गोलंदाजांच्या पार चिंधड्या उडवल्या आणि तब्बल ११ षटकार आणि ६ चौकारांसहित हे आपले फटाफट शतक साजरे केले होते. ११ षटकार आणि ६ चौकार.. हो, आपण वाचताना कोणतीही चूक केली नाहीये. म्हणजे हिशेब लावायचा झाला तर ११ षटकारांच्या ६६ धावा आणि ४ चौकारांच्या १६ धावा अशा एकूण ८२ धावा तर त्याने उभ्याउभ्याच चेंडू सीमारेषेपार टोलावून मिळवल्या होत्या. धावा पळून काढण्यात त्याचे चांगलीच कंजूष केली होती असं म्हणावं लागेल. आता इतक्या वर्षांचा इतिहास असणाऱ्या क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचा मान पटकावणारा फलंदाज नक्कीच स्पेशल असला पाहिजे. गंम्मत म्हणजे ही एकच वेगवान शतकी खेळी करून थांबेल तो आफ्रिदी कुठला.. वेगवान शतकांच्या यादीतील पहिल्या १० खेळींमध्ये याच पठ्ठ्याच्या तीन-तीन इनिंग्स समाविष्ट आहेत. आता बोला... थोडक्यात काय तर निव्वळ आपल्या फलंदाजीच्या जोरावर हा अस्सल पठाणी जगातील काही सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवण्याचा हक्कदार आहे. क्रिकेट इतिहासात तब्बल २८८ षटकार मैदनाबाहेर भिरकावून देणाऱ्या या फलंदाजाची महती बाकी कशामुळेच कमी होऊ शकत नाही. त्याचं फूटवर्क, अतिउत्साहीपणा, संयमाचा कसलाही मागमूस नसणे अशा शंभर कमतरता काढता येतील, पण म्हणून त्याच्या क्षमतेवर शंका घेण्याचे अजिबात कारण नाही. हे झालं फलंदाजीचं.. पण हा लेख ज्या कारमामुळे लिहायला घेतलंय ते कारणच मुळी वेगळंय.. इकडेच त्याची महानता सिद्ध होते बघा. कारण फलंदाजीबरोबरच तो एक गोलंदाज म्हणूनही प्रतिस्पर्ध्यांसाठी तितकाच धोकादायक ठरला आहे. एकदिवसीय सामन्यांतील फलंदाजीचे नानाविध विक्रम आपल्या नावावर करतानाच गोलंदाजीतही तीनशेहून अधिक विकेट्स घेण्याची किमया आफ्रिदीने करून दाखवली आहे. अशी अष्टपैलू कामगिरी करणारे खेळाडू जागतिक क्रिकेटमध्ये हाताच्या बोटांवर मोजण्याइतके सापडतील. पुन्हा त्याच्या आकडेवारीपेक्षाही प्रत्यक्ष मैदानावरील त्याचे अस्तित्वच जास्त बोलके आणि आक्रमक आहे.
फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी आजतागयत या खेळाडूचे अनेकांनी गोडवे गाऊन झाले असतील. मात्र सध्या जो आफ्रिदी दिसतोय तो आणखी वेगळा आहे. आणखी परिपक्व आहे. विश्वचषकापूर्वी पाक संघाच्या कर्णधार निवडीवरून मोठे वादळ उठले होते. संघ जाहीर करूनही त्यांच्या कर्णधाराचा मात्र पत्ता नव्हता. अखेरीस शेवटच्या क्षणी आफ्रिदीकडेच हा काटेरी मुकुट कायम ठेवण्यात आला आणि आपल्या संघाला विश्वचषकात योग्य दिशा दाखवण्याचे काम शाहिदवर येऊन पडले. बरोबर १९ वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील आणखी एका पठाणी खेळाडूने असंच आपल्या संघाला सक्षम नेतृत्व देत देशासाठी वर्ल्डकपरूपी भेट आणली होती. तो खेळाडू होता १९९२ मधील पाकिस्तानच्या विश्वविजयी संघाचा कर्णधार इम्रान खान.. आपल्या नेतृत्वगुणांसाठी आणि ‘लिडींग फ्रॉम द फ्रंट’ अप्रोचसाठी ओळखला जाणारा इम्रान खान.. आज नेमकं त्याच पावलांवर पाऊल टाकत शाहिद आफ्रिदी मैदानावर लढतोय. पाकिस्तानच्या संघात तेव्हाही असेच वादविवाद होते आणि आताही परिस्थिती बदललेली नाहीये. खरंतर वादविवाद हे पाकिस्तान क्रिकेटच्या पाचवीलाच पुजलेले असतात. त्यामुळे ते चित्र कधीच बदलणार नाहीये. पण त्यांच्यातला आणखी एक स्वभावही कधीच बदलणार नाहीये. तो म्हमजे त्यांच्या लढवय्येपणा.. जिंकण्याची जिद्द आणि आक्रमकता.. १९९२ प्रमाणेच आजही या संघात तीच जिद्द, तोच लढवय्येपणा आणि सुदैवाने तसेच लढाऊ आणि स्वकर्तृत्ववान नेतृत्व मौजूद आहे. विश्वचषकाआधीपासूनच या संघाला सगळेच डार्क हॉर्स मानत होते. आणि आता सुरूवातीचे तीनही सामने जिंकून ते मोठ्या थाटात आगेकूच करतायत. या तिन्ही सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणारा आफ्रिदी या संघात असताना जगातील कोणताही संघ त्यांना कमी लेखण्याची घोडचूक करणार नाही. बाकी वादविवादांप्रमाणेच अनिश्चितता हे सुद्धा पाकिस्तानच्या खेळाचे वैशिषट्य राहिलेले आहे. त्यामुळे ते कधी हिट ठरतील आणि कधी फुस्स होतील याचा काही नेम नाही. परंतु या पहिल्या तीन सामन्यांतून त्यांनी सगळ्यांनाच सावधानचा इशारा दिलाय एवढं मात्र नक्की.
माझा पण एकदम आवडता प्लेयर...१६ की १७ व्या वर्षापासून खेळतोय तो...अजुन ४-५ वर्षे खेळेल
ReplyDeleteकॅप्टनसी चा रोल पण चांगला पार पाडतोय...असा ऑल-राउंडर आपल्याला कधी मिळायचा...?
हमम.. खरंच.. असा एकतरी ऑलराऊंडर संघात हवाच.. पण बाकी आफ्रिदीबद्दल बोलायचं झाल्यास त्याच्या करिअरचा काही भरवसा नाही. स्पेशली हे लक्षात घेता की तो पाकिस्तान टीमचा सदस्य आहे. मध्यंतरी तर तो काही कारणांमुळे देश सोडूनच निघालेला. त्यामुळे त्याचं भविष्य वर्तवणं म्हणजे रिस्कच आहे.पण आय होप, जास्तीतजास्त वर्षे ते खेळत राहिल आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिल..
ReplyDeleteआफ्रिदी बेस्टच आहे...
ReplyDelete